देशी-विदेशी नीचपणाचा कळस

By Admin | Updated: March 4, 2015 22:53 IST2015-03-04T22:53:29+5:302015-03-04T22:53:29+5:30

कथित अनुबोधपटात निर्भया प्रकरणातील (हे घृणास्पद प्रकरण नेमके काय, हे वाचकांना ज्ञात असल्याचे येथे गृहीत धरले आहे) ज्या आरोपीला या प्रकरणात शिक्षा झाली आहे,

The peak of indigenous and despicable | देशी-विदेशी नीचपणाचा कळस

देशी-विदेशी नीचपणाचा कळस

निर्भयानेदेखील भयकंपित होऊन उठावे, असा निर्लज्ज आणि नीचपणाचा कळस गोऱ्या चामडीच्या लोकानी गाठावा, यापेक्षाही त्यांच्या या कुकर्मात तितक्याच बेशरम, बेमुर्वत आणि निलाजऱ्या व्यक्तीने सहाय्य करावे व ही व्यक्ती कारागृह व्यवस्थापनातील एक उच्चपदस्थ महिला अधिकारी असावी, यापेक्षा आणखी उबगवाणे, किळसवाणे आणि घृणास्पद अन्य काहीही असू शकत नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना, स्वत:ला परम संवेदनशील मानणारे सरकार मात्र कोणतीही धडक कारवाई करण्याऐवजी थंडपणाने चौकशांचे अहवाल मागविण्याची भाषा करते, याचा अर्थ ‘निर्भया’ प्रकरण घडून गेल्यानंतरही परिस्थितीत आणि लोकांच्या मानसिकतेत कोणताही गुणात्मक फरक पडलेला नाही, हे स्पष्ट आहे. अर्थात सरकार तरी कोणत्या तोंडाने वा हातानी कारवाई करणार, कारण परवानगी चक्क केन्द्रीय गृह मंत्रालयानेच दिलेली असते. लेस्ली उडवीन नावाच्या कोणा ब्रिटिश चित्रपट निर्मातीने ‘इंडियाज डॉटर्स’ नावाचा एक अनुबोधपट (?) ‘बीबीसी’साठी तयार केला व त्याचे जागतिक प्रदर्शन येत्या रविवारी होऊ घातलेले आहे. अधिकृत प्रदर्शनाआधीच देशात आणि संसदेत वादळ निर्माण करणाऱ्या या कथित अनुबोधपटात निर्भया प्रकरणातील (हे घृणास्पद प्रकरण नेमके काय, हे वाचकांना ज्ञात असल्याचे येथे गृहीत धरले आहे) ज्या आरोपीला या प्रकरणात शिक्षा झाली आहे, त्या मुकेश सिंग याची चक्क मुलाखत घेण्यात आली आहे. ती देताना, त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा एक कणदेखील आढळून आला नसल्याचे सांगितले जाते आहे. त्याउलट त्याने सारा दोष निर्भयावरच ढकलला असून, तिने प्रतिकार केला नसता, तर पुढील प्रकरण घडलेच नसते, असे लंपट आणि बेशरम उद्गार त्याने काढले आहेत. हा सिंग आणि त्याच्या तीन जोडीदारांचे वकीलपत्र घेणाऱ्या एम.एल.शर्मा आणि ए.पी.सिंग यांचेही चित्रीकरण केले गेले असून जसा अशील तसा वकील याची प्रतिची आणून देताना यातील अ‍ॅड. शर्मा म्हणतात, रस्त्यावर मिठाई ठेवली, तर कुत्री त्यांच्यावर तुटून पडणारच ! आपल्या अशिलाची बाजू मांडण्यासाठी शर्मांनी न्यायालयात केलेला हा युक्तिवाद नसून त्यांनी सार्वजनिकरीत्या दिलेल्या मुलाखतीमधील हे विधान आहे. केवळ तिथेच न थांबता, निर्भया रात्रीच्या सिनेमाला गेलीच कशाला, असा शहाजोग सवाल करताना त्यांनी उच्च आणि कुलीन भारतीय परंपरांचे दाखलेदेखील त्यांनी दिले आहेत. अ‍ॅड. सिंग यांच्या