पवारांची पश्चातबुद्धी

By Admin | Updated: June 28, 2016 05:52 IST2016-06-28T05:52:17+5:302016-06-28T05:52:17+5:30

पवार म्हणतात, त्याप्रमाणे तरुणांना संधी देणार म्हणजे नेमकी कुणाला देणार?

Pawar's aftermath | पवारांची पश्चातबुद्धी

पवारांची पश्चातबुद्धी


पवार म्हणतात, त्याप्रमाणे तरुणांना संधी देणार म्हणजे नेमकी कुणाला देणार? राकाँ नेत्यांच्या मुलांना की पक्षासाठी दिवसरात्र झटणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला ? हा संभ्रम स्पष्ट व्हायला हवा. याचे कारण असे की, ज्या तरुणांना या पक्षाने संधी दिली, ते एकतर या नेत्यांच्या घरातले किंवा जातीतले होते.
नावात राष्ट्र असले तरी एका प्रदेश आणि जातीपुरत्याच मर्यादित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अचानक तरुणांना प्राधान्य देण्याची उपरती आली आहे. समाजातील विविध घटकांची नाळ जोडण्यासाठी आणि पक्ष अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तरुणाईला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचे आणि त्या अनुषंगाने आगामी निवडणुकांत ३० वर्षे वयोगटातील ७० टक्के तरुणांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी अलीकडेच जाहीर केला आहे. केंद्रात, महाराष्ट्रात सत्ता भोगल्यानंतर, काही नेते तुरुंगात व काही त्या वाटेवर असताना पवारांना सुचलेले हे शहाणपण फार काही किमया घडवून आणेल, असे वाटत नाही.
पवार म्हणतात त्याप्रमाणे तरुणांना संधी देणार म्हणजे नेमकी कुणाला देणार, राकाँ नेत्यांच्या मुलांना की पक्षासाठी दिवसरात्र झटणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना, हा संभ्रम दूर व्हायला हवा. याचे कारण असे की, आजवर ज्या तरुणांना या पक्षाने संधी दिली, ते बहुतांश या नेत्यांच्या घरातले किंवा जातीतलेच होते. तरुण नेतृत्व म्हणून पवारांना ज्यांच्याबद्दल अभिमान आहे त्यात आर.आर. पाटील यांचा अपवाद वगळता जयदत्त क्षीरसागर, जयंत पाटील, अजित पवार यांच्या नेतृत्वात कर्तृत्वापेक्षा आई-वडील, काकांच्या पुण्याईचाच भाग अधिक होता हे वास्तव आहे. त्यामुळे आता ज्यांना तुम्ही उमेदवारी द्याल ते तरुण नेमके कोण असतील? लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही हा विषय चर्चेला आला होता. पण पवारांना राजेंद्र शिंगणे, सुरेश देशमुख, मनोहर नाईक यांच्यापलीकडे सामान्य कार्यकर्ते दिसले नाहीत. पवारांच्या नव्या धोरणाचा या पक्षाला विदर्भात फारसा फायदा होईल, असे दिसत नाही. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत आहे. इथे या पक्षाकडे कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त आहेत. गोंदियाचे प्रफुल्ल पटेल पवारांच्या वा त्यांच्या पक्षाच्या भरवशावर राजकारण करीत नाहीत. त्यांच्यासाठी काँग्रेस-भाजपाची दारे सदैव उघडी असतात. यवतमाळात संदीप बाजोरिया नावाचे एक राष्ट्रवादीचे ‘तरुण’ आमदार आहेत. पूर्ण वेळ ठेकेदारीवरच पोट भरणारा हा नेता अजित पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला जुमानत नाही. बाजोरिया जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचा जाहीरपणे अपमान करीत असतात. पवारांना हे पोटभरू-मुजोर तरुण नेतृत्व अपेक्षित आहे का? याच यवतमाळ जिल्ह्यातील ख्वाजा बेग हा सज्जन, प्रामाणिक आमदार पक्षात घुसमट सहन करीत आहे. पुतण्याला बाजोरियांची जशी सदैव साथ असते तसा कळवळा काकांना ख्वाजा बेगबद्दल का नाही, असा प्रश्न यवतमाळातील सामान्य कार्यकर्त्यांना सतत सतावत असतो.
भविष्यातील निवडणुकांमध्ये तरुणांचा मताधिकार निर्णायक ठरणार असल्याची जी गोष्ट नरेंद्र मोदींना कळून चुकली, तशीच ती पवारांनाही कळली आहे. पण आयुष्यभर जातीच्या सुप्त अहंकाराचे व कुटुंबकबिल्याचे राजकारण केल्यामुळे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असूनही हा द्रष्टा नेता मोठा होऊ शकला नाही. आज पक्षाच्या आणि स्वत:च्या उतार वयात त्यांना तरुणांना संधी द्यावीशी वाटत असेल तर त्यात पक्षाच्या आणि मुलीच्या राजकीय भवितव्याचीच काळजी अधिक आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या सामाजिक, राजकीय संघटनेचे नेतृत्व एकाधिकारशाहीचे प्रतिनिधित्व करीत असते. ‘आपण नसताना आपल्या पश्चात कुटुंबियांचे काय होईल’, या काळजीने ते व्याकूळ होत असते. पवारांच्या या नवीन धोरणाकडे त्या करुणेतून बघितले तरच त्यांचे राजकारण समजून घेता येईल. पवार स्वत: कष्टातून राजकारणात मोठे झाले आहेत. आज स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या राकाँमधील नेत्यांची पिढी अस्तंगत होत आहे. त्यामुळे हा पक्ष खरोखरच जिवंत ठेवायचा असेल तर पुढाऱ्यांच्या पोरांऐवजी पक्षासाठी झिजणाऱ्या सामान्य तरुण कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागेल. तरच या पक्षावर लागलेला एका विशिष्ट जातीचा डाग पुसता येईल आणि पवारांच्या पश्चातही हा पक्ष जिवंत राहील.
- गजानन जानभोर

Web Title: Pawar's aftermath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.