अशी सत्ताच नको
By Admin | Updated: November 10, 2014 01:57 IST2014-11-10T01:57:46+5:302014-11-10T01:57:46+5:30
धर्म सत्तारूढ झाला आणि आपले कायदे अमलात आणू लागला, की तो केवढा एकारलेला आणि आंधळा होतो याचे ताजे उदाहरण घोनवेट घावमी हे आहे

अशी सत्ताच नको
धर्म सत्तारूढ झाला आणि आपले कायदे अमलात आणू लागला, की तो केवढा एकारलेला आणि आंधळा होतो याचे ताजे उदाहरण घोनवेट घावमी हे आहे. ब्रिटनची नागरिक असलेली २५ वर्षे वयाची ही घावमी लंडनच्या विद्यापीठाची पदवीधर आहे आणि सध्या ती इराणच्या तुरुंगात धर्माने बजावलेली शिक्षा भोगत आहे. तिचा अपराध कोणता?... तर, इराणमधील आपल्या मित्रांना व आप्तेष्टांना भेटायला ती तेहरानला आली आणि तिने तेथे सुरूअसलेला इराण विरुद्ध इटली हा व्हॉलिबॉलचा सामना पाहण्याचे धाडस करून पाहिले. २० जून या दिवशी खेळला गेलेला हा अंतिम सामना पाहायला साऱ्यांनीच मोठी गर्दी केली होती. पण, पुरुषांनी खेळायचा हा सामना स्त्रियांनी पाहू नये, असा धर्माचा आदेश ऐनवेळी अमलात आणला गेला. परिणामी, तो पाहायला मैदानावर जमलेल्या साऱ्या स्त्रियांनी मैदान सोडून घरचा रस्ता धरला. घावमीही त्यात होती. मैदान सोडताना आपली चीजवस्तू सोबत न्यायला ती विसरली आणि सामना संपल्यानंतर ती घ्यायला मैदानावर परतली. नेमक्या त्या वेळी आलेल्या इराणच्या धार्मिक पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कैदेत टाकले. व्हॉलिबॉलचे सामने स्त्रियांनी पाहू नयेत, हा धार्मिक कायदा २०१२ पासून इराणमध्ये अमलात असला, तरी प्रसंगविशेषी ते पाहायला स्त्रिया येत. अशाच या प्रसंगात घावमी अडकली आणि इराणच्या न्यायालयाने तिला एक वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. ती ठोठावताना अर्थातच तिच्यावर ‘धर्मविरोधी कृत्याचे, धार्मिक शिकवणुकीविरुद्ध चळवळ करण्याचे, इराणी जनतेत धर्मद्वेष पसरविण्याचे’ इ.. इ.. आरोपही ठेवण्यात आले. इराणमध्ये आयातुल्ला खोमेनीची सत्ता आल्यापासून तेथील स्त्रियांच्या वाट्याला असह्य असे घरातल्या कोंडवाड्याचे आयुष्य आले आहे. घरच्या पुरुषाच्या सोबतीखेरीज घराबाहेर पडायचे नाही, परपुरुषाशी बोलायचे नाही, अंधार पडण्याआधी घरात परतायचे, बुरखा आवश्यक, बाजार नाही, सरकारने परवानगी दिलेल्या चित्रपटांऐवजी दुसरे चित्रपट बघायचे नाहीत, घरातल्या पुरुषांच्या आज्ञेविरुद्ध वागायचे नाही आणि धर्माच्या सर्व प्राचीन नियमांचे पालनही त्यांनीच करायचे, असे निर्बंध तेव्हापासून इराणी स्त्रियांवर आहेत. मार्क पामर या अमेरिकेच्या राजदूताने एका इराणी तरुणीची गोष्ट त्याच्या ‘अॅक्सिस आॅफ इव्हिल’ या ग्रंथात नोंदविली आहे. अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातून पदवी घेतलेली ही तरुणी विमानात पामरजवळच्या खुर्चीवर बसली होती. मागल्या रांगेत तिचा भाऊ होता व तो तिला इराणमध्ये परत न्यायला आला होता. ‘इराणमध्ये जाऊन तू काय करणार’ या पामरने तिला विचारलेल्या प्रश्नाला डोळ्यांत पाणी आणून तिने दिलेले उत्तर होते, ‘काही नाही, मागल्या रांगेत बसलेला माझा भाऊ मला सक्तीने इराणमध्ये नेणार आणि तेथे माझे लग्न लावून माझे एक लैंगिक यंत्र बनविणार’... हुकूमशाही ही मुळातच एक जुलूम व गुलामगिरी लादणारी राज्यपद्धती आहे. मात्र, धार्मिक हुकूमशाही हा त्याहूनही वाईट व माणसाला माणूस म्हणून आणि स्त्रीला स्त्री म्हणून जगू न देणारा सत्तेचा क्रूर प्रकार आहे. घावमी ही इंग्लंडची नागरिक असल्यामुळे तिच्या सुटकेसाठी इंग्लंडच्या नागरिकांनी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याकडे आता धाव घेतली आहे. स्वत: कॅमेरून यांनी इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांच्याशी संपर्क साधून त्यांना घावमीच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. घावमीला झालेली शिक्षा हा एका ब्रिटिश स्त्रीला झालेल्या शिक्षेचा प्रकार नसून साऱ्या जगात इराणची बदनामी करणारा मानवताविरोधी अपराध आहे, असे कॅमेरून यांनी रोहानींना बजावले आहे. अध्यक्ष रोहानी हे त्यांच्या उदारमतवादी धोरणामुळे इराणच्या कडव्या मुस्लिमपंथीयात आपली लोकप्रियता कशीबशी राखून आहेत. या वर्गाला दुखावता येण्याजोगे काही करणे त्यांना एकाएकी जमणारेही नाही. शिवाय, त्यांच्यावर आताच्या खोमेनी या धार्मिक हुकूमशहाची पकड मोठी व जाचक आहे. रोहानी हे देशाचे घटनात्मक नेते असले, तरी इराणच्या सत्तेवर प्रत्यक्ष नियंत्रण खोमेनीचे आहे. त्याचमुळे खोमेनीविरुद्ध जाऊन रोहानींना फारसे काही करता येईल, याची शक्यता कमी आहे. जागतिक लोकमत घावमीच्या बाजूने आहे. परंतु धर्मांधांना जागतिक लोकमताची किंवा एकूणच जनतेच्या इच्छेची फारशी पर्वा नसल्याने खोमेनी हे इंग्लंडच्या सरकारचे म्हणणे ऐकून घेतील आणि घावमीची सुटका करतील, असे वाटत नाही. तात्पर्य, धर्मांधांची सत्ता कोणालाही अनुभवावी लागू नये, हाच घावमीच्या या कथेचा अर्थ आहे. अशी सत्ता आपल्या देशात येणारच नाही, हे यासाठी सदैव जागरूक राहणे हेच लोकशाहीवाद्यांचे कर्तव्य आहे.