योगाला विरोध म्हणजे मध्ययुगीन काळाकडे जाणे

By Admin | Updated: June 17, 2015 03:45 IST2015-06-17T03:45:38+5:302015-06-17T03:45:38+5:30

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने २१ जूनच्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस पाळण्यास नकार दिला, हे काही आश्चर्य नव्हते. या विषयावर अनेक धर्मनिरपेक्षतावादी त्यांच्या पाठीशी होते,

The opposition of yoga is to medieval times | योगाला विरोध म्हणजे मध्ययुगीन काळाकडे जाणे

योगाला विरोध म्हणजे मध्ययुगीन काळाकडे जाणे

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने २१ जूनच्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस पाळण्यास नकार दिला, हे काही आश्चर्य नव्हते. या विषयावर अनेक धर्मनिरपेक्षतावादी त्यांच्या पाठीशी होते, यातही आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण देशातील मुस्लीम नेतृत्व हे कर्मठ असून त्यांना मध्ययुगीन काळातच जायचे आहे, हेही स्पष्ट झाले. हा विरोध करणे हे मुस्लीम समाजाच्या कितपत हिताचे आहे, हे त्या समाजाच्या लाभार्थ्यांनीच ठरवायचे आहे.
प्रतिगामी पावले उचलायची हे बोर्डाचे उद्दिष्ट आहे, ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित महिलेला पोटगी देण्याच्या निर्णयाला बोर्डाने विरोध केला तेव्हा दिसून आली. त्यांच्या परंपरेने घटस्फोटित महिलेला पोटगी देण्यास नकार दिलेला आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी या समाजाच्या कर्मठांपुढे शरणागती पत्करली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला नाकारले. त्यांची कृती इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या पकडीतून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम मानसिकतेचे प्रयत्न विफल करणारी होती.
तेव्हापासून हा समाज सतत मध्ययुगीन काळाकडे घसरत चालला आहे. त्यामुळे या समाजाची उदारमतवादी क्षमता ही काहीशी बाजूला पडली आहे. बाबरीच्या विषयापासून तस्लिमा नसरिनच्या पुस्तकापर्यंत हा समाज मागील युगाकडे जाताना दिसत राहिला. सातव्या शतकातील खलिफापासून ही संस्था एक आदर्श ठरून तंत्रज्ञानाच्या युगाकडे जात होती. पण ते सारे व्यर्थ ठरते आहे. तरीही या समाजातील बरेच लोक अशा तऱ्हेच्या कर्मठपणाला नाकारत आहेत, ही गोष्ट इमामांच्या संघटनेचे सदस्य पंतप्रधानांना भेटून आंतरराष्ट्रीय योगदिनाला समर्थन देत होते तेव्हा पाहावयास मिळाली.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने चुकीचा निर्णय घेतला आहे. कारण गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रसंघात भाषण देताना हा दिवस योगदिन म्हणून पाळण्यात यावा असे सुचविले होते व १७७ राष्ट्रांनी त्यास पाठिंबा दिला होता. आता तर आंतरराष्ट्रीय योगदिनात १९२ राष्ट्रे सहभागी होत आहेत. त्यापैकी अनेक राष्ट्रे मुस्लीम बहुमत असलेली आहेत.
या प्रशंसेपासून मुस्लीम कर्मठवादी स्वत:ला दूर ठेवू इच्छितात आणि त्यांनी समाजाला या प्रसंगाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्याला विरोध करण्यास सांगितले आहे. योगातील प्राणायामालाही त्यांचा विरोध आहे. पण त्यांनी लक्षात घ्यायला हवे की एकट्या अमेरिकेत ७०० योग केंद्रे आहेत. याशिवाय बरीच केंद्रे कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इ. राष्ट्रातही आहेत. तेथे भारतातील योग शिक्षकांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परदेशात तर स्थानिक हिंदू समाजाव्यतिरिक्त इतर लोकही योग शिकवीत असतात. योगाला वैज्ञानिक समूहाकडूनही पाठिंबा मिळत आहे. ब्लूमबर्गच्या २१ नोव्हेंबर २०१३ च्या अहवालात म्हटले आहे, ‘योगा आणि ध्यानधारणा यामुळे तणाव नाहीसा होतो तसेच रोगही दूर होतात असे दिसून आले आहे.’ त्या अहवालात नमूद केले आहे की, मॅसाच्युसेटस् शासकीय इस्पितळाने योगाच्या परिणामांचा शोध घेण्यासाठी पाच वर्षांचा कार्यक्रम आखला आहे.
