पाकिस्तान हे राष्ट्र असे दुतोंडी का?

By Admin | Updated: July 21, 2015 23:33 IST2015-07-21T23:33:40+5:302015-07-21T23:33:40+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उफा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊन भारत-पाक चर्चा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत केल्या

Pakistan is such a double-edged nation? | पाकिस्तान हे राष्ट्र असे दुतोंडी का?

पाकिस्तान हे राष्ट्र असे दुतोंडी का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उफा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊन भारत-पाक चर्चा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. त्या दोघांनी चर्चेबाबत पुढाकार घेतल्याचे घोषित झाल्यापासून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तसेच बिगर अधिकाऱ्यांनीसुद्धा जो मसाला पुरवायला सुरुवात केली आहे, त्याच्या परिणामी नवाज शरीफ यांच्या पुढाकाराविषयी भारतातील टीकाकारांनी संशय घ्यायला सुरुवात केली आहे.
वास्तविक रशिया, चीन इ. राष्ट्रांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत, रशियातील शहरात, पाकिस्तानचे पंतप्रधान भारतीय पंतप्रधानांसोबत थांबलेली चर्चा सुरू करण्याचे ठरवितात, परस्परांच्या जलसीमा उल्लंघनाचा अपराध केल्याबद्दल तुरुंगात असलेल्या परस्परांच्या देशातील कोळ्यांची सुटका करण्यास मान्यता देतात, याशिवाय सीमेवरील गोळीबाराच्या घटना थांबविण्यासाठी कमान्डर्स कॉन्फरन्स आयोजित करण्यास मान्यता देतात तेव्हां परस्परांच्या संबंधातील सतत त्रास देणारा हा प्रकार थांबविण्याची काळजी घेणे हा त्यामागील हेतू स्पष्ट होतो.
उफा शहरातील त्यांच्या रशियन यजमानांनी या दोन नेत्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. चीनचे अध्यक्ष की. यांनी काराकोरम-ग्वादार औद्योगिक आणि वाहतूक कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी ४६०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यास मान्यता दिल्याने भारत-पाकिस्तान यांच्यात शांततेचे वातावरण असणे ही त्यांचीही गरजच आहे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या लख्वीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघात केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लख्वीच्या आवाजाचे नमुने भारतीय पंतप्रधानांकडे सोपविण्याची तयारी दर्शविली. त्या आवाजाच्या आधारे भारतातील लख्वीच्या विरुद्धचा खटला चालविण्यास मदत होणार आहे. याशिवाय आपल्या देशात सुरू असलेल्या त्याच्याविरुद्धच्या खटल्याला गती देण्याचेही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मान्य केले आहे. अमेरिकेचे अनेक नागरिक मुंबईतील हल्ल्यात मारले गेल्यामुळे हा खटला जलद गतीने चालावा असे अमेरिकेलाही वाटते. शांततेसाठी उभय राष्ट्रांनी घेतलेल्या पुढाकाराचे जगाने स्वागतच केले आहे.
पण या दोघांमधील करारावरील शाई वाळण्यापूर्वीच पाकिस्तानातील शरीफ यांच्या विरोधकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अझिझ यांनी स्पष्ट केले की अजेंड्यावर काश्मीरचा विषय असल्याशिवाय कोणतीच चर्चा होणार नाही. