पाक : १९४०-२०१५, भारत : १९३१-२०१५

By Admin | Updated: March 18, 2015 23:11 IST2015-03-18T23:11:51+5:302015-03-18T23:11:51+5:30

या लेखाचं हे शीर्षक बहुतेकांना अनाकलनीय वाटेल. किंबहुना प्रथमदर्शनी ते तसं आहेही. आजकाल आपल्याकडं इतिहासात डोकावून वर्तमानकाळातील युक्तिवाद करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे

Pak: 1 940-2015, India: 1931-2015 | पाक : १९४०-२०१५, भारत : १९३१-२०१५

पाक : १९४०-२०१५, भारत : १९३१-२०१५

या लेखाचं हे शीर्षक बहुतेकांना अनाकलनीय वाटेल. किंबहुना प्रथमदर्शनी ते तसं आहेही. आजकाल आपल्याकडं इतिहासात डोकावून वर्तमानकाळातील युक्तिवाद करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे आणि त्याद्वारं विद्यमान राजकारणातील हिशेब चुकते करण्याकडं कल वाढत चालला आहे. म्हणून इतिहासाकडं मागं वळून बघताना कोणी काय केलं, याचा लेखाजोखा वृत्तपत्रीय लेखाच्या शब्दमर्यादेचं भान ठेवून सूत्ररूपानं घेण्याचा हा प्रयत्न आहे.
आत्ताच का? ..कारण येत्या सोमवारी २३ मार्चला मुस्लीम लीगनं लाहोर येथील अधिवेशनात केलेल्या पाकिस्तानच्या ठरावाला ७५ वर्षे पुरी होत आहेत. लाहोर येथे २२ ते २४ मार्च १९४० या कालावधीत हे अधिवेशन झाले. हा ठराव प्रत्यक्षात २४ मार्च १९४० रोजी संमत झाला. पण पाकच्या इतिहासात २३ मार्च १९४० हीच अधिकृत तारीख मानली जाते.
याच मार्च महिन्यात नऊ वर्षे आधी कराची येथे २६ ते २९ मार्च १९३१ रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्या’चा ठराव संमत झाला होता. स्वतंत्र भारत कसा असेल, याचं चित्र या ठरावात प्रतिबिंबित झालं होतं. सर्वसामान्यांसाठी मूलभूत हक्क आणि त्यांच्या विकासासाठीचा आर्थिक कार्यक्रम, शिवाय त्याच्या जोडीला सर्व धर्म, जाती, वंश, भाषागट यांना त्यांच्या अभिव्यक्ती, आचार, विचार, संघटन, श्रद्धा इत्यादींच्या संदर्भात स्वातंत्र्य उपभोगण्याचा हक्कही या ‘संंपूर्ण स्वराज्या’ ठरावात मान्य करण्यात आला होता.
याच १९३१ साली मार्च महिन्याच्या १९ तारखेला डॉ. बाळकृष्ण शिवराम (बी.एस.) मुंजे हे रोम येथे इटलीचा सर्वेसर्वा मुसोलिनी याला भेटत होते. या भेटीचा वृत्तांंत मार्झिया वॅससोलारी या संशोधक महिलेने ‘हिंदुत्वाज फॉरिन टाय-अप्स इन द थर्टीज अर्कायव्हल एव्हिडन्स’ या आपल्या अभ्यासात दिला आहे. तो डॉ. मुंजे यांच्या रोजनिशीवर आधारित आहे. त्यात डॉ. मुंजे म्हणतात की, ‘मुसोलिनी यानी मला गोलमेज परिषदेत काय होईल, असा प्रश्न विचारला. त्यावर मी म्हणालो की, ब्रिटिशांनी जर प्रामाणिकपणं भारतीयांना वसाहतिक राज्य (डॉमिनियन स्टेट्स) दिलं, तर ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला कोणताच अडथळा उरणार नाही.’ या इटलीच्या भेटीत डॉ. मुंजे यांच्या मुसोलिनीशी झालेल्या भेटीसाठी ब्रिटिश सरकारनं कसा हातभार लावला होता, हेही वॅससोलारी यांनी पुराव्यानिशी दाखवलं आहे. या इटली भेटीत मुसोलिनीच्या कारभारानं, त्याच्या राजकारणानं, त्या देशातील समाजव्यवस्थेनं, देशाच्या भरभराटीनं डॉ. मुजे कसे प्रभावित झाले होते आणि एकाधिकारशाही राजवटच कशी उपयुक्त ठरेल, हा विचार त्यांच्या मनात कसा रूजत गेला, हेही वॅससोलारी यांनी डॉ. मुंजे यांच्या कागदपत्रांच्या आधारेच दाखवून दिलं आहे. भारतात असं संघटन करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना आहे व तिचा विस्तार होण्यासाठी मी आता प्रयत्नाला लागणार आहे, याचे उल्लेख डॉ. मुंजे यांच्या इटली भेटीच्या नोंदीत
