न्यूझीलंडचा क्रिकेट संघ माझा आवडता का?
By Admin | Updated: March 27, 2015 23:24 IST2015-03-27T23:24:44+5:302015-03-27T23:24:44+5:30
माझ्या बाल्यावस्थेत म्हणजे साठच्या दशकात मला वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडचे संघ जागतिक क्रिकेट मधले दक्षिण आणि उत्तर ध्रुवाला जोडणारे दुवे वाटायचे.

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ माझा आवडता का?
माझ्या बाल्यावस्थेत म्हणजे साठच्या दशकात मला वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडचे संघ जागतिक क्रिकेट मधले दक्षिण आणि उत्तर ध्रुवाला जोडणारे दुवे वाटायचे. दोन्ही देशांची भाषा इंग्रजी, दोन्ही देशांत ख्रिश्चन धर्म. छोट्या-छोट्या बेटांवर विखुरलेले हे दोन देश भारतातल्या एखाद्या मध्यम शहरांत सहज मावतील एवढे होते.
हे झाले दोघांना जोडणारे भौगोलिक आणि लोकसंख्येच्या संदर्भातील घटक. पण क्रिकेटच्या बाबतीत दोघे संघ अगदी विरुद्ध होते. वेस्ट इंडीज संघ त्यावेळी निर्विवाद जगज्जेता होता तर न्यूझीलंडचा संघ त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर अगदीच दुबळा होता. माझा, म्हणजे भारताचा संघ नेहमीच वेस्ट इंडीज समोर हरणार हे अपेक्षित असायचे, तसाच तो न्यूझीलंडला हरवणार हेही अपेक्षित असायचे. तसेच झाले आणि अपेक्षेप्रमाणे विदेशातली पहिली कसोटी मालिका आपण न्यूझीलंडच्या विरोधातच जिंकलोे.
१७ फेब्रुवारी, १९७६ पर्यंत भारताचा संघ न्यूझीलंडच्या संघाला तुच्छतेने वागवत होता. पण त्या दिवशी बातमी आली की आपण चक्क एका डावाने एक कसोटी हरलो आणि तीही कोणासमोर, तर ज्या संघाला आपण जगातला सगळ्यात दुबळा संघ समजत आलो, त्याच्याच विरोधात. त्या काळी फारशा परिचित नसलेल्या आर.जे. हेडली या तरुणाने वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर २३ धावांच्या बदल्यात ७ बळी घेतले होते आणि याच सामन्यात भारताचा डाव ३ बाद ७५ वरून सर्व बाद ८१ असा गडगडला होता.
न्यूझीलंडच्या संघात अनेक उत्कृष्ट खेळाडू होऊन गेले. मार्टीन डोनेली आणि बर्ट सटक्लीफ हे डावखुरे फलंदाज तर स्विंग करू शकणारे जे.ए.कोवी आणि डीक मोट्ज हे गोलंदाज विश्व एकादश संघासाठी पात्र होऊ शकतील असे खेळाडू होते.
वेळ आणि वातावरण अनुकूल असेल तर कसोटी सामना सहजी जिंकता येऊ शकतो ही जाणीव रिचर्ड हेडलीने पहिल्यांदा न्यूझीलंड संघाला करून दिली. त्याच्या तारु ण्यात तो भेदक द्रुतगती गोलंदाज तर होताच पण पुढे जाऊन त्याने बाकी काही कौशल्येहीे आत्मसात केली होती. त्याला दोन्ही बाजूंना चेंडू स्विंग करता येत होता, कौशल्याने यॉर्कर टाकता येत होता, त्याचे पदलालित्य सुंदर होते व तो खालच्या फळीतला चांगला फलंदाजही होता. त्यानंतरच्या काळात संघावर जबरदस्त प्रभाव पाडणारा खेळाडू म्हणजे मार्र्टीन क्रो. त्याचा मोठा भाऊदेखील कसोटी क्रि केट खेळला होता. जगातला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जसा हेडलीचा गवगवा होता तसाच ऐंशीच्या दशकात मार्टीन क्रोे जगातला एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून गणला जात होता. तो मैदानावर चौफेर फटके मारायचा आणि वेगवान तसेच मध्यमगती गोलंदाजीचाही चांगला सामना करायचा. खालच्या फळीत तो चांगली फलंदाजी करायचा. आपली गोलंदाजी क्रोइतकी चांगली कोणीच खेळलेले नाही, अशी प्रशस्ती खुद्द वसीम अक्र मने त्याला दिली होती.
