आता करा चौकशी
By Admin | Updated: October 28, 2015 21:29 IST2015-10-28T21:29:40+5:302015-10-28T21:29:40+5:30
भाजपाचे विद्यमान खासदार आणि माजी केन्द्रीय गृहसचिव राजकुमार सिंह यांनी मध्यंतरी एक रहस्योद्घाटन केले आणि

आता करा चौकशी
भाजपाचे विद्यमान खासदार आणि माजी केन्द्रीय गृहसचिव राजकुमार सिंह यांनी मध्यंतरी एक रहस्योद्घाटन केले आणि या रहस्यामागचे रहस्य हुडकून काढण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली होती. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे या रहस्यामध्ये मुंबई पोलीस दलातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद कृतीचे रहस्य दडलेले होते. देशाला जवळजवळ दोन दशकांहून अधिक काळ ज्याची प्रतीक्षा आहे, त्या कुख्यात दाऊद इब्राहीमचा पाकिस्तानात घुसून खात्मा करण्याचा व त्यासाठी दाऊदचा कट्टर वैरी छोटा राजन याची मदत घेण्याचा एक गुप्त डाव म्हणे केन्द्र सरकारच्या पातळीवर रचला गेला होता. पण या डावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला आणि त्यातील काही अधिकाऱ्यांनी दाऊदला सावध केले व डाव फसला, असे हे सिंह महोदय म्हणाले होते. याबाबत आपणाकडे अधिकचा तपशील नाही हेही त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री करणार होते. अर्थात ते तेव्हां शक्यही नव्हते. पण आता या छोटा राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर व त्याची भारतात पाठवणी करण्याची विनंती स्वीकारली जाण्याची शक्यता असल्याने ही चौकशी होऊ शकते. राजनला अटक झाल्यानंतर ज्या विविध कहाण्या प्रसृत केल्या जात आहेत, त्यातील एक कहाणी याच विषयाशी संबंधित आहे. ज्या दिवशी दाऊद आणि पाकिस्तानी क्रिकेटीअर जावेद मियाँदाद परस्परांचे व्याही होणार होते त्याच दिवशीच्या विवाह समारंभात दाऊदचा म्हणे काटा काढला जाणार होता. परंतु राजनच्या ज्या दोघा हस्तकांवर ती जबाबदारी सोपवली होती, त्यांना मुंबई पोलिसांनी मुंबईच्या विमानतळावरच ताब्यात घेतले, अशी कथा प्रसृत झाली आहे. कथेचे सार काढताना, सिंह यांनी हे सारे जाणीवपूर्वक केले गेले असे गृहीत धरले असावे. परिणामी यातील सत्यासत्यता पडताळून पाहाण्याचे जे तेव्हां फडणवीसांच्या मनात होते, ते आता शक्य होऊ शकते. परंतु ज्या पद्धतीने अमेरिकी माजी अध्यक्ष जॉर्ज बुश (धाकली पाती) यांनी ‘गुड तालीबान’ आणि ‘बॅड तालीबान’ अशी वर्गवारी केली होती तशीच भारतातही देशद्रोही गँगस्टर आणि देशप्रेमी गँगस्टर अशी काही तरी विभागणी केली जात असल्याचे जाणवते व छोटा राजनला यातील दुसऱ्या श्रेणीत धरले जाते. त्यामुळे या देशप्रेमीच्या चौकशीच्या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि मग अनायासेच मुंबई पोलीस दलातील कथित देशद्रोही तसेच मोकळे राहू शकतात. ह सारे पाहिल्यानंतर कोणे एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी काढलेल्या उद्गारांची आठवण होते. ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’!