पवारांची व्याकुळता

By Admin | Updated: February 23, 2015 22:44 IST2015-02-23T22:44:30+5:302015-02-23T22:44:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा केला. मोदी-पवारांच्या या भेटीमुळे एकीकडे शिवसेना अस्वस्थ आहे

Pawar's grief | पवारांची व्याकुळता

पवारांची व्याकुळता

गजानन जानभोर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा केला. मोदी-पवारांच्या या भेटीमुळे एकीकडे शिवसेना अस्वस्थ आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचे स्पष्ट संकेतही मिळाले आहेत. भाजपाचे डोहाळे लागलेले विदर्भातील राकाँ नेते या भेटीने सुखावून गेले आहेत. यातील काहींनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना पडद्यामागून मदत केली होती, तर काहींनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भात तसे फार अस्तित्व नाही. इथे हा पक्ष अजूनही मूळ धरू शकलेला नाही. लोकाधार असलेले दोन- चार नेते सोडले तर उर्वरितांमध्ये दुकानदार आणि ठेकेदारांचीच संख्या अधिक आहे. अमरावतीत या पक्षाचे बऱ्यापैकी वर्चस्व होते. संजय खोडकेंनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केल्यानंतर तेही आता संपुष्टात आले आहे. अकोल्यात डॉ. संतोष कोरपे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पलीकडे कुणी विचारत नाही. मूर्तिजापूरच्या तुकाराम बिरकडांमध्ये प्रचंड क्षमता आहे, पण पक्षातच खच्चीकरण सुरू झाल्यामुळे खचलेल्या बिरकडांनी शेवटी चित्रपट निर्मितीत आपले मन गुंतवले. वाशिममध्ये सुभाष ठाकरे, प्रकाश डहाके यांना पक्षाने ताकद दिली खरी पण व्यक्तिगत लाभाचाच त्यांनी अधिक विचार केला. चारदा आमदारकी आणि दोन वेळा मंत्रिपद उपभोगलेल्या बुलडाण्याच्या राजेंद्र शिंगणेंच्या वाटचालीत कर्तृत्वापेक्षा पुण्याईचाच भाग अधिक होता. लोकप्रतिनिधी म्हणून शिंगणे निष्क्रियतेच्या शापातून कधीच मुक्त होऊ शकले नाहीत. यवतमाळात जनतेपेक्षा ठेकेदारांचेच अधिक हित जोपासणाऱ्या संदीप बाजोरिया या नेत्याच्या ‘बंधाऱ्यांना’ (‘दावणीला’ हा शब्द आता कालबाह्य) हा पक्ष घट्ट बांधला गेला आहे. मनोहर नाईक पुसदहून सतत निवडून येतात. पण त्याचे श्रेय पक्षाला नाही तर त्यांनाच जाते. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत तर हा पक्ष ‘उसनवारी’वर चालत असतो.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व आहे. इथे पटेल वजा केले तर राकाँ शून्य आहे. काँग्रेस-भाजपाच्या आमंत्रणाचे दडपण पवारांवर ठेवून पटेल राकाँचे राजकारण करतात. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी भंडारा-गोंदियात प्रचार सभा घेतली नाही. मोदींना पटेलही तेवढेच प्रिय असल्याचा हा पुरावा आहे. पटेल मोदींना आपल्या विरोधात प्रचारासाठी येण्यास जसे रोखू शकतात तसेच ते सोनिया गांधींनाही आपल्या प्रचारासाठी आणू शकतात, हेच त्यांचे खरे उपद्रवमूल्य आहे. नागपूर जिल्ह्यात अनिल देशमुख, रमेश बंग यांनी पक्षासाठी खूप परिश्रम घेतले पण या दोघांत सतत भांडणे असावीत अशीच वरिष्ठांची इच्छा असते की काय, असे कार्यकर्त्यांना सतत वाटत राहते. सामाजिक क्षेत्रात मान असलेले गिरीश गांधी कधीकाळी या पक्षात होते. परंतु ‘सर्वपक्षसमभाव’ या त्यांच्या स्वभावामुळे ते आपले आहेत की गडकरींचे, अशा संभ्रमात पवार राहायचे.
शरद पवार सत्तेवाचून राहू शकत नाहीत. किमान सत्तेच्या परिघात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मोदी त्यांना महिन्यातून दोन-तीनदा फोन करतात, तेव्हा पवारांनी चाणाक्षपणे निर्माण केलेल्या आभासाचा तो भाग असतो. पवारांना आपल्या आप्तांचा भविष्यकाळ भाजपामध्ये अधिक उज्ज्वल वाटतो. उद्या जर त्यांना आपला पक्ष विलीनच करायचा असेल तर ते काँग्रेसमध्ये कधीच करणार नाहीत. म्हणूनच वर्तमान राजकीय परिस्थिती पवारांना भाजपाबद्दल व्याकूळ करणारी आहे. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तेच अपेक्षित आहे.
राकाँचे विदर्भातील प्रमुख नेते भाजपामध्ये जाण्यास इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपाला विदर्भात मोठे यश मिळाले. ही लाट पाच वर्षांनंतरही कायम राहील याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. त्याचवेळी शिवसेनेने विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. अशा वातावरणात शिवसेनेचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी गडकरी-फडणवीसांना विदर्भातील राकाँ नेत्यांची गरज भासणार आहे. २०१९च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत हे चेहरे भाजपाच्या बॅनर्सवर झळकू लागले तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Pawar's grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.