कथनानुसार, ते उडवीनबाईला तिहार कारागृहात घेऊन गेले, तेव्हा म्हणे तेथील कारागृह अधीक्षकानी या बाई आणि आपला अशील यांची भेटच होऊ दिली नव्हती. याचा अर्थ इथून तिथून सारी बदमाषीच आहे. आता केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, खात्याकडून आलेले छापील निवेदन करताना संसदेला सांगतात की, उडवीनबाईंनी त्यांना घातलेल्या अटी शर्तींचा भंग केला आहे. पण मुळात परवानगी दिलीच कशाला, यावर ते बोलत नाहीत. ते जरी बोलत नसले तरी बाब स्वच्छ आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचे भूत आजही भारतीयांच्या मानगुटीवर बसलेले असल्याने, गोऱ्यांना नाही कसे म्हणायचे, हा त्यांना भेडसावणारा फार मोठा प्रश्न आहे. सारे घडून गेल्यानंतर प्रस्तुत अनुबोधपट भारतात प्रदर्शित करायला म्हणे सरकारने बंदी लागू केली आहे, पण खासगी क्षेत्रातील ज्या भारतीय चित्रवाहिनीने या पटाचे हक्क विकत घेतले आहेत, ती सरकारी आदेश जुमानायला तयार नाही. बीबीसीचे प्रक्षेपण सरकार रोखू शकत नाही व दरम्यान यू ट्यूबवर तर हा अनुबोधपट आधीच सैराटला आहे. या पटाच्या निर्मात्या उडवीनबाई बलात्कार आणि त्यामागील पुरुषी मानसिकता या एका तथाकथित सामाजिक समस्येला हात घालण्याचे सत्कर्म करु पाहत होत्या, म्हणून त्यांना सरकारी परवानगी दिली गेली, असे राजनाथ म्हणतात. जर तसे असेल तर ‘इंडियाज डॉटर्स’ का? बलात्कार काय केवळ भारतात होतात? जिथे जिथे नर आहे आणि मादीही आहे, तिथे बलात्कार होऊ शकतो, हे वैश्विक आणि जीवशास्त्रीय सत्य आहे. मग भारताच्या आणि त्याही केवळ कन्या, हा विषय ऐकल्यावर कोणाचेही कान टवकारु नयेत? कसे टवकारतील? बिल गेट्स आपल्याकडील डॉलर्सने भरलेल्या तलावातील दोन तपेल्या भारतातील एड्सविरोधी मोहिमेसाठी देतो तेव्हां भारत ही या महाभयानक रोगाची जननी असल्याचे तो सिद्ध करु पाहत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही वा आपण ते लक्षात घेत नाही, कारण आपल्या खांद्याला नेहमीच भिकेची झोळी लटकलेली असते. अलीकडच्या काळात एड्सविरुद्धच्या प्रचार मोहीमा थंडावल्यागत झाल्या आहेत. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या एतद्देशीय बिगर सरकारी संस्था आता ‘रेपीस्टां’च्या विरोधात काम करण्यासाठी पुढे सरसावू पाहत आहेत व त्यासाठीची पृष्ठभूमी तयार करण्यासाठीच ‘डॉटर्स आॅफ इंडिया’ची निर्मिती असा सारा प्रकार असल्याची दबक्या आवाजातली का होईना चर्चा सुरु झाली आहे. ती तर गांभीर्याने घेतलीच पाहिजे पण एकूण साऱ्या जगतातील महिला नव्हे तर केवळ भारतीय मुलींना समोर ठेऊन, त्या कशा बलात्कारी वृत्तीच्या शिकार बनत चालल्या आहेत, असे चित्र रंगविणे म्हणजे एकीकडे सांस्कृतिक आक्रमण करणे व दुसरीकडे भारताची बदनामी करणेच होय.

Web Title: The peak of indigenous and despicable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.