चित्रकारांच्या टोपणनावानिमित्त...
By Admin | Updated: June 12, 2016 05:33 IST2016-06-12T05:33:12+5:302016-06-12T05:33:12+5:30
चित्रकार-मुखपृष्ठकार रविमुकुल यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे जाहीर मुलाखतींचा कार्यक्रम झाला. साहित्य परिषदेच्या इतिहासात एखाद्या चित्रकाराचा असा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ!

चित्रकारांच्या टोपणनावानिमित्त...
- रविप्रकाश कुलकर्णी
चित्रकार-मुखपृष्ठकार रविमुकुल यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे जाहीर मुलाखतींचा कार्यक्रम झाला. साहित्य परिषदेच्या इतिहासात एखाद्या चित्रकाराचा असा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ!
दलाल १९३८ च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या 'वैमानिक हल्ला' या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली. (जाता-जाता - ज्याला मुखपृष्ठ म्हणता येईल, असे पहिले मुखपृष्ठ कुणाचे असेल? वि. स. सुखटणकर यांच्या 'सह्याद्रीच्या पायथ्याशी'चे मुखपृष्ठ असे होते, असे म्हणतात.
आपल्याकडे चित्रसाक्षरता आता कुठे रूजू लागली आहे. हे खरेच, पण त्याच्याबरोबर असेही म्हणता येईल की, साहित्यातदेखील चित्रकलेइतकी रुची असणारा रविमुकुल हा कलाकार असल्यामुळे त्याच्या चित्रकारीचा उचित सन्मान केला गेला असावा. या अनुषंगाने बोलणे होत असताना मुद्दा असाही आला की, रविमुकुल हे टोपणनाव. टोपननाव घेऊन चित्र काढणारा हा एकमेव चित्रकार असावा. (जाता-जाता या चित्रकाराचे खरे कागदोपत्री नाव विश्वास मुकुंद कुलकर्णी. मग त्यांनी रविमुकुल हे नाव का घेतले? त्याचा खुलासा त्यांच्याच शब्दात. ‘र’ हे अक्षर त्यांच्या रमेशमामावरून घेतले. कारण विश्वासने चित्रकलेची प्रेरणा या मामांकडून घेतली. हे मामा अकाली गेले, म्हणून त्यांच्या वंश म्हणून ‘र’ आला. वि. हे अक्षर माझा विश्वास नावातले. ‘मु’ म्हणजे माझ्या वडिलांच्या मुकुंद नावातले आणि कुल हा कुलकर्णीचा शॉर्टफॉर्म. अर्थात, याचाच पडसाद म्हणून की काय माहीत नाही, पण सो. कुल (सोनाली कुलकर्णी), रघुकुल (रघुवीर कुलकर्णी असे कुल शोधता येतील..), तर टोपणनाव असणारा रविमुकुल हा एकमेव चित्रकार असावा.
तेव्हा चित्रकार रविमुुकुल म्हणाले, ‘टोपणनाव घेतलेला मी पहिला चित्रकार नक्कीच नाही. दीनानाथ दलाल हे नाव पण टोपणनाव आहे!’
अर्थात, ही माहिती सर्वस्वी नवीनच. दलालांच्या जन्मशताब्दी निमित्ताने भरभरून लिहून झाले, अजूनही लिहून येईल. (जन्म ३0 मे १९१६, मृत्यू १५ जानेवारी १९७१), पण त्या लेखनात सर्वत्र दीनानाथ दलाल अशीच नोंद दिसते.
त्यामुळे रविमुकुल यांना म्हटले, या गोष्टीची खातरजमा कशी, कुठे करायची?
तेव्हा ते म्हणाले, ‘विवेक’तर्फे दृष्यकला खंड प्रकाशित झालेला आहे. त्यात ही नोंद पाहा आणि खातरजमा करून घ्या!
