वेध - जादुई खड्ड्याची जलनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:11 IST2017-05-03T00:11:54+5:302017-05-03T00:11:54+5:30
दुष्काळ, कर्जबाजारी व्यवस्था, बेभाव झालेला हमीभाव अशा एक ना अनेक संकटांचा सामना करीत कष्टाने शेती जगविणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ दिले

वेध - जादुई खड्ड्याची जलनीती
दुष्काळ, पाणीटंचाईच्या झळांनी कळवळणाऱ्या माणसांना जादुई खड्ड्याच्या (शोषखड्डा) प्रयोगाने शंभरावर गावांत आधी डासमुक्ती दिली़ आता त्याच खड्ड्यातील मुरलेले कोट्यवधी लिटर पाणी गावागावांतील भूजल पातळीत वाढलेले दिसत आहे़ त्याचा पांडुर्णी ते लांजी हा सुखद अनुभव दीर्घकालीन परिणाम साधणारा आहे़
दुष्काळ, कर्जबाजारी व्यवस्था, बेभाव झालेला हमीभाव अशा एक ना अनेक संकटांचा सामना करीत कष्टाने शेती जगविणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ दिले तर गावपातळीवर आदर्श व्यवस्था उभी राहू शकते़ त्याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील शंभरावर गावांनी दाखवून दिला आहे़ शोषखड्ड्याद्वारे डासमुक्ती केली़हा पॅटर्न सबंध राज्यात राबविण्याचे आदेश निघाले़ एकीकडे गावात रस्त्यावर सांडपाणी दिसत नाही, डासमुक्ती झाल्याने रोगराई पळाली़ त्यात प्रारंभी न दिसलेला जलपातळीत वाढ होण्याचा लाभ हा गावकऱ्यांसाठी सुखद आहे़ विशेषत: पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असताना टेंभुर्णी, लांजी, खडकमांजरी अशा कैक गावांतील वाढलेली पाणीपातळी, लांजीमध्ये भरउन्हाळ्यात फुटलेला पाझऱ सुखावणारा आहे़
गावस्तरावरील सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शोषखड्ड्यात पाणी मुरविणे हा उत्तम पर्याय आहे़ पारंपरिक पद्धतीने पाणी मुरविताना तीन ते चार वर्षानंतर तो खड्डा पुन्हा नव्याने तयार करावा लागता होता़ त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णीचे अभियंता असलेले सरपंच प्रल्हाद पाटील यांनी शोषखड्ड्याचे नवे तंत्रज्ञान आणले़ चार बाय चारचा खड्डा त्यात तीन फुटांची सिमेंट टाकी़ त्या टाकीला वरच्या बाजूला चार छिद्र पाडले़ त्या टाकीच्या एक फूट व्यासाच्या जागी खाली मोठे तर वरच्या भागात छोटे दगड टाकून तो भरून घेतला़ त्यातून पाइप सोडून झाकण लावले़ परिणामी टाकीत पडणारे पाणी स्थिर राहून वरच्या भागातील पाणी जमिनीत मुरते़ साधारणपणे सात-आठ वर्षांनी गाळामुळे खड्डा भरला तरी तो काढून पुन्हा खड्डा वापरता येतो़ या खड्ड्याला जादुई खड्डा म्हणत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी डासमुक्तीचा टेंभुर्णी पॅटर्न जिल्ह्यात राबविला़ एका गावातील प्रयोग शंभरावर गावांपर्यंत पोहचविण्याची किमया त्यांनी केली़ गावोगावी मुक्काम करून गावकऱ्यांशी साधलेल्या संवादामुळे मूलभूत विषय ऐरणीवर आले़
१२२ डासमुक्त गावांची राज्य सरकारने तर दखल घेतलीच, शिवाय केंद्रातही लौकिक झाला़ शोषखड्ड्यांसोबत गटारमुक्तीची योजना होती़ त्यात डासमुक्त गावांचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी मांडला होता़ त्यासाठी योजना केवळ कागदावर न ठेवता त्यांनी स्वत: गावोगावी पायपीट केली़ शोषखड्ड्याचे जादुई खड्डा असे नामकरण केले़ आता राज्यासह उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांत डासमुक्तीचे अभियान सुरू होत आहे़
पाणीटंचाईच्या काळात पुन्हा एकदा हा जादुई खड्डा चर्चेला आला आहे़ जलयुक्त शिवारचे काम करताना माहूरजवळच्या लांजीमध्ये उन्हाळ्यात फुटलेला पाझर, अनेक गावांमधील वाढलेली जलपातळी ही गावच्या नव्या जलनीतीला जन्म देत आहे़ तीनशे उंबरठे असलेल्या एका गावात दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी जमिनीत मुरविणे शक्य आहे़ जे अनेक गावांनी करून दाखविले़ वाया जाणारे पाणी, गटार बांधण्यावर होणारा खर्च, दूषित पाण्यामुळे होणारे आजार व त्यावर होणार खर्च अशी विविधांगी बचत ग्रामीण जीवनमान उंचावणारी ठरली आहे़ रोग बरा करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा या अभिनव अभियानातून समोर आली़ सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व असले तरी पाणी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे़ प्रत्येक उन्हाळ्याच्या प्रारंभालाच तलाव, विहिरी कोरड्याठाक पडतात़ विंधनविहिरींचा पर्याय असला तरी खोलवर गेलेल्या पाणीपातळीने संकट उभे केले आहे़ त्याला शोषखड्ड्याच्या एका छोट्याशा; पण जादुई प्रयत्नाची जोड दिली तर टंचाईच्या झळा कमी होतील़
- धर्मराज हल्लाळे