नाइटलाइफचा बुडबुडा
By Admin | Updated: February 22, 2015 01:47 IST2015-02-22T01:47:18+5:302015-02-22T01:47:18+5:30
मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव स्वीकारून त्यावर विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे.

नाइटलाइफचा बुडबुडा
वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई कमालीची फुगत चालली आहे. तिच्या पर्यावरणीय स्वास्थ्यालाही धोका निर्माण झाला. तसंच नागरी सुविधांसंदर्भातील अनेक प्रश्नांनी मुंबईला ग्रासलं आहे़ राज्यकर्ते मात्र केवळ मुंबईच्या जोरावर विविध मार्गांनी महसूल गोळा करीत सरकारी तिजोऱ्या भरीत आहेत. यातूनच या लाडक्या मुंबईला एक बकालपण आलं आहे. अशातच या मुंबईला आणखी समस्याग्रस्त करण्याचा घाट सरकारी पातळीवर घातला जातोय. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव स्वीकारून त्यावर विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. राज्य सरकारचा हा विचार होण्यापूर्वीच आता मुंबईच्या आणि पर्यायाने मुंबईकरांच्या लाइफविषयी विचार होणं आवश्यक आहे.
मुंबई शहराला जागतिक शहराचा दर्जा देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याच्या प्रस्तावात अनेक असे मुद्दे आहेत, ज्यावर गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. मुळात नाइटलाइफची ही संकल्पना आदित्य ठाकरे यांना सुचली कशी? तर उघडच आहे, त्यांना ही संकल्पना युरोपातील काही देशांमधील नाइटलाइफवरूनच सुचली असावी. अमेरिका, लंडनप्रमाणेच सिंगापूर, हाँगकाँग यासारख्या देशांमध्ये ही नाइटलाइफची संकल्पना अति सामान्यरीत्या राबवली जाते. कारण या देशांची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती या संकल्पनेला पूरक आहे. तसेच हे युरोपिय देश उदारमतवादी विचारसरणीचे आहेत. यामुळेच या सर्व देशांमध्ये नाइटलाइफची संकल्पना रुजणं फारच सोपं आहे. मात्र आपल्या देशात अशी संकल्पना राबवणं म्हणजे स्वाभाविकपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर बाबींना खुलं आमंत्रण देण्यासारखंच आहे. आणि म्हणूनच नाइटलाइफच्या या संकल्पनेतील संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसंच या संकल्पनेमागील मूळ उद्देशही नीटपणे समजून घेतला पाहिजे. खरंतर प्रस्तावकर्त्यांनीच तो समाजाला आणि सरकारला नीट समजावून सांगितला पाहिजे.
नाइटलाइफच्या या संकल्पनेतील काही बाबींवर प्रकाश टाकणं यासाठीच आवश्यक आहे. या संकल्पनेअंतर्गत मुंबईतील हॉटेल, मॉल, रेस्तराँ, बार रात्रभर सुरू ठेवावीत, तसंच दूध सेंटर आणि औषधांची दुकानंही रात्रभर सुरू ठेवावीत, अशी मागणी केलीय. तसंच मुंबईच्या बीकेसी, काळाघोडासारख्या अनिवासी ठिकाणांचीही निवड केली आहे. या परिसरातील हॉटेल, मॉल, रेस्तराँ रात्रभर सुरू ठेवावी, अशी थेट मागणी नाइटलाइफच्या या प्रस्तावात आहेत. या प्रस्तावाला मुंबई पोलिसांनी काही अटींच्या बदल्यात मंजुरी दिलीय. मॉल, हॉटेल, रेस्तराँ परिसरात सीसीटीव्ही असावेत, ज्या परिसरात हॉटेल, रेस्तराँ, मॉल आदी सुरू राहतील, त्या सर्वच ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था असावी आणि ज्या ठिकाणी मॉल रात्रभर सुरू असतील तिथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था असावी, अशा तीन प्रमुख अटींच्या बदल्यात मुंबई पोलिसांनी हा प्रस्ताव मंजूर केलाय. मुंबई पोलिसांनी ज्या अटींच्या बदल्यात ही परवानगी दिली, त्यातील या पहिल्या तीन प्रमुख अटींचा जरी अभ्यासपूर्ण विचार केला तरी आपल्याला नाइटलाइफमधील संभाव्य धोक्याची कल्पना येऊ शकते. तसंच याच अटींच्या अनुषंगाने विचार केल्यास राज्याच्या पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ शकतो, हेही स्पष्ट होतं.
खरंतर मुद्दा नाइटलाइफच्या संकल्पनेचाच आहे. ही संकल्पना मुंबईच्या फायद्याची कमी आणि तोट्याची अधिक आहे, हे उघड आहे. कारण ज्या ठिकाणांना रात्रभर सुरू ठेवण्यासाठी परवानगी मागण्यात येत आहे, ती सर्व ठिकाणं सामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरची आहेत. मुंबईतील उच्चभ्रू लोकांचीच येण्या-जाण्याची, उठण्या-बसण्याची ही ठिकाणं आहेत. राहता राहिला भाग परदेशी पर्यटकांचा; तर तेही अशा ठिकाणांत किती रस दाखवतील, हाही अभ्यासाचा विषय आहे. मात्र संकल्पनाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई रात्रभर सुरू राहिली तरी लोक रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर फिरू शकतील, खाऊपिऊ शकतील. मुंबईला एका जत्रेचं स्वरूप प्राप्त होईल. नाइटलाइफच्या संकल्पनाकर्त्यांचं हे म्हणणं अपरिपक्वपणाचं आहे. तसंच या म्हणण्यामागील खरा उद्देश निराळाच आहे. मुंबई रात्रभर सुरू राहिली तर आपसूकच आजघडीला जी ठिकाणं बंद आहेत, ती ठिकाणंही हळूहळू पूर्वीप्रमाणेच सुरू होतील. (उदा. डान्सबार, डिस्कोथेक, पब वगैरे वगैरे). अशी ठिकाणं पुन्हा सुरू होण्यासाठीच हा सारा नाइटलाइफचा घाट घातला जातोय, हे सरकारने समजून घेतलं पाहिजे अन्यथा ज्या डान्सबारबंदीच्या विरोधात जे सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलंय, त्याच सरकारवर डान्सबार सुरू करण्यासाठीचे प्रयत्न केल्याचा आरोप जनतेकडून होण्याची शक्यता आहे.
