पेन अधिवेशन : सत्य, स्वातंत्र्य, विविधता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 12:34 AM2018-09-26T00:34:47+5:302018-09-26T00:35:02+5:30

पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेशन होऊ शकले नव्हते.

Pen Session: Truth, Freedom, Diversity | पेन अधिवेशन : सत्य, स्वातंत्र्य, विविधता

पेन अधिवेशन : सत्य, स्वातंत्र्य, विविधता

Next

- डॉ. गणेश देवी
(ज्येष्ठ भाषा अभ्यासक)

पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेशन होऊ शकले नव्हते. भारतात हे अधिवेशन व्हावे, अशी रवींद्रनाथ टागोर यांची इच्छा होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ही इच्छा अपुरी राहिली. दोन वर्षांपूर्वी ‘दक्षिणायन’च्यानिमित्ताने मी बंगळुरुला गेलो असताना पेनच्या अध्यक्षांशी माझी भेट झाली. पेनचे अधिवेशन भारतात होणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कारण विचारले असता मी सांगितले, ‘महात्मा गांधी यांच्या जन्माचे १५० वे वर्ष २ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या वर्षाची नांदी पेनच्या संमेलनाने व्हावी, असे मला वाटते. गांधीजींसारखी व्यक्ती आधुनिक जगात क्वचितच झाली असेल. गांधीजींना महात्मापद मिंळाले; मात्र त्यांचा सत्याग्रह आणि निर्भयतेच्या मागे कस्तुरबांची शक्ती होती. कस्तुरबा पुण्यामध्ये तुरुंगात असताना तेथेच त्यांचा मृत्यू झाला. पेन एक प्रकारे तुरुंगात असणाºया लेखकांना मदतीचा हात देते. त्यामुळे पेन इंटरनॅशनल काँग्रेसचा कार्यक्रम आगाखान पॅलेसपासून शांततामय प्रार्थनेने सुरू करण्याचे ठरले. या अधिवेशनासाठी पेनच्या ८७ केंद्रांमधील
आणि ६० हून अधिक देशांतील लेखक पुण्यात एकत्र आले असून मंगळवारपासून सुरू झालेला हा लेखक सोहळा २७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
लेखक केवळ अक्षरांशी जोडलेल्या व्यक्ती नाहीत. भारतात मौखिक परंपरा खूप समृद्ध आहे. या परंपरेची तसेच लिपींचे हस्तकलेतील स्थान याची दखल अधिवेशनात घेण्यात येणार आहे. मराठी भाषेने साहित्याला काय दिले असे विचार केल्यास, वारी हा साहित्यमय प्रकार आहे, हे लक्षात येईल. महाराष्ट्राबाहेर ही परंपरा कुठेच पाहायला मिळत नाही. जागतिक पातळीवर ही परंपरा नेण्याच्या हेतूने १४ विविध संतकवींच्या रचना गाणारे ग्रुप एकत्र करून वारी काढण्याचे ठरवले. सर्व माणसे समान असावीत, अशी संतांची इच्छा होती. म्हणूनच, जगातील सहा हजार भाषांना एकत्र आणून वारीशी जोडणे मला योग्य वाटते. म्हणून मी भाषा वारी ही संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. निरक्षर लोकांनी केलेल्या लिपीची निर्मिती आणि भाषावारी ही कल्पना पेन इंटरनॅशनलच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. गेल्या १०० वर्षांत पेन काँग्रेसमध्ये सहभागी होणाºया केंद्रांची संख्या साधारणपणे ४० ते ५५ होती. कॅनडातील अधिवेशनात
८० केंद्रे एकत्र आली होती. यंदा प्रथमच ८७ केंद्रे एकत्र येत असून नवा उच्चांक प्रस्थापित होत आहे. या केंद्रांमधील एकत्र येत असलेले लेखक ज्या भाषांचे प्रतिनिधित्व करतात, त्या भाषांची संख्या जवळपास दोन ते अडीच हजार होते.
पेन अधिवेशनाच्या शीर्षकामध्ये सर्वांत महत्त्वाचा शब्द म्हणजे विविधता. स्वातंत्र्यासाठी विविधतेची गरज असते. दुसरा शब्द म्हणजे सत्य. निर्भीडपणे सत्य सांगण्याची स्वातंत्र्यासाठी गरज असते. लेखकांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे निर्भीडपणे जगाला आरसा दाखवणे, त्याचबरोबर जीवसृष्टीचे रक्षण करणे. म्हणूनच ट्रूथ, फ्रीडम आणि डायव्हर्सिटी या तीन शब्दांचे शीर्षक या अधिवेशनासाठी चपखल ठरले आहे.

Web Title: Pen Session: Truth, Freedom, Diversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या