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचेही नेमके हेच म्हणणे आहे. काश्मिरातील विभाजनवादी हुरियत परिषदेचे नेते गिलानी यांचेसुद्धा तेच म्हणणे आहे. एकूणच पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना ही शांतता चर्चा नकोच आहे. पाकिस्तानातील या विरोधी भावनांबद्दल नवाझ शरीफ हे मौन पाळून आहेत. आपल्या विरोधकांच्या जंगलातून मार्ग काढून ही शांतता चर्चा पुढे नेणे हाच शरीफ यांचा हेतू आहे. रशिया व चीन ही दोन्ही राष्ट्रे नवाज शरीफ यांना ही चर्चा पुढे नेण्यासाठी सतत आग्रह धरीत आहेत. कारण शांततेला संधी द्यावी असे त्यांना वाटते. पण पाकिस्तानी लष्कराचा अशा चर्चेला विरोध आहे. यापूर्वीही उभय राष्ट्रातील चर्चा यशस्वी होत आहे, असे दिसत असताना भारत-पाक यांच्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर काही ना काही कुरापत काढण्यात आली आहे. सध्या जो तणाव पाहायला मिळतो त्याचे कारण हेच आहे.
विदेशी अभ्यासकांनी तसेच पाकिस्तानी अभ्यासकांनीसुद्धा अलीकडे पाकिस्तानविषयी जी पुस्तके प्रकाशित केली आहेत, त्यातून पाकिस्तानच्या लष्करी तसेच स्थानिक धोरणावर पाकिस्तानच्या लष्कराचा तसेच मुल्लामौलवींचा कसा पगडा आहे हेच दिसून येते. पाकिस्तानचे मुत्सद्दी हुसैनी यांचे ‘लष्कर व मुल्ला यांच्या तावडीतील पाकिस्तान’ हे पुस्तक त्याचे द्योतक आहे. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे स्थानिक सुरक्षा सल्लागार अझीझ हे आपल्या पंतप्रधानांच्या म्हणण्याच्या विरोधात वक्तव्य करतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यावरून इस्लामाबादेत खरी सत्ता कुणाची असा प्रश्न विचारणे भाबडेपणाचे ठरेल.
पाकिस्तानातील मुल्ला मौलवी आणि दहशतवाद्यांचे नेते हे काही क्षणात गर्दी जमा करू शकतात. कारण पाकिस्तानातील मदरशांमध्ये हिंदूविरोधी भावनांचीच शिकवण दिली जाते. क्रमिक पुस्तकातूनही याच भावनेचा उच्चार करण्यात येतो हे अनेकांनी दाखवून दिले आहे. पाकिस्तानी जनतेचे पोषण याच हिंदूविरोधी भावनांवरच करण्यात येते.
पाकिस्तानी लष्कर दहशतवादाचा पुरस्कार करण्यामागे वेगळे कारण आहे. पण धार्मिक आधारावर पोसला जाणारा दहशतवाद हा सर्वस्वी वेगळा आहे. हाच दहशतवाद पाकिस्तानातील प्रार्थना स्थळांवर बॉम्बहल्ले करीत असतो. या दहशतवाद्यांनी संपूर्ण देशावर आपले दहशतवादी साम्राज्य निर्माण केले आहे. अशा स्थितीत देशातील मुलकी सत्तेविषयी ते विश्वासाची भावना कशी निर्माण होऊ देतील? पाकिस्तानच्या शेजारी राष्ट्रांनी या वास्तवाचे भान ठेवायला हवे. केवळ भारतच नव्हे तर अफगाणिस्तानवरही पाकिस्तानी दहशतवाद्यांचे लक्ष आहे. बिगर सुन्नी इस्लामी राष्ट्र असलेले इराण हे दहशतवाद्यांच्या कारवायांना सहज बळी पडत असते.
रालोआ सरकारचे पंतप्रधान या नात्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला होता. पण पाकिस्तानातील लष्कराने कारगीलवर हल्ला करून या पुढाकाराला प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानातील मुलकी राजवट उलथवून टाकल्यावर लष्करशहांनी भारतातील संसद भवनावर हल्ल्याचे नियोजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने जिहादींनी मुंबईवर अत्यंत नियोजितपणे हल्ला केला होता. काश्मिरात दहशतवादी पाठविण्याचे कारस्थान नेहमीच सुरू असते. तसेच शांतता चर्चा उधळून लावण्यासाठी प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्यामुळे पाकिस्तान सरकारसोबत चर्चा करताना संशयाचे वातावरण मुद्दाम निर्माण करण्यात आले आहे. याहीवेळी भारतीय पंतप्रधानांनी चर्चेसाठी हात पुढे केला आहे. पण ती चर्चा यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे. एखाद्या चमत्कारानेच तसे काहीतरी घडू शकेल.

Web Title: Pakistan is such a double-edged nation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.