हॉटेलमधील गैरप्रकाराला कोण लगाम घालणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 09:02 AM2019-01-15T09:02:45+5:302019-01-15T09:20:27+5:30

मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. 

Notice from the Food and Drug Administration in 260 Hotels of Mumbai | हॉटेलमधील गैरप्रकाराला कोण लगाम घालणार?

हॉटेलमधील गैरप्रकाराला कोण लगाम घालणार?

Next

विनायक पात्रुडकर

दिखावा नेहमीच भुरळ पाडणार असतो. हानी होण्याची शक्यता यात अधिक असते. त्याचे जीवन मात्र अल्प असते. अशाप्रकारचा दिखावा सध्या सर्वच व्यवसाय दिखावा केला जातो आहे. आपण कसे दर्जेदार, आपले उत्पादन कसे पोषक, याचे दावे केले जातात. काही काळाने हे दावे फोल ठरतात. तशीच काहीशी अवस्था हॉटेल व्यवसायाची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनही काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याची अनुभूती मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. गेल्या दोन वर्षांत मुंबईतील काही हॉटेल्सना आग लागली. त्यातून मोजक्याच हॉटेल्सनी धडा घेतल्याचे या नोटीसमधून स्पष्ट होते. या दोन वर्षांत प्रशासनाच्या कारवाईची धार अधिक तीव्र नव्हती हेही तितकेच खरे आहे. कारण या काळात नियम न पाळणाऱ्या हॉटेल्सवर अपेक्षेप्रमाणे कारवाई झालेली नाही. दुसरीकडे हॉटेल्समध्ये मिळणारे अन्न किती सुरक्षित आहे हाही संशोधनाचा विषय आहे. 

हॉटेल्समधील किचन व इतर सुविधांचा अभाव याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र या परिस्थितीला नागरिकही तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण हॉटेल्समध्ये मिळणारे अन्न दर्जेदार नसल्यास नागरिक त्याविरोधात आवाज उठवत नाहीत. ‘चलता है’ म्हणत नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बड्या हॉटेल्सवर कारवाई होत नाही.  मुंबईसारख्या शहरात हॉटेल व्यवसाय नेहमीच नफ्यात राहिलेला आहे. बदलत्या काळानुसार या व्यवसायाने कातही टाकली. दिखाव्यापणाला अधिक महत्त्व देण्यास सुरुवात झाली. आलिशान प्रवेशद्वार, सलाम करणारा द्वारपाल, अगदी सौम्य आवाजात ऑर्डर घेणारे वेटर, अशी सर्व व्यवस्था हॉटेल्समध्ये केलेली असते. यानेच आकर्षित होऊन नागरिक हॉटेल्समध्ये जातात व त्यांची कधीकधी निराशा होते. अन्न खाताना ते दर्जेदार नसल्याचे नागरिकांना कळते. त्याबदल्यात हॉटेलकडून दुसरे अन्न दिले जाते. दुसरे अन्न दर्जेदार असो की नसो, ते खाण्यावाचून पर्याय नसतो. असे घडले तरी त्याची तक्रार होत नाही. अशा घटनांची तक्रार नागरिकांनी करायला हवी. तरच हॉटेल्समधील अन्नाचा दर्जा सुधारेल. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सर्तक राहायलाच हवे, त्यासोबत प्रशासनानेही दक्ष राहायला हवे. आस्थापनांची वारंवार पाहाणी करायला हवी. हॉटेलमध्ये जाणाऱ्या माणसाने तेथील किचन तपासणे व्यवहार्य नाही व तसे कोणी करतही नाही. 

हॉटेल्सचे किचन स्वच्छ असणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने वेळोवेळी आकस्मित धाड टाकून हॉटेल्सचे किचन तपासायला हवेत. तरच हॉटेल्स मालक व चालक किमान भीतीपोटी तरी किचन स्वच्छ ठेवतील. प्रशासनाने हॉटेल्सला पुरवठा होणाऱ्या अन्नाचा दर्जाही तपासायला हवा. कारवाई झाल्यानंतर दोषींनी कठोर शिक्षा होईल याकडेही लक्ष द्यायला हवे. अन्न व औषध प्रशासनाने दाखल केलेल्या खटल्यात शिक्षेचे प्रमाण तुरळक आहे. हे प्रमाण कसे वाढेल याचा विचार करायला हवा. तरच हॉटेल्समध्ये दर्जेदार अन्न मिळेल व किचनही स्वच्छ राहतील. यासोबतच हॉटेलमध्ये अग्निरोधक यंत्रणा आहे की नाही किंवा इतर पर्यायी उपाय केलेले आहेत की नाही याचीही चाचणी वेळोवेळी करायला हवी. तरच हॉटेलमध्ये आगीच्या घटना घडणार नाहीत. 

Web Title: Notice from the Food and Drug Administration in 260 Hotels of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.