आता परिपक्व व्हा!
By Admin | Updated: July 15, 2016 01:59 IST2016-07-15T01:59:56+5:302016-07-15T01:59:56+5:30
रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली तेव्हाच, त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येईल, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली होती

आता परिपक्व व्हा!
रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली तेव्हाच, त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येईल, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली होती. नव्याचे नऊ दिवस संपण्यापूर्वीच, ती शंका निराधार नसल्याचे आठवलेंनी सिद्ध केले आहे. गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात, याच आटवड्यात काही शिवसैनिकांनी चार दलितांना बेदम मारहाण केली. ते कृत्य अत्यंत निंदनीय व मानवतेला काळिमा फासणारेच होते; मात्र त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, आठवले यांनी केलेले वक्तव्यही अजिबात समर्थनीय नाही. एका राष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची मुभा देण्याची मागणी आठवलेंनी केली. अर्थात त्यांनी ही मागणी पहिल्यांदाच केली असे नाही. रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येनंतरही त्यांनी ही मागणी केली होती. यावेळी तर ते केवळ दलितांना शस्त्रे बाळगण्याची मुभा देण्याची मागणी करूनच थांबले नाहीत, तर दलितांवरील अत्याचारांसाठी आंतरजातीय प्रेमप्रकरणे व विवाहच जबाबदार असल्याचा जावईशोधही लावून मोकळे झाले. परिपक्व विचारांसाठी आणि संयत भूमिकेसाठी आठवले कधीच प्रसिद्ध नव्हते. कदाचित त्यांचा राजकीय प्रवास दलित पँथर्स या लढाऊ संघटनेपासून सुरू झाल्यामुळे, आपण कायमस्वरुपी बिबट्याप्रमाणे आक्रमक भूमिकेतच असायला हवे, असे त्यांना वाटत असावे. आठवलेंचा राजकीय प्रवास ज्या संघटनेपासून सुरू झाला, ती संघटना अमेरिकेतील ब्लॅक पँथर या कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेपासून प्रेरित होती आणि त्यांच्या पक्षाचे नावही अमेरिकेतील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या नावाशी साधर्म्य सांगणारे आहे. गत काही काळात झालेल्या बेफाम गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांना बंदुका बाळगण्याचा हक्क असावा की नको, या मुद्यावरून सध्या अमेरिकेत रणकंदन माजले आहे. त्या देशातील रिपब्लिकन पक्षही, बंदुका बाळगण्याची मुभा असावी, या मताचा आहे; पण कोणत्याही सुसंस्कृत समाजात नागरिकांना सर्रास शस्त्र बाळगण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही. अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्य असलेल्या अमेरिकेलाही आज ना उद्या शस्त्रास्त्रांवर निर्बंध आणावेच लागणार आहेत. त्यातून स्वरक्षणासाठीच्या शस्त्राचा वापर धमकाविण्यासाठी, आक्रमणासाठी किंवा लुटपाटीसाठी होणार नाही, याची हमी काय? पुन्हा उद्या इतर समाजांनीही अशीच मागणी केल्यास त्यांना नकार कसा देणार? आठवलेंनी अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले केंद्रातील मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तेव्हा त्यांनी आता परिपक्वतेचा परिचय द्यायला हवा आणि मिळालेल्या पदाचा उपयोग दलित समाजाच्या भल्यासाठी करायला हवा. भडक अचरट वक्तव्ये व मागण्या केल्याने दलित समाजाचे झाले तर नुकसानच होईल हे ते जेवढ्या लवकर समजून घेतील, तेवढे त्यांच्याच हिताचे राहील!