‘निर्भया’ पथके व भ्रष्ट समाज

By Admin | Updated: August 12, 2016 03:29 IST2016-08-12T03:29:39+5:302016-08-12T03:29:39+5:30

कोल्हापूर पोलीस दलाने मुली आणि महिलांच्या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरासह प्रमुख तालुका शहरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांना पकडण्यासाठी दहा

'Nirbhaya' squads and corrupt society | ‘निर्भया’ पथके व भ्रष्ट समाज

‘निर्भया’ पथके व भ्रष्ट समाज

कोल्हापूर पोलीस दलाने मुली आणि महिलांच्या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरासह प्रमुख तालुका शहरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांना पकडण्यासाठी दहा ‘निर्भया’ पथकांची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन करताना राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले भाषण डोळ्यात अंजन घालणारे आहे. ते म्हणाले, ‘कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिभेचे प्रतीक आणि मुख्य केंद्र आहे. त्या शहरातील महिला सुरक्षित नाहीत, म्हणून पोलीस दलाला खास ‘निर्भया’ पथके निर्माण करावी लागतात. ही खेदजनक गोष्ट आहे, भूषणावह नाही’.
खूप कमी राजकारणी स्पष्ट बोलतात आणि त्यापेक्षा खूपच कमी अधिकारी आपल्याला मिळालेल्या प्रशासकीय यंत्रणेचा समाजाला वळण लावण्यासाठी वापर करतात. चंद्रकांतदादा पाटील यांचे परखड मत दखल घेण्याजोगे आहे. मात्र, त्याचवेळी पोलिसांना हे पाऊल उचलावे लागते, दंडुकेशाहीच्या मार्गाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी पाऊल उचलावे लागते, हे समाजाचे अपयश आहे. त्यासाठी समाज बदलण्याची जबाबदारी घेणाऱ्यांनी गंभीर होण्याची गरज आहे.
आजच्या परिस्थितीत खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हाती घेतलेली ही मोहीम नवी दिशा देणारी आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे आणि त्यांना शुभेच्छाही द्यायला हव्यात.
शहराच्या वर्दळीच्या भागात तसेच महाविद्यालये, विद्यामंदिरे आदि ठिकाणी मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर गुप्तपणेही ‘निर्भया’ पथके लक्ष ठेवणार आहेत. त्यांना संपूर्ण यंत्रणा दिली आहे. या पथकाच्या प्रमुख उत्तम प्रशिक्षित महिला कर्मचारी असणार आहेत. तरुण तसेच विवाहित पुरुषांना महिलांची छेडछाड करताना रंगेहात पकडले जाणार आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणले जाईल. आई-वडिलांना बोलावले जाईल. विवाहित पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला पाचारण केले जाईल आणि त्यांच्या कारनाम्याचा पाढा वाचला जाईल. सोबत गुप्तपणे चित्रीकरण केलेली फीत असेल. जेणेकरून आरोपीसह गुन्हा नाकारण्याची संधीच मिळणार नाही. तक्रार द्यायला कोणी महिला किंवा मुलगी समोर आली नाही तरी बेहत्तर, पोलीसच स्वत: या प्रकरणाची फिर्याद देणार आहेत.
नांगरे-पाटील यांनी हैदराबादच्या धर्तीवर अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम कोल्हापुरात सुरू केला आहे. वास्तविक कोल्हापूर शहरात किंवा इचलकरंजी, कागल, गारगोटी, गडहिंग्लज आदि शहरांत दिवसाढवळ््या राजरोसपणे विद्यामंदिरात किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना हात घातला जात आहे. यावर आता अशा स्वरूपांच्या मोहिमांची खरंच गरज आहे.
एक तर सामाजिक धाक संपत चालला आहे. जी मुले छेडछाड करतात ती कोठून स्थलांतरित होऊन आलेली नाहीत. याच शहरात ती राहातात, त्यांनाही आया-बहिणी आहेत. त्यांच्यावर धाक दाखविणारा सामाजिक दबावच राहिलेला नाही. पोलीस यंत्रणाही कुचकामी होती. या सर्वांना विश्वास नांगरे-पाटील यांनी छेद दिला आहे. या मोहिमेत किती जणांवर कारवाई होईल किंवा झाली याचा हिशेब नंतर करू, पण आपण कशीही मोगलाई करू, असे जे वातावरण संपूर्ण भ्रष्ट, नीतीनष्ट समाज बदलाने झाले आहे, त्याला आळा बसेल.
नांगरे-पाटील यांच्यासारख्या नीतीमान अधिकाऱ्याकडे हे समाजाला ठणकावून सांगण्याचे बळ आज आहे. अशाच पद्धतीने पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणेने काम करायला हवे, ते कष्टाने उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व आज एक नैतिक धाक निर्माण करीत आहे. त्याला बळ द्यायला हवे.
- वसंत भोसले

Web Title: 'Nirbhaya' squads and corrupt society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.