कसे आहेत, हेही वॅससोलारी दाखवून देतात. त्याचबरोबर डॉ. मुंजे व डॉ. हेडगेवार यांच्यातील वैचारिक एकवाक्यतेची संघटन सहकार्याची अनेक उदाहरणं वॅससोलारी यांनी दिली आहेत.
नंतर भारतात आल्यावर याच डॉ. मुंजे यांनी या विचारांच्या आधारे नाशिकमध्ये ‘भोसला मिलिटरी स्कूल’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला. काँग्रेस ‘संपूर्ण स्वराज्या’चा ठराव करीत असताना हे घडत होतं.
पुढं सावरकरांची सुटका झाली. तेव्हा युरोपात युद्धाचं वारं घोंघावू लागलं होतं. अशावेळी १४ आॅक्टोबर १९३८ ला एका सभेत बोलताना सावकर यांनी हिटलरच्या ज्यूविरोधी मोहिमेचा उल्लेख करून भारतातील मुस्लीम प्रश्नावर तोडगा सुचवला. ‘बहुसंख्याकांमुळं राष्ट्र तयार होतं. जर्मनीत ज्यूंनी काय केलं? ते अल्पसंख्य असल्यामुळं त्यांना हाकलून देण्यात आलं’. त्याच वर्षीच्या अखेरीला ठाण्यात झालेल्या एका सभेत सावरकर म्हणाले होते की, ‘जर्मनीत हिटलरनं जी मोहीम हाती घेतली आहे, तो राष्ट्रवादाचा हुंकार आहे, तर ज्यू हे जातीयवादी आहेत’.
याच वेळी काँग्रेसनं जर्मनीतील घडामोडींचा निषेध करणारा ठराव केला होता आणि त्याबद्दल सावरकरांनी नेहरूंवर टीकास्त्र सोडलं होतं की, ‘नाझींनी इतक्या सुंदररीत्या देशाची पुनर्बांधणी करून जर्मनी सर्वशक्तिमान बनवला, जर्मनीला काय उपयुक्त हे हिटरला कळतं, ते सांगणारे नेहरू कोण?’
पाकिस्तानच्या ठरावाला येत्या २३ तारखेला ७५ वर्षे होत असताना त्या देशाची काय अवस्था आहे, ते आपण बघत आहोत. उलट ‘संपूर्ण स्वराज्या’चा ठराव १९३१ साली करणाऱ्या काँग्रेसनं देश उभा केला, हे खरं. पण त्या काळाच्या काँग्रेस नेत्यांच्या राजकीय वारसदारांनी उतून मातून हा वसा टाकून दिल्यामुळं हिटलर व मुसोलिनी यांचा गौरव करणाऱ्यांच्या हाती सत्ता आली आहे. ‘मोदी हे सावरकरांना अपेक्षित होते, असे भारताचे पंतप्रधान आहेत’, असं मध्यंतरी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत ‘आॅर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्राचे माजी संपादक शेषाद्री चारी यांनी उघडपणं मान्य केलं होतं.
याच मोदी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नेमलेले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भोसला मिलिटरी स्कूल’मधील समारंभात डॉ. मुंजे यांच्या हिंदी चरित्राचं प्रकाशन झालं. ‘डॉ. मुंजे यांनी तरुणांतील पुरुषार्थ जागवला’, असा गौरव फडणवीस यांनी केला. हिंदुत्ववादी दहशतवाद्यांच्या प्रकरणात हेमंत करकरे यांनी याच संस्थेची चौकशी केली होती. या समारंभाच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथील पोलीस मुख्यालयाचं उद्घाटन केलं होतं. त्याच दिवशी तिकडे कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर अंत्यसंस्कार होत होते. पानसरे यांना हिंदुत्ववादी धमकावत होते.
हा सगळा घटनाक्र म बघितल्यास, ‘डॉ. मुंजे यांनी पुरुषार्थ जागवला’, असं मुख्यमंत्रीच म्हणत असतील, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्यांचा शोध पोलीस कसा घेतील?

प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

Web Title: Pak: 1 940-2015, India: 1931-2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.