नितीन पटनायक?

By Admin | Updated: October 25, 2016 04:14 IST2016-10-25T04:14:25+5:302016-10-25T04:14:25+5:30

ओडीशाचे त्या काळातील सर्वेसर्वा आणि त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पिताश्री बिजू पटनायक यांनी तब्बल तेवीस वर्षांपूर्वी काढलेल्या उद्गारांची

Nitin Patnaik? | नितीन पटनायक?

नितीन पटनायक?

ओडीशाचे त्या काळातील सर्वेसर्वा आणि त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पिताश्री बिजू पटनायक यांनी तब्बल तेवीस वर्षांपूर्वी काढलेल्या उद्गारांची आठवण आज केन्द्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी करुन दिली आहे. बिजू पटनायक देशाच्या जुन्या पिढीतील जनमान्य नेते पण त्यांचा संताप त्यांना कधीच आपल्या ताब्यात ठेवता आला नाही. परिणामी जे सरकारी नोकर कामचुकारपणा करतील वा भ्रष्टाचार करतील त्यांना मुस्काडून तर काढलेच पाहिजे पण प्रसंगी ‘गिलोटीन’ची म्हणजे फाशीची शिक्षाही ठोठावली पाहिजे असे ते म्हणाले होते. आज गडकरी नेमके तसेच काहीसे म्हणत आहेत. जनतेने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात बिनधास्त तक्रारी कराव्यात, त्यांना ठोकून काढू असे गडकरींनी म्हटले आहे. भाजपा-सेना युती ‘अमर’ असल्याने गडकरींना वाण नाही पण गुण लागला म्हणायचे की काय? अन्यथा ठोकाठोकी आणि बदडाबदडी अशी भाषा संघ आणि भाजपा यांच्या संस्कृतीत बसत नाही, असे तेच लोक सांगत असतात. मुळात सामान्य विज्ञानाचा साधा सिद्धांत असे सांगतो की पाझर वरुन खाली होत असतो, खालून वरती नव्हे! त्यातून सरकारी नोकरशाही हा तसाही एक नाठाळ घोडा मानला जातो व त्याच्यावर मांड ठोकून त्याला हवे तसे पळवणे हे लोकनियुक्त सरकारच्या प्रतिनिधींचे कौशल्य मानले जाते. सबब महाराष्ट्रातील काय किंवा देशातील काय, नोकरशाही बेलगाम पद्धतीने वागत असेल तर त्याचा अधिक दोष राज्यकर्त्यांकडेच जातो. नितीन गडकरी ज्या सुमारास अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करीत होते, त्याच सुमारास राजधानी दिल्लीत काही वरिष्ठ आयएएस अधिकारी एकत्र येऊन देशातील बदललेल्या शासकीय धोरणांच्या संदर्भात चिंता व्यक्त करीत होते. अधिकाऱ्यांनी कालहरण न करता, त्यांच्या पुढ्यातील प्रकरणांचा सत्वर निपटारा करावा, असा खुद्द पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा आग्रह असला आणि तो एका परीने योग्यदेखील असला तरी शीघ्रतेने एखाद्या प्रकरणाचा निर्णय घेताना नकळत एखादी चूक झाली तरी संबंधिताला कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही, ही या अधिकाऱ्यांची रास्त खंत वा तक्रार आहे. विशेषत: जेव्हां सरकारचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री स्वत:वर कोणतीही जबाबदारी न घेता संदिग्ध आणि तोंडी सूचना देतात तेव्हां नोकरशाही निश्चितच पेचात सापडत असते. स्वाभाविकच सत्वर काम केले नाही तरी सरकार बदडून काढणार आणि केले व त्यात अजाणतेपणी चूक झाली तरीही सरकारच पुन्हा ठोकून काढणार, अशा कातरीत अधिकारी अडकत चालले आहेत. दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक नेहमी म्हणत असत की जो काम करेल तोच चुकेल आणि जो काम टाळेल त्याच्या हातून चूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण झालेली चूक जाणतेपणी केली की अजाणतेपणी याचा निर्णय राज्यकर्त्यांना करता आला पाहिजे. आज मात्र कामही करा आणि थोडी जरी चूक झाली तरी फटके खा पण काम कसे करा हे आम्ही स्पष्टपणे सांगणार नाही अशी स्थिती निर्माण झाली असून या काळात वारंवार जे काही प्रकार घडत आहेत ते पाहाता आता गडकरी जे करु पाहात आहेत, ते लोक अगोदरच करुन मोकळे होताना दिसत आहेत.

Web Title: Nitin Patnaik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.