छोटा नव्हे खोटा!
By Admin | Updated: November 8, 2015 23:27 IST2015-11-08T23:27:31+5:302015-11-08T23:27:31+5:30
खरोखरीच असे काही झाले असेल तर केन्द्रीय गुप्तचर विभागाने मोठी धमालच केली म्हणायची. कुख्यात गुंड छोटा राजन याला इंडोनेशियातून भारतात आणण्याचा निर्णय झाल्यापासून

छोटा नव्हे खोटा!
खरोखरीच असे काही झाले असेल तर केन्द्रीय गुप्तचर विभागाने मोठी धमालच केली म्हणायची. कुख्यात गुंड छोटा राजन याला इंडोनेशियातून भारतात आणण्याचा निर्णय झाल्यापासून त्याचे प्रत्यक्षात दिल्लीत केव्हां आगमन होते याची प्रतीक्षा त्याचे गुंड साथीदार आणि त्याचा कट्टर वैरी असलेल्या दाऊदच्या टोळीतील भाडोत्री मारेकरी जितक्या उत्सुकतेने करीत होते त्याच्यापेक्षा अधिक उत्सुकता इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेऱ्यांना लागली होती. राजन पहाटे दिल्लीत उतरणार ही खबर लागल्यानंतर रात्रभर कॅमेरेवाले विमानतळावरच तळ ठोकून बसले होते. अखेर तो आला. आल्या आल्या म्हणे त्याने जमिनीचे चुंबन घेतले. तब्बल २७ वर्षानंतर त्याने मायभूमीचे दर्शन घेतले. जणू काही प्रभू रामचन्द्र, ‘जननी जन्मभूमिश्च’ वगैरे वगैरे. पण ज्याला माध्यमांनी कॅमेराबंद केले तो खरा छोटा राजन की खोटा राजन असा प्रश्न खुद्द सीबीआयच्याच अधिकाऱ्यांनी प्रसृत केलेल्या एका वार्तेमुळे निर्माण झाला आहे. छोटा राजन विमानतळावर उतरताक्षणी माध्यमांचे लोक कलकलाट सुरु करतील याची केवळ शंकाच नव्हे तर खात्री असल्याने अधिकाऱ्यांनी कुणा खोट्या राजनला आधी उतरविले. कडेकोट बंदोबस्तात त्याला चिलखती का काय म्हणतात तशा गाडीत घालून भलत्याच दिशेने सारा ताफा वळला. सारी माध्यमे त्या ताफ्याच्या मागे धावली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी गुपचूप खऱ्या छोट्या राजनला वेगळ्या मार्गाने आपल्या मुख्यालयात नेले. अर्थात हा सारा खटाटोप केवळ माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठीच केला नसावा. छोटा राजन ज्या पद्धतीने दाऊदला आव्हानावर आव्हाने देत आहे आणि दाऊदचा हस्तक छोटा शकील ज्या पद्धतीने राजनला उडवायच्या गोष्टी करीत आहे, ते सर्व पाहता खबरदारी घेणे गरजेचेच होते. पण छोटा राजनला माध्यमांपासून असे लपवून ठेवल्यामुळे त्याने अंगात कोणते कपडे घातले होते, त्याने चहापाणी घेतले की नाही, चहाबरोबर बिस्किटे घेतली असतील तर ती कोणती, त्याने नाश्त्यात साधे सॅन्डवीच घेतले की ग्रिल्ड की चक्क कांदेपोहे, अशा साऱ्या महत्त्वाच्या तपशीलास वाचक व दर्शक मात्र मुकले आहेत!