मी स्वत: हेडलीला प्रत्यक्ष खेळताना कधीच बघितले नाही. रेडिओवरून त्याच्या गोलंदाजीचे विश्लेषण ऐकले आहे आणि कधीतरी टीव्हीवर बघितले आहे. मार्र्टीन क्रोला खेळताना दोनदा प्रत्यक्ष पाहिले, पण दुर्दैवाने, प्रत्येकवेळी तो भारतीय पंचांच्या अयोग्य निर्णयाला बळी पडला. १९८७ सालच्या बंगळुरू येथील विश्वचषक सामन्यात भारताविरुद्ध खेळताना त्याला मणिंदरसिंगच्या गोलंदाजीवर स्टम्प आउट देण्यात आले. पण रिप्लेत स्पष्ट दिसत होते की यष्ट्या उडवल्या गेल्या तेव्हा यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू नव्हताच. त्या नंतर आठ वर्षांनंतर त्याच मैदानावर तो परत चुकीच्या निर्णयाला बळी पडला. अनिल कुंबळेच्या लेग स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या आणि उंच असणाऱ्या चेंडूवर त्याला पायचित देण्यात आले. तिसरा खेळाडू म्हणजे अष्टपैलू क्रिस केर्न्स. त्याचे मैदानाबाहेरचे वर्तन सोडले तर तो उत्कृष्ट क्रि केटपटू होता. गोलंदाजीत त्याचे चेंडूवर नियंत्रण होते तर फलंदाजी आक्र मक होती. उत्तुंग फटके मारण्यात त्याला रस होता. मला आठवतंय, इंग्लंडमध्ये एकदा मी टीव्हीवर कसोटी सामना बघत होतो. त्या सामन्यात तो इंग्लंडचा डावखुरा गोलंदाज फिल टफनेल याचा सामना करत होता. षटकातील एक चेंडू त्याने पुढे येत टोलवला खरा, पण फटका नीट जमला नाही तरी त्याच्या खात्यात षटकार जमा झाला. नंतरच्या चेंडूला त्याने तसेच परत पुढे येत एक उत्तुुंग फटका मारला आणि चेंडू थेट पार्किंगच्या पलीकडे जाऊन पडला. हा फटका चांगलाच जमला होता. त्यामुळे तो मारल्यानंतर त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले त्याचे विशिष्ट शैलीतले उद्गार यष्ट्यांमध्ये दडलेल्या मायक्रोफोनने अचूक पकडले, ते होते, ‘दॅट्स बेटार’.
भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांना आपण हरवू शकतो, ही जाणीव हेडली, क्र ो आणि केर्न्स या तिघांनी न्यूझीलंड संघाला करून दिली. तोच आत्मविश्वास आजचा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डम मॅक्कलम याच्यात दिसून येतो. पहिल्या दहा षटकातच सामन्याचा रोख निश्चित करून देण्याच्या बाबतीत त्याच्या फलंदाजीने तर सनत जयसूर्यालाही मागे टाकले आहे. केवळ धावा रोखण्यापेक्षा बळी घेण्याच्या बाबतीत तर त्याने स्टीव्ह वॉलासुद्धा मागे टाकले आहे.
विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने आत्तापर्यंत अत्युत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. इलियट, विलियम्सन, टेलर, गुप्टील आणि मेक्कलमची फलंदाजी, बोल्ट आणि सौथी यांची स्विंग गोलंदाजी आणि वयस्कर डॅनियल व्हेटोरी याची फिरकी गोलंदाजी या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. संघाचे क्षेत्ररक्षणसुद्धा अभेद्य आहे. लोकसंख्येचा विचार करता याआधीच्या वेस्ट इंडीजच्या संघाप्रमाणेच आता न्यूझीलंडच्या संघाची कामगिरी आश्चर्यजनक आहे. या देशात आज ७० कोटी मेंढ्या आहेत, पण लोकसंख्या आहे केवळ ५० लाख ! ही लोकसंख्या नोयडासारख्या शहरात सहज मावून जाईल. पण इतकी अल्प लोकसंख्या असलेल्या देशात तयार होणारे क्रि केटपटूच जगज्जेते ठरत आहेत.
उद्याच्या अंतिम सामन्यात जे काही घडेल ते घडेल. पण माझ्या नजरेत विश्वचषकाच्या या सामन्यांमधील न्यूझीलंडचा संघ हाच खरा संघ आहे. त्यांचे प्रदर्शन अत्यंत उत्कंठापूर्ण राहिले आहे. प्रदीर्घ काळ क्रिकेट जगतातील तथाकथित बलाढ्य संघ ज्या तुच्छतेने या संघाकडे बघत आले, ती तुच्छता मेक्कलमच्या संघाने एव्हाना पार धुऊन काढली आहे.
रामचन्द्र गुहा
(इतिहासकार आणि क्रिकेट समीक्षक)