पवार बोलले !
By Admin | Updated: February 8, 2016 03:38 IST2016-02-08T03:38:19+5:302016-02-08T03:38:19+5:30
राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ लावण्याचा जुनाच खेळ आता नव्याने सुरू होणार आहे. निमित्त घडले आहे,

पवार बोलले !
राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ लावण्याचा जुनाच खेळ आता नव्याने सुरू होणार आहे. निमित्त घडले आहे, ते मुंबईत शुक्रवारी झालेल्या इतिहास अभ्यासकांच्या एका बैठकीत पवार यांनी ‘हिंदू राष्ट्रा’संबंधी केलेल्या वक्तव्याचे. देश ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याचा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा बेत आहे आणि तो देशाच्या ऐक्याला तडा देणारा ठरेल, असा इशारा या बैठकीत बोलताना पवार यांनी दिला. भारत ‘हिंदू राष्ट्र’ बनवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंतिम उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच गेली ९० वर्षे ही संघटना झटत आहे. आज देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे संघाचे कट्टर प्रचारक आहेत आणि ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेचे कट्टर पाईकही आहेत. मग ‘सध्याच्या सत्ताधाऱ्यां’चे नेतृत्व अशा नरेंद्र मोदी यांच्या हाती असताना, बारामतीत केलेला
विकास दाखविण्यासाठी पवार त्यांना सन्मानाने कसे बोलावू शकतात किंवा पवार यांच्या ७५ व्या सत्काराला ‘हिंदू राष्ट्र’ बनवू पाहणाऱ्यांचे नेते असलेले नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून कसे काय बोलावले जाऊ शकतात? अर्थात या प्रश्नांना पवार यांच्याकडे उत्तरे आहेतच.
खरे तर त्यांनी ती आधीच देऊन ठेवली आहेत. ‘विकासात राजकारण आणू नका’ हे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे आणि ‘मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, जनतेने त्यांना निवडून दिले आहे’, हे दुसऱ्या प्रश्नाचे. ही उत्तरे प्रथमदर्शनी अगदी बिनतोड आहेत आणि आता जेव्हा पवार यांच्या वक्तव्यांवरून वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागतील, तेव्हा बहुधा हीच उत्तरे ते ऐकवतील. पण ‘विकास’ ही काय अमूर्त गोष्ट आहे काय; कोणीही केला, कसाही केला, तरी तो ‘विकास’ असू शकतो काय; आणि अशा ‘विकासा’चे उद्दिष्ट काय, हे प्रश्न क्वचितच पवार यांना विचारले जातात आणि विचारले गेले, तरी ते कसे टोलवायचे याचे कसब पवार यांच्याकडे आहेच. असा प्रश्न आहे, तो ‘जनतेने निवडून’ देण्याचा. जगाचा इतिहास असे दर्शवतो की, एकाधिकारशाहीची विचारसरणी असलेल्या संघटना बहुतेकदा लोकशाही मार्गानेच निवडून आलेल्या असतात आणि एकाधिकारशाहीला विरोध करणाऱ्या पक्ष व संघटना यांच्या कारभाराला विटलेल्या लोकांनीच त्यांना निवडून दिलेले असते. तेही दररोजचा बिकट जीवनसंघर्ष
सुसह्य करण्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून. पण एकदा सत्ता हाती आली की, हे एकाधिकारशाही विचारसरणीचे पक्ष व संघटना प्रस्थापित व्यवस्थेत कलाकलाने बदल करीत सर्व प्रशासन यंत्रणा व जनजीवनावर आपली पकड बसविण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत राहतात. या कालावधीत दररोजचा जीवनसंघर्ष सुसह्य होण्याचे आश्वासन प्रत्यक्षात येतच नाही. पण त्याच्या विरोधात तोंड उघडायची सोय फारशी उरलेली नसते; कारण तोपर्यंत अशा एकाधिकारशाही पक्षाने जनजीवनावर आपली पकड घट्ट करीत नेलेली असते. सांगावयाचा मुद्दा इतकाच की, देशाचा ‘विकास’ होतो, पण जनजीवन एका साचेबंद चौकटीत बसवले जाते. त्याला कोणी विरोध केल्यास त्याची गठडी वळली जाते. ‘सध्याचे सत्ताधारी देश हिंदू राष्ट्र बनवू पाहत आहेत’, असे पवार यांचे खरोखरच प्रामाणिक मत असेल, तर ‘विकासात राजकारण आणू नका’ ही आपली
भूमिका त्यांनी बदलायला हवी आणि ‘नरेंद्र मोदी यांना
मतदारांनी निवडून दिले आहे’, हा युक्तिवादही
त्यांनी करता कामा नये. अर्थात मतदारांनी भाजपाच्या पारड्यात भरघोस मते का टाकली आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या (त्यात पवारही होतेच) कारभाराला जनता इतकी का विटली होती, हा प्रश्न उरतोच. म्हणूनच पवार यांना खरोखरच ‘‘सध्याचे सत्ताधारी’ देशाला ‘हिंदू राष्ट्र’ बनवू पाहत आहेत, असा धोका दिसत असेल (पवार यांच्याकडे तीक्ष्ण दूरदूष्टी आहे, याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही), तर ‘जनता आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला का विटली’, या मुद्द्यावर पवार यांनी गेल्या दीड- दोन वर्षात आत्मसंशोधन
केले काय? अलीकडच्या काळात पवार यांनी पंचाहत्तरीनिमित्त आत्मचरित्र लिहिले, त्यात असा आत्मसंशोधनपर काही मजकूर सापडत नाही. त्यामुळे लोक ‘सध्याच्या सत्ताधाऱ्यां’मागे का गेले, यावर निदान आता तरी पवार आत्मसंशोधन करणार की नाही,
हा प्रश्न ओघानेच येतो. उरला मुद्दा इतिहासाच्या अभ्यासकांचा. मुंबईतील बैठकीत उपस्थित असलेल्यांची जी काही नावे प्रसिद्ध झाली आहेत, ते सर्व जण पुरोगामी वर्तुळातील होते. साहजिकच ‘हिंदू असणे यात गैर काय?’ हा प्रश्न जनसामान्यांना पडण्यापर्यंत संघाला वाटचाल करता आली, त्यात इतिहासाच्या पुरोेगामी अभ्यासकांच्या अदूरदर्शीच नव्हे, तर ऱ्हस्व दृष्टीनेही केलेल्या विश्लेषणाचा काही वाटा आहे की नाही, हाही एक मूलभूत प्रश्न आहे. त्याचे उत्तर मुंबईतील शुक्रवारच्या बैठकीस उपस्थित असलेल्या इतिहासाच्या अभ्यासकांनी द्यायला हवे. अर्थात अशा चर्चेच्या गुऱ्हाळावर पवार यांचाही विश्वास असेल, असे वाटत नाही. तरीही पवार तेथे गेले आणि ‘हिंदू राष्ट्रा’चा धोका दाखवून आले, ते ‘एकाच दगडात अनेक पक्षी मारण्या’च्या कार्यपद्धतीमुळे. त्यामुळे पवार काय साधतात, हा कूट प्रश्न आजपर्यंत भल्याभल्यांनाही सोडवता आलेला नाही. मात्र अशा कार्यपद्धतीची परिणती काय होते, याचे प्रतिबिंब ‘पंतप्रधान म्हणून देशाला लाभायला हवा होता असा नेता’ हे जे पवार यांचे वर्णन अलीकडेच एका उद्योगपतीने केले, त्यात पडलेले दिसून येते.