शिक्षा; पण सार्वजनिक सेवेची!

By किरण अग्रवाल | Published: December 24, 2020 09:41 AM2020-12-24T09:41:12+5:302020-12-24T09:41:26+5:30

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांना दंडाऐवजी सार्वजनिक सेवा करण्याची शिक्षा सुनावण्याचा प्रकार परिणामकारी ठरावा.

penalty But of public service | शिक्षा; पण सार्वजनिक सेवेची!

शिक्षा; पण सार्वजनिक सेवेची!

Next

- किरण अग्रवाल

हेतू स्वच्छ वा स्पष्ट असले की ते साध्य करण्याच्या प्रयत्नाला गती तर मिळतेच, शिवाय त्यात अभिनवताही आणली जाताना दिसून येते. विशेषत: सरकारी पातळीवरून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कामाबद्दलच्या प्रयत्नात लोकसहभागीता मिळवायची किंवा जनतेचा प्रतिसाद मिळवायचा तर केवळ शासकीय चाकोरीचा अवलंब करून उपयोगाचे नसते, तर प्रभावी व परिणामकारक ठरतील अशा वेगळ्या प्रयत्नांची त्यासाठी गरज असते. असा वेगळेपणा चर्चित ठरून जातो तेव्हा त्यातून उद्दिष्टपूर्तीचा मार्गही सुलभ होऊन जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांना दंडाऐवजी सार्वजनिक सेवा करण्याची शिक्षा सुनावण्याचा प्रकारही असाच परिणामकारी ठरावा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतेचा विषय अतिशय महत्त्वाचा बनला आहे. यात स्वतःचे संरक्षण करताना इतरांना त्रास अगर संसर्ग होणार नाही यादृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे; परंतु सार्वजनिक ठिकाणी वावरताना तशी काळजी अभावानेच घेतली जाताना आढळते. तोंडाला मास्क न लावता बाजारात फिरताना व खोकताना जसे अनेकजण आढळतात तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारेही मोठ्या प्रमाणात दिसतात. या थुंकीबहाद्दरांवर ठिकठिकाणी दंडात्मक कारवाया केल्या जात असतातच; पण त्या प्रभावी ठरत नसल्याचेच दिसून येते. सवयीचे गुलाम बनलेले अनेकजण टेहळणी पथकाच्या हाती लागले की दंड भरून पुन्हा पुढच्या वेळी तीच चूक करावयास मोकळे होतात. अशांकडून दंड वसूल करून सरकारी तिजोरीत भर घालणे हा यंत्रणांचा हेतू नसतो, तर त्यांना जरब बसून त्यांच्या चुकीच्या सवयी बदलणे अपेक्षित असते. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखण्याचा हेतू यामागे असतो; परंतु केवळ दंडाने या सवयी बदलत नाहीत असाच अनुभव आहे. त्यामुळे मुंबई व नाशिक महापालिकेतर्फे आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडाबरोबरच एक ते तीन दिवस रस्त्यावर झाडू मारण्यापासून कचरा उचलण्यासारखी सार्वजनिक सेवेची शिक्षा ठोठावली जाऊ लागली असून, त्याचा परिणाम दिसून येणे अपेक्षित आहे.

दंडाबरोबरच रस्त्यावर झाडू मारायला लावण्याची सार्वजनिक सेवेची शिक्षा संबंधितांसाठी लाजिरवाणी ठरत असल्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या प्रमादाला आळा बसणे अपेक्षित आहे. शिक्षेतील ही अभिनवता महत्त्वाची आहे. नाशिकचे सध्याचे महापौर सतीश कुलकर्णी मागे आरोग्य सभापती असताना त्यांनी क्लीन सिटीसाठी खासगी कंपनीला ठेका देऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याची योजना आणली होती. यातून दंड मोठ्या प्रमाणात वसूल झाला व महापालिकेच्या तिजोरीतही भर पडली; परंतु थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊ शकले नव्हते. सार्वजनिक व सामाजिक भान नसल्याच्या परिणामी हे प्रकार घडून येत असतात. कायद्याच्या आधारे केवळ दंडाद्वारे या गोष्टी नियंत्रणात आणता येत नाहीत तर अभिनवतेने जाणीव जागृती घडवून त्याला अटकाव घालणे शक्य होते. रवींद्रकुमार सिंगल नाशिकचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी यासंदर्भात प्रयोग करून चांगला परिणाम साध्य करून दाखविला होता. दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या म्हणजे पोलीस विभागातील सहकाऱ्यांना तशी सक्ती केली, आणि विनाहेल्मेट आढळणाऱ्या वाहनचालकांना दंडाऐवजी हेल्मेट कसे गरजेचे आहे याविषयावर निबंध लिहायला लावले. या अभिनवतेतून जाणीव जागृती होऊन नाशिककरांना हेल्मेटशिवाय घराबाहेर न पडण्याची सवय लागलेली दिसून आली होती. आता थुंकीबहाद्दरांनाही दंडाखेरीज सार्वजनिक सेवेची शिक्षा सुनावली जात असल्याने त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे, तेव्हा या उपक्रमाचा अगर पद्धतीचा अवलंब इतर शहरातही केला गेल्यास सार्वजनिक स्वच्छता राखण्यास मदत घडून येऊ शकेल.

Web Title: penalty But of public service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.