नितीशकुमारांनी घडविले परिवर्तन
By Admin | Updated: November 21, 2015 04:21 IST2015-11-21T04:21:21+5:302015-11-21T04:21:21+5:30
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी त्यांच्या २७ सहकारी मंत्र्यांसोबत पाटण्याच्या गांधी मैदानावर हजारो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा या देशाने

नितीशकुमारांनी घडविले परिवर्तन
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी त्यांच्या २७ सहकारी मंत्र्यांसोबत पाटण्याच्या गांधी मैदानावर हजारो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा या देशाने राष्ट्र पातळीवर घेतलेल्या एका चांगल्या व प्रगल्भ वळणाचे आश्वासन मिळाले. नितीशकुमारांनी लालू प्रसाद यादव व राहुल गांधी यांच्यासोबत बिहारची निवडणूक विकासाच्या कार्यक्रमपत्रिकेवर लढविली. ही निवडणूक ते जिंकतील ही बाब आरंभी साऱ्यांना अशक्य कोटीतील वाटली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी व मित्रपक्षांच्या जोडीने या निवडणुकीत उतरला होता. मोदींच्या सभांना जमणारी गर्दी व त्यातली त्यांची जोरकस भाषणे यामुळे त्यांच्याच पक्षाच्या गळ््यात विजयाची माळ पडेल असेच साऱ्यांना वाटले होते. मात्र नितीशकुमारांची विनम्र राजकीय शैली, त्यांच्या सरकारचा गेल्या दहा वर्षांचा विधायक अनुभव आणि लालूप्रसादांच्या घणाघाती प्रचाराची जोड या बळावर त्यांनी ही निवडणूक दोन तृतीयांश बहुमतानिशी जिंकली आणि देशालाच त्याच्या पुढच्या वाटचालीचे प्रगल्भ आश्वासन दिले. नितीशकुमारांच्या शपथविधीला साऱ्या देशातले राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते ही बाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मिळालेली देशपातळीवरची मान्यता सूचित करणारी होती. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, उत्तरप्रदेशचे अखिलेश यादव, बंगालच्या ममता बॅनर्जी, दिल्लीचे केजरीवाल, काश्मिरचे फारुख अब्दुल्ला, महाराष्ट्राचे शरद पवार, तामिळनाडूचे स्टॅलिन, कर्नाटकाचे सिद्धरामय्या, हिमाचलचे वीरभद्रसिंग, केरळचे ओमन चंडी, हरियाणाचे हुडा, गुजरातचे वाघेला, झारखंडचे मरांडी हे सारे नेते जसे या सोहळ््याला हजर होते तसे मोदींच्या मंत्रिमंडळातील व्यंकय्या नायडू आणि राजीवप्रसाद रुडी हेही उपस्थित होते. एका अर्थाने राष्ट्रपातळीवरील सर्व पक्षांच्या नेत्यांचे संमेलनच या निमित्ताने देशाला पाहता आले. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचलपासून गुजरातपर्यंत असा राजकीय पाठिंबा स्वत:मागे उभा करू शकणारा आजवर प्रादेशिक पातळीवर राहिलेला त्यांच्याएवढा नेता दुसरा नाही. २०१४ च्या निवडणुकीने काँग्रेसचा घालविलेला आत्मविश्वास त्याला अद्याप परत मिळवता आला नाही. येत्या काळात तो पूर्वीच्या सामर्थ्याने देशात उभा होऊ शकला नाही तर नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे पर्यायी उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा केवळ माध्यमांत नव्हे तर देशात सुरू झाली आहे. लालूप्रसाद यादव हे त्यांचे सहकारी अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. निवडणूक काळात त्या दोघांत जे सख्य व विश्वास देशाला दिसला तो या पुढच्या काळात त्या दोघांनाही टिकविणे आता गरजेचे होणार आहे. नितीशकुमारांच्या लाटेमुळे काँग्रेस पक्षाला बिहारमधील आपल्या आमदारांची संख्या चारवरून २७ पर्यंत नेणे जमले आहे. काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वानेही नितीशकुमारांचे सरकार कोणत्याही राजकीय वादापासून दूर राहील याची यापुढे काळजी घेतली पाहिजे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत बिहार हे देशातील एक ‘बिमारू’ राज्य मानले जात होते. नितीशकुमारांनी त्या राज्यातील गुन्हेगारी संपविली, शिक्षणाच्या क्षेत्रात त्याला देशातील अव्वल राज्यांच्या बरोबरीत आणून पोहचविले, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी राज्यातील सर्व मुलींना सरकारी खर्चाने सायकली दिल्या, आरोग्याच्या सार्वजनिक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा केली आणि बिहारमधील ९० टक्क्यांहून अधिक खेड्यांत विद्युतीकरण नेऊन प्रकाश पोहचविला. बिहारातले रस्ते दुरुस्त झाले आणि एकेकाळी सायंकाळनंतर गुंडांच्या भयाने घराबाहेर न पडणाऱ्या स्त्रिया मोकळेपणी वावरू लागल्या. भाजपाने त्यांच्याविरुद्ध प्रचाराची राळ उडविली, लालूप्रसादांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले. मात्र नितीशकुमारांनी आणलेल्या विकासाचे साक्षीदार असलेले बिहारी मतदार त्या प्रचाराला बळी पडले नाहीत. भाजप व त्याच्या परिवारातील संघटनांकडून ‘हिंदुत्वा’चा छुपा प्रचारही मोठ्या प्रमाणावर केला गेला. धर्म, गाय आणि थेट पाकीस्तान या गोष्टी त्या निवडणुकीत ओढून आणण्याचे प्रयत्न त्याच्याकडून झाले. या प्रचाराचा पराभव करणाऱ्या जनतेने आम्ही दुहीचे राजकारण यापुढे चालवून घेणार नाही असाच संदेश आपल्या नितीशविजयातून देशाला दिला आहे. जनतेची ही वाटचाल अधिक शक्तीशाली व वेगवान बनविणे ही नितीशकुमारांच्या सरकारची यापुढची मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी लालूप्रसादांना आपल्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षा आवरत्या घ्याव्या लागतील आणि नितीशकुमारांना त्यांचा विकास कार्यक्रम सुरळितपणे पुढे नेऊ द्यावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीच्या काळात बिहारला सव्वाशे लक्ष कोटी रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांचा पक्ष पराभूत झाला म्हणून त्यांना या आश्वासनावरून मागे फिरता येणार नाही. ते मोदींचे नव्हे तर केंद्र सरकारचे गंभीर वचन आहे असे मानून आपली जबाबदारी त्यांना पूर्ण करावी लागेल. असो, आजचा दिवस हा नितीशकुमारांचा, बिहारमधील त्यांच्या अनुयायांचा आणि देशभरातील त्यांच्या चाहत्यांचा आहे. त्यांच्या अभूतपूर्व विजयाबद्दल व त्यांनी देशाच्या राजकारणात घडवून आणलेल्या परिवर्तनाबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.