असहिष्णुता नव्हे, खोडसाळ बदमाषी
By Admin | Updated: November 6, 2015 02:56 IST2015-11-06T02:56:34+5:302015-11-06T02:56:34+5:30
अगदी प्रथमपासूनच याबाबतीत साऱ्यांचाच घोटाळा झालेला दिसतो. साहित्यिक, कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ यासारखी समाजातील विचारी आणि ज्ञानी मंडळी त्यांना

असहिष्णुता नव्हे, खोडसाळ बदमाषी
अगदी प्रथमपासूनच याबाबतीत साऱ्यांचाच घोटाळा झालेला दिसतो. साहित्यिक, कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ यासारखी समाजातील विचारी आणि ज्ञानी मंडळी त्यांना प्राप्त सरकारी सन्मान परत करताना आपल्या कृतीमागील जे कारण देत आहेत, ते कारण आहे, देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधातील मूक निषेध! घोटाळा नेमका येथेच झाला आहे. ज्याला परपीडेतून आनंद प्राप्त होतो, अशा व्यक्तीच्या कृतीकडे दुर्लक्ष करुन, तिची चूक वा चुका पोटात घालण्याचा गुणविशेष म्हणजे सहिष्णुता. संत एकनाथांच्या चरित्रातील कथेमध्ये ते गोदावरीत स्नान करुन माघारी परतताना एक म्लेंछ त्यांच्यावर थुंकतो. ते माघारी वळून पुन्हा स्नान करुन येतात. असे अनेक वेळा घडते पण एकनाथ रागावत वा चिडत नाहीत. अखेर तो म्लेंछच शरमिंदा होतो आणि एकनाथांच्या पायावर लोळण घेतो, अशी ही कथा व तिच्यातील एकनाथांचा गुण म्हणजे सहिष्णुता व त्यांच्यातील सहनशीलता. आज देशात जे काही घडते आहे त्याचा विचार या नव्या संदर्भात घ्यावयाचा झाला तर त्याचा अर्थ असा निघेल की साहित्यिक, कलाकार, विचारवंत आदिंंकडून आधी आगळीक झाली पण ती देशातील विद्यमान सरकारशी संबंधित लोक आणि संघटना यांनी पोटात न घालता प्रत्युत्तर देण्याचा वा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न केला म्हणून ते असहिष्णु! परंतु प्रत्यक्षात स्थिती तशी अजिबातच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भाजपाचे निवडक खासदार, काही मुख्यमंत्री आणि केन्द्रातील काही मंत्री यांचे गेल्या काही महिन्यांपासूनचे सातत्याचे जे धोरण आहे आणि त्यांची जी वक्तव्ये आहेत ती असहिष्णुतेची वा असहनशीलतेची नव्हे तर चक्क खोडसाळ बदमाषीची आहेत. गुंड, पुंंड आणि षंढ या तीन विशेषणांच्या संदर्भात विचार करायचा तर देशात सरकारच्या वळचणीस असलेल्या निवडक लोकांकरवी जे सुरु आहे ती गुंडाई आहे आणि अगदी बोटावर मोजता येतील इतक्या लोकांनी पण प्रातिनिधिक स्वरुपात या गुंडाईला पुंडाईने उत्तर देण्याचा (अंगावर आले म्हणून शिंगावर घेतले) प्रयत्न केला आहे वा केला जात आहे. वास्तवात कोणतेही लोकनियुक्त सरकार असते तर त्या सरकारने या प्रातिनिधिक निषेधाची आणि त्यामागील स्वराची तत्काळ दखल घेतली असती व आपल्या कुणब्यातील बोलभांडांना गप्प केले असते. परंतु तसे झालेले नाही आणि होताना दिसतही नाही. केन्द्रात आता भाजपाचे स्वबळावरील सरकार येणार असे निश्चित झाले तेव्हां यापुढील काळात काय काय होऊ शकते असे अंदाज व्यक्त होऊ लागले. पाठ्यपुस्तके बदलतील, इतिहास बदलला जाईल, शैक्षणिक संस्थांवर हल्ले केले जातील, विवेकाचा आवाज बंद केला जाईल आदिंचा त्या अंदाजांमध्ये समावेश होता. पण संघ वा भाजपाच्या छुप्या अथवा उघड समर्थकांनाही हे सारे इतक्या चपळाईने आणि अजागळपणाने सुरु होईल असे वाटले नसावे. दुर्दैवाने तसे घडते मात्र आहे. देशाला अराजकाकडे नेऊ पाहणाऱ्या व देशाचा सर्वसमावेशक पोत विसकटू पाहाणाऱ्या शक्तींना आवर घाला असा इशारा देशाचा प्रथम नागरिक एकदा नव्हे तीनदा देतो, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर त्याच अर्थाचे विनवणीवजा आवाहन करतो, एक विदेशी संस्था तर चक्क पंतप्रधानांना उद्देशून निर्वाणीचा इशारा देते पण तरीही खोडसाळपणा बंद होत नाही. राज्यघटनेने बहाल केलेल्या मूलभूत स्वातंत्र्यावर सर्व नागरिकांचा समान हक्क आहे. त्यात कोणताही आपपरभाव नाही. असे असताना जेव्हां सभोवतालची स्थिती पाहिल्यानंतर शाहरुख खान नावाच्या एका लोकप्रिय कलावंतालाही अभिव्यक्त व्हावेसे वाटते तेव्हां लगेच त्याचा धर्म आठवला जातो आणि त्याची लगेच पाकिस्तानात रवानगी करण्याची उद्दाम खोडसाळ भाषा केली जाते तेव्हां त्याला असहिष्णुता नव्हे तर बदमाष आणि खोडसाळ गुंडशाही म्हणतात. कोण एक तो विजयवर्गीय अशी गुंडशाहीची भाषा करतो आणि त्याला गप्प केल्यानंतर कुणी योगी आदित्यनाथ उठतो आणि त्याहूनही भीषण भाषेचा वापर करतो. केवळ तितकेच नव्हे तर मुंबई शहरावरील अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफीज सईद याच्याशी शाहरुखची तुलना करतो. अशा स्थितीत तोच हाफीज, शाहरुख आणि देशातील अन्य मुस्लिम कलाकारांना पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण देऊन भारताची खोडी काढतो. शिवसेनेने झुंड आणि गुंडशाही करुन माघारी परतवलेल्या गझल गायक गुलाम अली याला त्यानंतर सन्मानाने भारतात येण्याचे दिलेले निमंत्रण तो नाकारुन संपूर्ण देशाचा एकप्रकारे अपमान करतो. पण हाफीज असो की गुलाम अली, त्यांना तसे करण्याची संधी भारतातल्याच या खोडसाळ बदमाषांनी उपलब्ध करुन दिलेली असते. तथाकथित योगगुरु रामदेव बाबाही मग गप्प बसत नाहीत. त्यांनी तर शाहरुखच्या संपत्तीवरच हक्क सांगितला आहे. देशात इतके सारे होत असताना, पंतप्रधान नरेन्द्र मोदी शांत आहेत. मध्यंतरी त्यांनी काही समविचारी लोकाना सबुरीचा सल्ला दिला. पण त्यानंतर दंडेलीच्या प्रकारांमध्ये वाढच होत गेल्याचे दिसून आले. याचा अर्थ पंतप्रधानांच्या बोलण्याला आणि इशाऱ्यालाही त्यांचेच लोक जुमानेसे झाले आहेत? मोदींचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा स्वभाव लक्षात घेता, तसे होऊ शकत नाही. मग यामागील नेमके रहस्य काय?