गाय पुराणाला आता मोदी पुराणाची जोड!

By Admin | Updated: August 11, 2016 00:14 IST2016-08-11T00:14:35+5:302016-08-11T00:14:35+5:30

माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचं एक निरीक्षण होतं. ते असं म्हणाले होते की, ‘संघ परिवार आणि हिंदुत्व काय आहे, हे समजून घ्यायचं असल्यास नेत मंडळींऐवजी सर्वसामान्य प्रचारक

Now the connection of cow purana to the fire! | गाय पुराणाला आता मोदी पुराणाची जोड!

गाय पुराणाला आता मोदी पुराणाची जोड!

प्रकाश बाळ, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचं एक निरीक्षण होतं. ते असं म्हणाले होते की, ‘संघ परिवार आणि हिंदुत्व काय आहे, हे समजून घ्यायचं असल्यास नेत मंडळींऐवजी सर्वसामान्य प्रचारक वा भाजपा कार्यकर्ते काय म्हणतात, याकडं लक्ष द्या; कारण नेते मंडळी विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देत असतात, उलट सर्वसामान्य प्रचारक व भाजपा कार्यकर्ते यांना बोलताना अशी काही गरज भासत नसते. त्यांच्या अंगी जे बाणवलेलं असतं व त्यांच्या मनात जे असतं, तेच ते बोलतात’.
अशीच दुसरी एक मार्मिक टिपणी केली होती, ती रणजित साऊ या प्रख्यात अर्थतज्ज्ञानं. ते वाजपेयी सरकारचे दिवस होते आणि त्यावेळचे मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी वैदिक गणित, ज्योतिषशास्त्र, पौरोहित्य इत्यादीचे अभ्यासक्रम विद्यापीठांत सुरू करण्याचा घाट घातला होता. त्यावेळी रणजित साऊ यांनी ‘इकॉनॉमिक अ‍ॅन्ड पोलिटिकल विकली’ या साप्ताहिकाला एक छोटेखानी पत्र पाठवलं होतं. त्या साऊ यांनी म्हटलं होतं की, ‘मुरली मनोहर जोशी यांचा हा निर्णय उत्तम आहे. मला फक्त एकच प्रश्न पडला. तो असा की, की जर एखाद्या डोम समाजाच्या मुलानं पौराहित्याचा अभ्यासक्रम पुरा केला, तर त्याला काशी विश्वेश्वराच्या देवळात पुजाऱ्याची नोकरी मिळेल काय?’.
सध्या जे गाय पुराण सुरू आहे आणि त्याला आता मोदी पुराणाची जी जोड दिली जात आहे, त्यानं विश्वनाथ प्रताप सिंह यांचं ते निरीक्षण व रणजित साऊ यांची टिपणी यांची आठवण करून दिली आहे.
गोसेवक, गोभक्त इत्यादी शब्द आता इतके बेधडकपणं वापरले जात आहेत की, त्यामागचा खरा अर्थच हरवून गेला आहे. सेवा असो वा भक्ती त्याचा आशय करूणा, दया, श्रद्धा, समर्पित भावना इत्यादी मूल्यांचा आहे. या सर्व मूल्यांचा समुच्चय हा ‘माणुसकी’ या संकल्पनेत होतो. मात्र हिंदुत्वाच्या संकल्पनेचा पायाच माणुसकीऐवजी विद्वेष हा आहे. त्यामुळं हिंदू धर्मियांना गाय पवित्र आहे, म्हणून गोवंश हत्त्याबंदीचा कायदा करायला हवा, ही संघ परिवाराची मागणीच ‘राजकीय’ आहे, त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही; कारण हिंदुत्वाचा गाभा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आहे. बहुसंख्य हिंदू समाजाची संस्कृती देशातील इतर धर्मीयांनी प्रमाण मानली पाहिजेच, असा हिंदुत्ववाद्यांचा आग्रह आहे. इतर धर्मीयांत मुख्यत: मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन अल्पसंख्यकांंवर हिंदुत्वाचा मुख्य रोख आहे. मदर तेरेसा या खऱ्या अर्थानं कारूण्य, दया, समर्पित वृत्ती इत्यादिचं प्रतीक असतानाही, त्यांना संघ परिवार पाण्यात पाहात होता (आणि आजही पाहातो) व धर्मांतराचा आरोप त्यांच्यावर करीत राहातो, याचं कारण त्या येशूला मानत होत्या म्हणून. तीच गोष्ट मुस्लीमांची आहे. त्यांची ‘पुण्यभू’ देशाबाहेर आहे आणि असे जे सगळे समाजगट आहेत, त्यांनी बहुसंख्यकांची संस्कृती स्वीकारायला हवी, अशी हिंदुत्वाची भूमिका आहे.
