पाटलीपुत्राचा दिल्लीविजय
By Admin | Updated: November 8, 2015 23:32 IST2015-11-08T23:32:05+5:302015-11-08T23:32:05+5:30
बिहारची बहुचर्चित निवडणूक, तीत झालेला सर्वपक्षीय प्रचारी धुमाकूळ आणि तिच्यात नितीश-लालू आणि सोनिया यांच्या महागठबंधनाचा झालेला प्रचंड विजय

पाटलीपुत्राचा दिल्लीविजय
बिहारची बहुचर्चित निवडणूक, तीत झालेला सर्वपक्षीय प्रचारी धुमाकूळ आणि तिच्यात नितीश-लालू आणि सोनिया यांच्या महागठबंधनाचा झालेला प्रचंड विजय यांनी त्या राज्याच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या राजकीय मानसिकतेत मोठा बदल घडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत २८२ जागा जिंकल्यापासून ते, त्यांचा पक्ष आणि त्यांचा संघ परिवार यांच्या वागण्या-बोलण्यात एक बेदरकार बेछूटपण आले होते. घरवापसी आणि लव्हजिहाद इथपासून शिरच्छेदाचे राजकारण सांगण्याएवढी त्यांची मजल टोकाची झाली होती. तिला पहिला झटका अरविंद केजरीवालांनी देशाच्या राजधानीत त्यांचा पराभव करून दिला. आताच्या बिहारमधील निवडणूक निकालांनी त्यांच्या पतनाचा आरंभ झाल्याचेच स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाने घेतल्या नसतील एवढ्या ३० जाहीर सभा घेतल्या. त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शाह ५७ सभा घेऊन थांबले. प्रचाराचा ऊत, माध्यमांचा एकतर्फी पाठिंबा, गळाठलेला काँग्रेस पक्ष आणि संघ परिवारात आलेला असहिष्णुतेच्या पातळीवरचा एकारलेपणा या साऱ्यांना नितीशकुमार यांच्या विनम्र वागणुकीने व त्यांनी त्या राज्यात घडवून आणलेल्या विकासाच्या कामांनी एकहाती उत्तर दिले आणि दिल्लीकरांचे प्रचंड आक्रमण बिहारच्या सीमेबाहेरच थोपवून धरले. नितीशकुमारांना या निवडणुकीत लालूप्रसादांनी मनापासून साथ दिली आणि पूर्वीचे वैर विसरून त्यांच्या नेतृत्वात ते एखाद्या निष्ठावान अनुयायासारखे सामील झाले. नितीशकुमारांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्यावर टीका येत नसल्याने मोदींच्या प्रचाराचा सगळा भर लालूंच्या जंगलराजावर राहिला. जनतेला यातली खोच व त्यातले राजकारण समजणारे होते. लालूंच्या पक्षाला सर्वाधिक जागा देऊन या जनतेने मोदींचे शब्द त्यांच्याच घशात घातले. आपल्यासाठी मोदी दिल्लीहून किंवा अहमदाबादेतून धावून येणार नाहीत, उलट नितीशकुमार घरचेच आहेत आणि त्यांच्या आपण घेतलेल्या परीक्षेत ते उत्तीर्णही झाले आहेत याची तिला जाणीव होती. नितीशकुमारही साऱ्या प्रचारात शांत, प्रसन्न व हंसरे दिसले. इतर साऱ्यांनी त्यांचा तोल गमावलेला दिसला तरी नितीशकुमारांनी सभ्यतेची कोणतीही मर्यादा आपल्या प्रचारात सोडली नाही. नितीशकुमारांनी त्यांच्या राज्यात ग्रामीण विद्युतीकरण केले नसल्याची टीका मोदींनी केली तेव्हा ‘ती झाली असल्याखेरीज तुमची छवी ग्रामीण जनतेने दूरचित्रवाहिनीवर पाहिली असती काय’ असा सौम्य पण मर्मभेदी प्रश्नच तेवढा त्यांनी विचारला. मोदी स्वत:ला विकासपुरुष म्हणवतात. नितीशकुमारांची प्रतिमाही विकासपुरुषाचीच आहे. पण या निवडणुकीत मोदी आणि त्यांचा पक्ष जाती व धर्मावर उतरले. अखेरच्या क्षणी त्यांनी गायीच्या शेपटाचाही आधार घेतला. नितीशकुमार विजयी झाले तर पाकीस्तानात फटाके फुटतील असे म्हणण्यापर्यंत अमित शाहची मजल गेली. नितीश आणि लालू यांनी पाकीस्तानात जावे असा आदेशही त्यांच्या एका खासदाराने दिलेला दिसला. हा अतिरेक सामान्य जनतेला आवडणारा नाही. त्यामागची तो करणाऱ्याची अगतिकता लवकरच साऱ्यांच्या लक्षात येते. परिणामी मतदानाआधीच अशा निवडणुकीचे निकाल लोकांच्या मनात तयार असतात. मोदींचा आणि त्यांचा संघ परिवाराचा आवाज मोठा, अगदी कानठळ्या बसविणारा होता. लोक मात्र त्यातले सत्यासत्य शांतपणे अनुभवत होते. बिहारच्या निकालांनी एक धडा येथील प्रसिद्धी माध्यमांनाही शिकवला आहे. एकचएक खोटी गोष्ट शंभरदा सांगितली की ती लोकांना खरी वाटू लागते ही गोबेल्सची फसवी शिकवण जर्मनीत चालली तरी ती भारतात चालत नाही हे त्यांच्याही लक्षात आता आले असणार. बिहारच्या निकालांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या परिणामकारकतेसमोरही प्रश्न उभे केले आहेत. या निवडणुकीत भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे न आणता मोदींनाच समोर केले होते. त्यांना बिहारच्या जनतेने प्रचंड बहुमताने नाकारले आहे. मोदींचा उजवा हात समजले जाणारे पक्षाध्यक्ष अमित शाह यांना साधाही चेहरा नाही. तरीही या निवडणुकीत ते मोठ्या संख्येने प्रचारसभा घेताना दिसले. त्यांना जनतेने साफ पराभूत केले आहे. रामविलास पासवान, जीतन मांझी या भाजपच्या मित्र पक्षांनाही जनतेने धूळ चारली आहे. या साऱ्यांसोबत बिहारने केलेला संघाचा पराभव सर्वात मोठा व गंभीर आहे. ऐन निवडणुकीच्या काळात संघाने आरक्षणाबाबत वेगळी भूमिका मांडली. संघाचे सारे स्वयंसेवक साऱ्या शक्तिनिशी या निवडणुकीत उतरलेले दिसले. भाजपची राजकीय बाजू जेवढी भक्कम तेवढीच त्याची आर्थिक बाजूही मोठी होती. दोन डझन हेलिकॉप्टरांचा ताफा, हजारो मोटारगाड्या आणि प्रचारावर प्रचंड खर्च करीत हा पक्ष या निवडणुकीत उतरला होता. मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणतात तसे या धर्मबहुल, संस्कृतीबहुल आणि सहिष्णुता हीच शक्ती मानणाऱ्या सामान्य जनतेने त्या साऱ्यांना या देशाच्या एकात्म जीवनात फारसे व फार काळ स्थान नाही हे दाखवून दिले आहे. त्याच वेळी या जनतेने देशातील सर्वधर्मसमभावाला विजयी करून धर्मांधतेचे राजकारण आम्हाला चालणार नाही हे नेत्यांना बजावले आहे. पाटलीपुत्राच्या या दिल्लीविजयाबद्दल त्याचे अभिनंदन.