वेध - झंडा उँचा रहे हमारा...!
By Admin | Updated: May 4, 2017 00:11 IST2017-05-04T00:11:49+5:302017-05-04T00:11:49+5:30
कोल्हापूरच्या माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचे सर्वांत उत्तम वर्णन ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच करीत असतात. ते म्हणायचे की, कोल्हापूरचा

वेध - झंडा उँचा रहे हमारा...!
कोल्हापूरकर जनतेच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आणि एका नव्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली.
कोल्हापूरच्या माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचे सर्वांत उत्तम वर्णन ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच करीत असतात. ते म्हणायचे की, कोल्हापूरचा माणूस हा कोल्हापुरी गुळाप्रमाणे गोड आहे. तो एकदा कौतुक करू लागला की, डोक्यावर घेऊन नाचू लागेल. जर का, कोणी त्याच्याबरोबर पंगा घेतला, तर त्याला केव्हा फेकून देतील हेदेखील कळणार नाही. हे अनेक अर्थाने खरे आहे. प्रचंड हौशी, अमाप उत्साही आणि उत्सवप्रिय माणूस म्हणजे कोल्हापूरकर. कोणतीही गोष्ट करायची, तर ती मन लावून करायची, त्याच्यावर जिवापाड प्रेम करायचे. प्रत्येक गोष्ट करताना ती नंबर एकच असली पाहिजे आणि त्याचा कोल्हापूरकर म्हणून सतत सार्थ अभिमानही बाळगण्यात तो हयगय करीत नाही. हा सर्व कोल्हापूरकर असल्याचा गुणधर्म सांगण्याचे कारण की, चार दिवसांपूर्वी साजरा झालेल्या महाराष्ट्र दिना दिवशी कोल्हापुरात हजारो लोकांच्या साक्षीने एक ऐतिहासिक क्षण उजाडला. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पोलीस मुख्यालयासमोर देशातील सर्वात उंचीचा, द्वितीय क्रमांकाचा ध्वज उभा करण्यात आला आहे. हा ध्वज तीनशे तीन फुटांवर १ मे रोजी ५ वाजून ५८व्या मिनिटाला सूर्योदयासमयी फडकविण्यात आला. त्याचे औपचारिक उद्घाटन दुपारी झालेल्या भव्य-दिव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कोल्हापूरला अनेक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आहेत. ते कलेचे माहेरघर आहे. मराठी चित्रपटसृष्टीची नगरी आहे. कुस्तीची पंढरी आहे. उद्योगाची जननी आहे. निसर्गाने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील उत्तम हवामान आहे. सर्वात महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीच्या इतिहासाची पाशर््वभूमी लाभली आहे. महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाची भूमी आहे. महाराष्ट्राला सामाजिक क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. ही सर्व परंपरा आणि या सर्व कला दैनंदिन जगण्यामध्ये मनापासून अभिमान म्हणून जपण्याचा प्रयत्न कोल्हापूरकर माणूस करतो. हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. कर्तबगारी करणाऱ्यांवर मनापासून प्रेम करणारा आणि दगाबाज भेटला, तर त्याला फेकून देणारा कोल्हापूरकर आहे. याच परंपरेत कोल्हापूरकर जनतेच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेतला आणि एका नव्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली.
यापूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवर वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकतो आहे. त्यानंतरचा हा द्वितीय क्रमांकाचा ध्वज राहणार आहे. ही संकल्पना काही महिन्यांपूर्वीच मांडण्यात आली आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करण्यात आली. कोल्हापूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वाढते शहर आहे. पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे या शहरामध्ये अनेक जुन्या आठवणी आणि आकर्षणाबरोबरच नवीन काही तरी उभे करावे, जेणेकरून देशभरात कोल्हापूरचे नाव अभिमानाने घेतले जाईल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा असाच हा निर्णय होता. चित्रनगरीची उभारणी ही वेगाने चालू आहे.
कोल्हापूर हे कोकणला रेल्वेने जोडले जाणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होत आहे. विमानसेवा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. एका दृष्टीने कोल्हापूरचा झेंडा अधिक उंच उंच फडकावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यावर कोल्हापूरच्या जनतेचेसुद्धा मनापासून प्रेम आहे.
- वसंत भोसले