इथले आभाळ त्याच्या मालकीचे...
By गजानन जानभोर | Updated: February 20, 2018 04:00 IST2018-02-20T03:58:56+5:302018-02-20T04:00:55+5:30
‘काय म्हणते, काय म्हणते...मिलोची भाकर खाय म्हणते’ हे गाणे अनिरुद्ध तळमळीने गातो. आदिवासींच्या दु:खाची सनातन कारणे या गाण्यातून मांडताना तो संतापतो आणि कधीकधी निराशही होतो.

इथले आभाळ त्याच्या मालकीचे...
‘काय म्हणते, काय म्हणते...मिलोची भाकर खाय म्हणते’ हे गाणे अनिरुद्ध तळमळीने गातो. आदिवासींच्या दु:खाची सनातन कारणे या गाण्यातून मांडताना तो संतापतो आणि कधीकधी निराशही होतो. डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरील चित्रपटात हे गाणे आधी चित्रबद्ध करण्यात आले. ते अनिरुद्धनेच लिहिले, त्यानेच संगीतबद्ध केले व गायलेदेखील त्यानेच. प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित झाला, त्यात मात्र हे गाणे पुसटसे दाखविण्यात आले. ‘ ते या सिनेमात पूर्ण का नाही? ’ अनिरुद्ध बोलत नाही, ‘दिग्दर्शकाचा अधिकार’ एवढेच तो सांगतो. हा सिनेमा लोकप्रिय झाला. डॉ. आमटेंच्या सेवाभावाची कीर्ती साºया जगात पोहोचली. परंतु ज्यांच्यासाठी डॉ. आमटेंनी आपले सर्वस्व दिले त्या आदिवासींच्या दुर्दैवाचे दशावतार मात्र अलक्षितच राहिले. दिग्दर्शकाला कदाचित डॉ. आमटेंच्या कार्यावरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने मूळनिवासींच्या हालअपेष्टा दुय्यम ठरल्या. आदिवासींचे पिढ्यान्पिढ्यांचे दु:खहरण करण्यासाठी नक्षलवादी ज्या भागात आले तिथेच डॉ. प्रकाश आमटेही गेले. पण, दोघांचीही साधने वेगळी होती. एकाचा मार्ग हिंसेचा, तर दुसºयाचा सेवेचा. नक्षलवाद्यांना त्या भागातील लोकांनी असहाय्यतेतून स्वीकारले तर डॉ. आमटेंना देवदूत म्हणून. अनिरुद्धला या गाण्यातून हेच सांगायचे होते, पण राहून गेले...त्याला ती सल सतत बोचत असते. आंबेडकरी जलशात मग तो पेटून उठतो, ‘‘भीम कोठे पाहू , माझा भीम कोठे पाहू’’...ऐकताना रोमांच उभे राहतात.
अनिरुद्ध वनकर...आंबेडकरी जलशामुळे त्याला आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तसा तो झाडीपट्टीतील प्रतिभावंत कलावंत. गायक, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, निर्माता... सब कुछ अनिरुद्ध. तो रंगमंचावर आला की सर्वत्र व्यापून जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात बोरगाव या खेड्यातील तो राहणारा. वडील कोंबड्यांची कावड घेऊन रोज २५ कि़ मी. पायपीट करायचे, आई मजुरीवर जायची. गावशिवारातील कार्यक्रमांत तो गायचा. हळूहळू चळवळीत सक्रिय झाला. ‘द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता’ हे अनिरुद्धचे गाजलेले नाटक़ ‘कशी दारुड्याची धुरा मायच्या अंगावर आली...हे खेमराज भोयरचे गाणे ऐकताना बाया-बापड्यांच्या डोळयातून अश्रू वाहत असतात. सात-आठ सिनेमांतही त्याने काम केले आहे. ‘मी वादळवारा’ हा त्याचा आणखी एक कार्यक्रम. ३५ पोरांना घेऊन हा फिरस्ता वर्षभर हिंडत राहतो. काहीसा भणंग आणि बराचसा अवलिया...
तो तब्बल चार विषयात एम. ए. आहे. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये त्याने काही वर्ष प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून नोकरीही केली. मुलाखतीच्यावेळी नसिरुद्दीन शहाने वन्समोअर म्हटले आणि ओमपुरींनी शाबासकी दिली. पण, तिथेही तो रमला नाही. पुन्हा झाडीपट्टीत परतला. नाटक सुरू असतानाच वडील वारले. पण प्रयोग थांबविला नाही, सकाळी बापावर अंत्यसंस्कार करून तो रंगमंचावर परतला. परभणीच्या कार्यक्रमात बहीण वारल्याचे कळले. पण त्याचे गाणे थांबले नाही. वैयक्तिक आयुष्यातील असे अनेक आघात अनिरुद्ध पचवत असतो. पण, आपल्यातील कलावंताला, कार्यकर्त्याला तो मरू देत नाही. ‘बाबासाहेबांना आम्ही कव्वालीपुरते मर्यादित केले’, ही अनिरुद्धची खंत. या कळकळीतूनच त्याने ‘मी वादळवारा’ सुरु केला आहे.एखाद्या सिनेमातून राहून गेलेल्या गोष्टी त्याला इथे सांगायच्या आहेत. कुणाची सेंसॉरशिप नाही, दिग्दर्शकाचे बंधन नाही, सिनेमातील नायकाच्या आवडीनिवडीही इथे आड येत नाहीत. त्यामुळे इथले आभाळ त्याच्याच मालकीचे आहे...
- गजानन जानभोर (gajanan.janbhor@lokmat.com)