छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही चिडतो, संतापतो. सगळ्या गोष्टीत आम्हाला मालकी हक्क हवा आहे. वस्तू असो की व्यक्ती, आम्हाला त्यावर हक्क सांगायचा असतो. त्यातूनच एखादी सुंदर मुलगी आपल्याला आवडली आणि ती आपल्या प्रेमाचा स्वीकार करत नाही असे वाटले की आपल्यातली मालकी वृत्ती लगेच जागी होते आणि आपण वाट्टेल ते झालं तरी तिला मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो. ही कसली पाशवी वृत्ती..? जर ती आपल्याला मिळत नसेल तर ती दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही ही कसली विकृती..? याची उत्तरं शोधायची कुठे?
महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, पण आम्ही खेडी ओस करून टाकली. तर शहरांच्या जवळ असणारी गावं शहराच्या आत कधी आली हे त्या गावांनाही कळाले नाही. गावातल्या पोरांना तालुक्यातल्या पोरासारखी शान मारावी वाटते... तालुक्यातली पोरं जिल्ह्याच्या पोरांशी बरोबरी करू लागतात... तर जिल्ह्याच्या पोरांना पुण्या-मुंबईच्या पोरांसारखे स्टायलिश राहावे वाटू लागते. ही न संपणारी भूक वेळीच ओळखली नाही तर ती आपल्यातल्या स्वत्वालाच कधी खाऊन टाकते तेही कळत नाही.
राज्यात ५५ टक्के शहरीकरण झाले आहे. ग्रामीण भागात जाण्याची कोणाची इच्छा उरलेली नाही. गावाच्या पारावर, एसटी स्टँडजवळील चहाच्या गाडीवर अथवा पानटपरीवर बेकारांचे तांडे हे आता कॉमन चित्र झाले आहे. त्यातच ‘करलो दुनिया मुठ्ठीमे’ म्हणत मोफत इंटरनेटने अवघे जग गावागावातल्या तरुणांच्या हाती दिले. हातातल्या स्मार्टफोनवर काहीही बघता येऊ लागले. ते पाहून तसे करण्याची वृत्ती वाढू लागली. मग तो हिंसाचार असो की अनैसर्गिक सेक्स. जे जे पाहू ते ते करण्याची लालसा विकृतीच्या टोकाला कधी गेली हेही कळेनासे झाले आहे.
या सगळ्यात कधी धर्माच्या नावाने, तर कधी जातीच्या नावाने, तर कधी महापुरुषांच्या नावाने दंगे, धोपे घडवण्यात राजकीय पक्ष धन्यता मानू लागले. विकासाच्या गोष्टी करणारे सोयीनुसार, देव, देश अन् धर्मासाठी माथी भडकवण्याचे काम करू लागले. या सगळ्यातून एक विदारक वास्तव गावोगावी दिसत आहे. आमच्या भावनादेखील इतक्या बोथट आणि उथळ होऊ लागल्या आहेत की एखादी घटना घडली की आम्ही कामधंदे सोडून त्याच घटनेच्या मागे धावत राहतो. प्रिन्स नावाचा मुलगा जेव्हा एका बोअरवेलमध्ये पडला तेव्हा देशातले सगळे चॅनेल्स चोवीस तास त्याच एका घटनेचे कव्हरेज दाखवत होते.