भारतीय प्राचीन परंपरांचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले यांनी आपल्या ‘योगा अ‍ॅण्ड आयुर्वेद’ या पुस्तकात योग आणि आयुर्वेद ही परस्पराशी संबंधित विज्ञाने आहेत, असे नमूद केले आहे. योगातून आरोग्य व आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग साधता येतो, असेही त्यांनी मान्य केले आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा सर्व राष्ट्रीय प्रतीकांना विरोध आहे का, हेही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आपल्या राष्ट्राचे बोधवाक्य ‘सत्यमेव जयते’ किंवा अशोक चक्र हे राष्ट्रीय प्रतीक ते अमान्य करणार आहेत का, हेही त्यांनी स्पष्ट करायला हवे. कारण ही प्रतीकेसुद्धा हिंदू पुराणातूनच घेण्यात आलेली आहेत! ज्या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी बाह्या सरसावून योगाच्या शिक्षणाला आणि भगवत्गीतेच्या शाळेतील पठणाला विरोध चालविला आहे, त्यांनी हेही सांगावे की, तेही भारतीय परंपरांपासून दूर राहण्याच्या इस्लामी कर्मठांचे समर्थक आहेत!
दुर्दैवाने या देशात हिंदू परंपरांपासून वेगळे करता येईल, अशी एकही गोष्ट नाही. भारतीय शास्त्रीय संगीत हेही हिंदू परंपरेतूनच पुढे आले आहे. मग पर्सनल लॉ बोर्ड या संगीतालाही विरोध करणार आहेत का? कथ्थक नृत्यात किंवा भरतनाट्यम्मध्येही हिंदू परंपराच आढळून येते. त्याचा आधार नाट्यशास्त्र हे आहे. भारताच्या शिल्पकलेतूनही दैवी आनंद प्राप्त करण्याचाच प्रयास होताना दिसतो. मुस्लीम शाळांमधून गाण्यात येणारी गाणी ही भारतीय रागावरच आधारलेली असतात, ही गोष्ट मुस्लीम समाजाच्या मुखंडांनी लक्षात घ्यायला हवी. प्रसिद्ध वादक उस्ताद अल्लाउद्दीन खान आणि डागर बंधूसुद्धा आपल्या गाण्यातून भक्तिरसच आळवीत असतात, जो भारतीय परंपरेतूनच आलेला आहे. त्यांच्या गायनातून दैवी शक्तीशी तादात्म्य होण्याचाच भाव व्यक्त होत असतो.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड हे आपल्या समाजाला वहाबी तत्त्वातून प्राप्त झालेल्या नव्या विचारामुळे भारतीय विचारांपासून दूर ठेवण्यात यशस्वी होतो का, तेच आता बघायचे आहे. ते जर समाजाला योग दिनापासून दूर ठेवण्यात यशस्वी झाले तर ते देशाचे सांस्कृतिक विभाजन घडवून आणण्याच्या दिशेने जाणार आहेत, असेच म्हणावे लागेल. इतिहासाची जाणीव असलेल्या व वैज्ञानिक मनोभूमिका असलेल्या व्यक्ती या वहाबी मानसिकतेला विरोध करीत असल्याचे मुस्लीम राष्ट्रातच पाहावयास मिळते.
काही मुस्लीम स्वत:ची भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. योगाच्या संदर्भातदेखील ते स्पष्टता मांडून देशाचे सांस्कृतिक विभाजन करण्यास विरोध करतील, असा विश्वास वाटतो. २१ जून या दिवशी सूर्य हा जास्त काळ आपल्याला दिसतो. मग इस्लामी नेतृत्वाने ही गोष्ट नाकारली तरीही हे घडणारच आहे!

- बलबीर पुंज
(राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)

Web Title: The opposition of yoga is to medieval times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.