व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर

By admin | Published: April 23, 2017 01:58 AM2017-04-23T01:58:21+5:302017-04-23T01:58:21+5:30

‘व्यक्ती तशा वल्ली’ हे आपण नेहमीच बघतो, त्याचप्रमाणे करिअरनुसार मनुष्याचे व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्याचे करिअर घडलेले असते. पण एक गोष्ट

Personality Development and Career | व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर

व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर

Next

- शिवांगी झरकर

‘व्यक्ती तशा वल्ली’ हे आपण नेहमीच बघतो, त्याचप्रमाणे करिअरनुसार मनुष्याचे व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्याचे करिअर घडलेले असते. पण एक गोष्ट व्यक्तिमत्त्वाशी निगडित खूप वेगळी आहे ती म्हणजे आपण आपल्याला हवे तसे बदल, आपला स्वभाव, मानसिकता आणि करिअरप्रमाणे करू शकतो. मूळ स्वभाव सोडला तर वयाप्रमाणे सवयी, आवडीनिवडी, मानसिकता आणि व्यक्तिमत्त्व बदलत जाते किंबहुना घडत जाते.

प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची सहा मूलभूत अंगे असतात. ही सहा अंगे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा षटकोन तयार करतात. आज आपण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी लागणारे किंवा असणारे सहा षटकोन बघणार आहोत.
१) बुद्धी : मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वात बुद्धीचा महत्त्वाचा सहभाग आहे. या बुद्धीच्या जिवावर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअर निवडू शकता; किंवा विविध क्षेत्रांतील करिअरमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. ज्यांचा बुद्धी हा घटक सबळ असतो त्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांकडे खालील गोष्टी जास्त प्रकर्षाने जाणवतात.
- प्रत्येक गोष्ट लक्षात राहणे किंवा ठेवणे
- प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण
- प्रत्येक गोष्टीत अचूक निरीक्षण
- आणि प्रत्येक गोष्टीचे बुद्धीच्या जिवावर मूल्यमापन
वरील गोष्टींच्या साह्याने या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती आपले करिअर अचूक शोधू शकतात.
२) भावना : मनुष्यांना भावना हा भाग व्यक्तिमत्त्वात मिळाला आहे. भावना जीवनात अविभाज्य आहे. परंतु भावनाप्रधान आणि भावनाशील अशा दोन बाबींवर मनुष्याचे व्यक्तिमत्त्व आणि करिअर ठरते. भावना हा भाग प्रामुख्याने असणाऱ्या व्यक्ती खालीलप्रमाणे असतात.
- या व्यक्ती नेतृत्व घेतात.
- या व्यक्ती पटकन प्रभावित होतात.
- या व्यक्ती कनवाळू असतात.
- या व्यक्ती प्रेरणादायक असतात.
- या व्यक्ती भावनेच्या जिवावर निर्णय घेतात.
- या व्यक्ती मूडी असतात.
३) वास्तववादी : या व्यक्ती वर्तमान काळात जगणाऱ्या असतात. त्यांना भूतकाळ किंवा भविष्यकाळावर बोलायला आवडत नाही आणि ते अवलंबूनसुद्धा नसतात. अशा व्यक्ती कधीही लॉटरी काढत नाहीत. या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात हे आता पाहू. या लोकांना यंत्र आणि यंत्रसामग्री आवडते. त्या वर्तमान काळात जगतात. या व्यक्तींना गप्पा, गोष्टी जास्त आवडत नाहीत. या व्यक्तींना प्राणी, निसर्ग आणि झाडे आवडतात.
४) सामाजिक : सामाजिक बाबतीत प्रेरित असलेले व्यक्तिमत्त्व पटकन ओळखता येते. त्या लगेच उठून दिसतात. या व्यक्ती खूप दुर्लभ असतात. कारण यांच्या व्यक्तिमत्त्वाने यांना कमी आणि इतरांना फायदे हे नेहमी जास्त होत असतात. हे व्यक्तिमत्त्व थोड्याफार प्रमाणात सर्वांमध्ये असतेच. कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी मानला जातो.
- लोकांना मदत करणे.
- लोकांना, मित्र-मैत्रिणींना न मागता सल्ला देणे.
- लोकांना प्रशिक्षण आणि माहिती पुरवणे.
- लोकांची काळजी घेणे.
- लोकांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करणे.
५) कलाकार : कला आणि कौशल्य हे दोन गुण सर्वांमध्ये असतात. पण या कलांना वाव देण्याची संधी सर्वांना मिळत नाही किंवा संधी ओळखताही क्वचित लोकांना येते. म्हणून कलाकार क्वचित होतात. पण जे कलाकार जन्माला येतात ते इतिहास घडवतात.
कलाकारांच्या बाबतीत खालील गोष्टी बघून घ्या...
- कौशल्य किंवा कला असते.
- प्रत्येक गोष्टीत कौशल्य शोधतात.
- कल्पनाशक्ती प्रबळ असते.
- प्रत्येक गोष्टीचा भास होतो.
- रचनात्मक दृष्टीकोन असतो.
- रंगसंगती चांगली असते.
६) रूढीबद्ध : या व्यक्तिमत्त्वात हे लोक फक्त आणि फक्त समोरचे ऐकून त्याचे संकेत पाळतात. या जीवनात वेगळे करण्याची इच्छाच नसते किंवा वेगळे असे काही होईल यावर त्यांचा विश्वास नसतो. परंतु हे लोक परंपरेचे जतन छान करून ते पाळण्यातही पुढे असतात. या लोकांचे आयोजन व नियोजन उत्तम असते. हे लोक खालील बाबींनी ओळखता येतात.
- उत्तम आयोजक व नियोजक
- १00 टक्के दुसऱ्याचे अनुकरण करणे.
- उत्तम व्यवस्थापक
- संस्कार आणि परंपरांचे जतन
-दिलेले काम चोख बजावणे.
- उत्तम व्यवहार आणि व्यवहारी वृत्ती.
वरील षटकोन तुमच्या करिअरला आणि व्यक्तिमत्त्वाला एक सकारात्मक ‘वळण’ देतो. म्हणून वरील सहा भाग जर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी पडताळून पाहिले तर तुम्हाला करिअर निवडायला सोपे जाईल आणि निवडलेले करिअर उत्तमरीत्या घडेल.
‘करिअरला पंख लावू व्यक्तिमत्त्वाचे,
जीवनाला उभारी देऊ, वेचू क्षण मोलाचे,
व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजे सोने आयुष्याचे,
आजपासून उमटवणार ठसा मी सर्वत्र करिअरचे!’

 

Web Title: Personality Development and Career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.