सैन्यात लष्करी अधिकाऱ्यांचं महत्त्व अनन्यसाधारण. लष्करी अधिकारी जितका अनुभवी आणि जितक्या वरच्या हुद्यावरचा, तितकं त्याच्या शब्दाला आणि अनुभवाला वजन येतं. त्यामुळेच युद्धाच्या, चढाईच्या प्रसंगी अशा अधिकाऱ्यांचं मत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अनेक धोरणात्मक निर्णय हेच अधिकारी घेतात.
कारण त्यात एक जरी चूक झाली तरी हजारो लोकांचे प्राण जाऊ शकतात, संपूर्ण देशातील कोट्यवधी लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, देशाला युद्धात पराजय पत्करावा लागू शकतो, तो देश अनेक दशकं मागे फेकला जाऊ शकतो, तसंच त्यामुळे देशातील जनतेच्या हालअपेष्टांनाही पारावार उरत नाही. त्यामुळे तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी ज्येष्ठ अधिकारीच यासंदर्भाचे धोरणात्मक निर्णय घेतात.
अर्थातच, अशा प्रसंगी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्यही असतो. जो देश तंत्रज्ञानात प्रगत त्याला कायमच युद्धाच्या प्रसंगी मोठी मदत होते. आज एआयचा बोलबाला आहे. सर्वच क्षेत्रात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता युद्धातही एआयची मदत घेतली जाऊ लागली आहे. इतकं की अनेक अमेरिकन टेक कंपन्यांसोबत आता थेट पेंटागॉननंच डील केलं आहे.
त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांचं महत्त्व कमी होणार की काय, अशी शक्यताही जगभर वर्तवली जात आहे. कारण भविष्यात हे एआय चॅटबॉट्सच आता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतील. कधी, कुठे, कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा, आधी कोणत्या शत्रूवर क्षेपणास्त्र डागायचं.. याबाबत एआयला विचारलं जाईल. काही निर्णय तर त्याच्या उत्तरावरच ठरवले जातील!
युद्धाच्या रणनीतीत आता अमेरिकाच एआयचा सल्ला घेणार असेल तर इतर अनेक देशही त्यांचंच अनुकरण करतील, हे ओघानं आलंच. त्यामुळेच युद्धाच्या मैदानात आता फक्त जनरल आणि सैनिकच नाहीत, तर संगणकाच्या स्क्रीनवर असलेले एआय ‘चॅटबॉट्सही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतील. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं (पेंटागॉन) नुकतीच xAI आणि OpenAI सोबत गुप्त लष्करी मोहिमांमध्ये एआयचा वापर करण्यासाठी करार केला आहे. हे तंत्रज्ञान फक्त डेटाच गोळा करणार नाही, तर युद्धाच्या वेळी सल्लादेखील देणार आहे. अर्थात, अंतिम निर्णय सध्या तरी माणसंच घेतील.
आतापर्यंत अमेरिकन सैन्य ‘मेव्हन’ प्रोजेक्टसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ड्रोन फुटेज आणि चित्रांच्या आधारे लक्ष्य ओळखत होतं. आता यात चॅटजीपीटी आणि ग्रोकसारख्या स्मार्ट चॅटबॉट्सची मदत घेतली जात आहे. पण यातला एक प्रमुख धोका आतापर्यंत कायमच चिंतेची बाब बनला आहे. एआयनं दिलेल्या सल्ल्यांची सत्यता पडताळायची कशी? कारण एआय फक्त डेटा न देता थेट निष्कर्ष देतं! त्यात थोडीशी जरी चूक झाली तर ती अत्यंत महागात पडू शकते!
अमेरिका-इराण युद्धादरम्यान इराणमधील एका शाळेवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात १६०हून अधिक मुलींचा मृत्यू झाला होता. जुन्या आणि चुकीच्या डेटाचा वापर झाल्याने या स्ट्राइकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निष्पाप मुली मारल्या गेल्या असं मानलं जात आहे. काही अहवालांमध्ये या लक्ष्याच्या निर्णयांमध्ये ‘Claude’ आणि ‘Maven’ तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख केला आहे. हेच तंत्रज्ञान व्हेनेझुएला ऑपरेशन्समध्येही वापरलं गेलं होतं, मात्र अद्याप त्याची स्पष्ट पुष्टी झालेली नाही.
Web Summary : AI is increasingly used in warfare, with the Pentagon partnering with tech firms. AI chatbots may advise on military strategies, raising concerns about accuracy and ethical implications after a school bombing incident. Ultimately, humans will make the final decisions for now.
Web Summary : युद्ध में एआई का उपयोग बढ़ रहा है, पेंटागन ने तकनीकी कंपनियों के साथ साझेदारी की है। एआई चैटबॉट्स सैन्य रणनीतियों पर सलाह दे सकते हैं, सटीकता और नैतिक प्रभावों के बारे में चिंताएं बढ़ रही हैं। फिलहाल, अंतिम निर्णय मनुष्य ही लेंगे।