दिल्लीतील ‘टाऊन हॉल’मध्ये बोलताना मोदी यांनी गोरक्षकांचा समाचार घेतला. त्याची बरीच चर्चा होत आहे. पण हा समाचार घेताना मोदी यांनी गाईचं महत्व म्हणून गोष्ट कोणती सांगितली, तर ‘पूर्वीच्या काळी बादशहा व राजा यांच्या लढाया होत, तेव्हा आपल्या सैन्याच्या प्रारंभी बादशहा गाई उभ्या करीत असे, त्यामुळं राजांच्या सैनिकांची पंचाईत होई; कारण गाईला मारणं त्यांना शक्य नव्हतं’. गाईंवरून उडालेल्या सध्याच्या गदारोळात देशाचे पंतप्रधान ही गोष्ट सांगतात व गोरक्षकांचा समाचार घेतात, तेव्हा ते हिंदुत्ववादी मनोभूमिकेतून बोलत असतात. अशा प्रकारे कोणाला मारणं हे माणुसकीला धरून नाही आणि कायद्याचं उल्लंघन आहे, तेव्हा त्यांच्यावर कडक कारवाई करणारच, असं स्वत:ला ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेणारे मोदी काही आश्वासन द्यायला तयार नाहीत. गोरक्षकांची ही दांडगाई बघून मला राग येतो, राज्य सरकारांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असं मोघम आवाहन करून मोदी थांबले. दुसऱ्या दिवशी हैदराबादेत पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणातही त्यांनी दलितांवरील अत्त्याचाराला भावनात्मक उत्तर दिलं. मात्र ‘दलितांना मारहाण झाली, त्यात काही गैर नाही’, अस उघडपणं सांगणारा भाजपाचा आमदारही मोदी यांच्या भाषणास हजर होताच की! त्याला पक्षातून निलंबित करून मगच मी हैदराबादेत भाषणाला जाईन, असा निर्धार मोदी यांनी केला असता, तर त्यांच्या मनोभूमिकेतील माणुसकी दिसली असती. पण स्वत:ला ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेतानाही मनोभूमिका होती, ती विद्वेषाचा पाया असलेल्या हिंदुत्वावर पोसली गेलेलीच.
मोदी बोलले, म्हणून प्रसार माध्यमांतून आणि मोदी समर्थकांकडून (मोदीभक्तांकडून नव्हे) ‘बरं झालं, पंतप्रधान बोलले, आता हे प्रकार थांबतील’ हा जो सूर निघत आहे, तो संघाची ‘कथनी व करणी’ लक्षात न घेतल्यामुळंच.
राहिला प्रश्न जातीचा. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांनी वर्णाश्रम आणि त्यातून उदयाला आलेली जातिव्यवस्था याचं पूर्ण समर्थन केलेलं होतं. आज संघ परिवार गोळवलकर गुरूजींचे नावही घेत नाही. पण गोळवलकर गुरूजींचे विश्लेषण आम्हाला आता मान्य नाही, असं सांगायलाही संघ कधीच तयार नसतो. ही जी संधिसाधू , दिशाभूल व बुद्धिभेद करण्याची कार्यपद्धती आहे, ते संघाचे व्ययच्छेदक लक्षण आहे. एकीकडं मोदी सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचा प्रचार करीत असताना मुली व स्त्रिया यांच्यासंंबंधातील संघाची भूमिका काय आहे? एका प्रतिष्टित इंग्रजी वृत्तपत्राच्या गेल्या शनिवारच्या अंकात ‘राष्ट्र सेविका समिती’ या संघ परिवारातील संघटनेतर्फे मुली व महिलांसाठी राष्ट्रभक्ती व स्वसंरक्षणाचे धडे देणारी शिबिरे कशी भरवण्यात येत आहेत, याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात महिलांनी कसं वागावं, यासंबंधी त्या संघटनेच्या सरचिटणिसांनी म्हटलं आहे की, ‘आपल्या हक्कासाठी लढण्याऐवजी महिलांनी समाजात एकोपा कसा राहील आणि आपली मुलं व कुटुंबातील इतरांच्या अंगी राष्ट्रभक्तीची प्रेरणा कशी बाणवली जाईल, यावर लक्ष केंद्रीत करावं’.
या दृष्टीनंच विश्वनाथ प्रताप सिंह यांचं निरीक्षण महत्वाचं आहे आणि संघ परिवार जे काही करतो, त्याचं प्रथमदर्शनी दिसणारं स्वरूप बघताना, त्यामागचा उद्देशही दुर्लक्षित केला जाता कामा नये, हे रणजित साऊ यांंची ती मार्मिक टिपणी दर्शवते.
म्हणूनच गाय पुराण व आता मोदी पुराण ऐकताना भाबडेपणा सोडून संघाची बुद्धिभेदाची रणनीती लक्षात घेण्याची गरज आहे.

Web Title: Now the connection of cow purana to the fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.