‘विवेक’चा दृष्यकला खंड (केव्हाच) आउट आॅफ प्रिन्ट झालेला आहे, हेदेखील आश्चर्यच. त्यामुळे आता हा खंड चटकन कुणाकडे उपलब्ध होईल हा प्रश्न पडला, पण सुदैवाने डोंबिवली पश्चिम येथे असलेल्या डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाने हा खंड उपलब्ध करून दिला. (हे ग्रंथालय पोलीस स्टेशनच्या वर आहे, हे पण त्याचे वेगळेपण...)
या कोषात नोंद आहे, जनसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत लोकप्रिय असलेले आणि पुस्तकांची मुखपृष्ठे, कथाचित्रे, व्यंगचित्रे, दिनदर्शिका आणि दिवाळी अंकामधील चित्रमालिकांच्या माध्यमातून दृष्यजाणिवा समृद्ध करणारे चित्रकार म्हणून दीनानाथ दलाल सर्वांना परिचित आहेत.
दीनानाथ यांचा जन्म निसर्गसौंदर्याने संपन्न आणि कलासौंदर्याने नटलेल्या गोव्याच्या मडगावातील कोम्ब या पाड्यात झाला. नृसिंह दामोदर दलाल नाईक हे त्यांचे मूळ नाव. ‘दीनानाथ दलाल’ या टोपननावाने त्यांनी पुढे व्यवसाय केला (पृष्ठ २0९)
डॉ. स्वाती राजवाडे, शकुंतला फडणीस यांनी दृष्यकला खंडातील केलेल्या या नोंदीत काही माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ, त्या नोंदीत म्हटले आहे, या निमित्ताने दीनानाथ दलालांसंबंधात विशेषत: त्यांच्या चित्रावरील स्वाक्षरीसंबंधी थोडेसे- दीनानाथ यांच्या सुरुवातीच्या मुखपृष्ठ, चित्रांवर दलाल ही अक्षरे रोमन लिपीत दिसतात. विशेषत: डी हा त्रिकोणासारखा असतो, जो त्रिकोण पुढे (अर्थात फिरवून) मराठी-देवनागरी ‘द’ च्या भोवताली आला. काही काळ चित्रांवर दलाल ही प्रवाही अक्षरे म्हणून दिसतात. त्यानंतर, काही काळ चित्रात कोपऱ्यात त्रिकोणात ‘फ’चा रंगीत ‘द’ स्वाक्षरी म्हणून दिसतो आणि नंतरच्या बहुतेक चित्रात लाल-निळ्या पोकळ वा भरीव त्रिकोणात ‘द’ हे अक्षर ही स्वाक्षरी ठरू लागली.
त्या संबंधात असे म्हटले जाई.
‘कलाक्षरे’ मधील या टिपणाद्वारे जाणकारांना विनंती आहे, ती अशी-
दीनानाथ दलाल हे टोपणनाव दलालांनी कसे आणि केव्हापासून घेतले?
- इंग्रजी म्हणजे रोमन अक्षरापासून ते देवनागरी अक्षरांपर्यंत दलाल ही स्वाक्षरी आली आणि पुढे त्रिकोणातला रंगीत ‘द’ आला. हा स्थित्यंतराचाच खुलासा कोणी कधी केला आहे का?
खुद्द दलालांनी याबाबत काही कुठे म्हटले आहे का? आणखी थोडेसे. ‘लोकमत’तर्फे गेल्या दोन वर्षांपासून मुखपृष्ठकारांना पुरस्कार द्यायला सुरुवात झाली आहे, हे चांगलेच आहे, पण या निमित्ताने मुखपृष्ठकारांचे मनोगत घ्यायला काय हरकत आहे? विचार व्हावा, तर असो.
दीनानाथ दलाल हे टोपणनाव आहे, हे कळल्यानंतर मुखपृष्ठ आणि मुखपृष्ठकारांबाबत असे काही-बाही सुचत गेले. मुखपृष्ठकारांना काही वाटते का?