तसंच ज्या तरुणाईला आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या आजच्या तरुणांना करिअर हवं आहे की नाइटलाइफ हवे आहे, हे प्रश्न थेटपणे विचारणं आवश्यक आहे. कारण आजचा युवक हा संवेदनशील आणि सामाजिक जाण आणि भान ठेवणारा आहे. या संकल्पनेला विरोध करण्यामागचा आणखी एक प्रमुख मुद्दा म्हणजे राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करताहेत. ग्रामीण भागात आजही लोडशेडिंगची समस्या लोकांना सतावते आहे. अशावेळी मुंबई पोलिसांच्या अटीनुसार रात्रभर मुंबईत सुरू राहणाऱ्या ठिकाणांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देणं म्हणजे त्या शेतकऱ्यांची आणि लोडशेडिंगने त्रस्त ग्रामीण नागरिकांची थट्टा केल्यासारखं आहे.
नाइटलाइफच्या संकल्पनेत सर्वात मोठा धोका आहे, तो महिलांवरील वाढत्या अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांचा. रात्रभर तरुणाई आणि लोक मुंबईच्या रस्त्यावर मौजमजा करणार आणि तरीसुद्धा शहरातील एकाही तरुणीवर अथवा महिलेवर अतिप्रसंग अथवा बलात्कार होणार नाही, याची हमी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला देणं शक्य आहे का? खुद्द आदित्य ठाकरे तरी ही हमी देऊ शकतात का? आज दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार होताहेत, अल्पवयीन मुलींवर बलात्कार होताहेत. अशा बिकट परिस्थितीत रात्रीच्या अंधारात किती गंभीर घटना घडू शकतात, याचाही राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देताना विचार करायला हवा.
यासोबतच राज्याची आणि मुंबई शहराची दुसरी बाजूही तपासून पाहाणं आवश्यक आहे. कारण राज्यात अवकाळी पावसामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झालीय. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. बहुसंख्य लोकांना कमी शिक्षण मिळतंय आणि म्हणून रोजगार उपलब्धी नाही. प्रोडॅक्टिव्हिटी नाही. अन्न, वस्त्र, निवारा यांचा आणि सर्वत्र मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. कायदे असूनही दारू, सिगारेट, तंबाखू, ड्रग्सच्या विक्रीचं प्रमाण वाढत आहे. हे सर्व प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. हे सर्व सोडून मराठी माणसाचा कैवार असणाऱ्यांनी या प्रश्नांबाबत तत्परता दाखवणं गरजेचं होतं. पर्यटन, आर्थिक वाढ होईल आणि मुंबईला जागतिक दर्जाचं स्थान मिळेल़ म्हणून हॉटेल, बार, पब रात्रभर सुरू ठेवून नाइटलाइफच्या नावाखाली रात्रीची मुंबई सुरू ठेवण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्याची या मंडळींची धडपड संतापजनक आहे. या धडपडीवरून असा प्रश्न निर्माण होतो की, राजकीय पक्षांची प्राथिमकता काय? या प्रस्तावावर पोलिसांनीही सहमती दर्शवणं, हे अजून एक धक्कादायक आहे. पुन्हा युवापिढी आणि सदृढ समाजाला व्यसनांच्या आहारी, गृन्हेगारी प्रवृत्तीकडे आकर्षित करण्याच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करावाच लागेल.
मुंबईत मोकळी हवा घेता आली पाहिजे, सुरक्षितपणे फिरता आलं पाहिजे. पण आता राज्यात राजकारण्यांमुळे कुप्रशासन आणि धर्मवाद्यांमुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे, हे गंभीर आहे. पूर्वीच्या काळी अंडरवर्ल्डचं वातावरण असताना नाइटलाइफ होती ना? आज सामान्य माणूस सुरक्षित आहे का? त्याला मोकळेपणाने फिरता येत नाहीय. त्यात जर रात्रभर नाइटलाईफ सुरू ठेऊन अपघात, छेडछाड, अनैतिक धंदे, गुन्हे, नागरिकांना उपद्रव याला खुलं आमंत्रणच मिळेल. याला डान्सबारची सुधारित आवृत्तीच म्हणता येईल.
हे सर्व कुणासाठी आणि कशासाठी, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सर्वसाधारण कुटुंबातील लोकांना हे परवडणारं नाही. ते तिथे कदाचित जाणारही नाहीत. यामुळेच हे सर्व चाललं आहे ते काही मूठभर उच्चभ्रूसांठीच. म्हणूनच या नाइटलाइफच्या संकल्पनेला आता सामान्य मुंबईकरांनीच विरोध करायला हवा. त्यासाठी गरज भासली तर रस्त्यावर उतरायलाही मागेपुढे पाहता कामा नये. कारण आता पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणेच मुंबईच्या संरक्षणासाठी लढा उभारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. (सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य)
वर्षा विद्या विलास