नवे शिलेदार

By Admin | Updated: February 8, 2017 23:29 IST2017-02-08T23:29:57+5:302017-02-08T23:29:57+5:30

‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकींची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे. सोबतच दहा महापालिकांच्या निवडणुकींचा ज्वरही वाढला आहे.

New Shale | नवे शिलेदार

नवे शिलेदार

‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकींची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे. सोबतच दहा महापालिकांच्या निवडणुकींचा ज्वरही वाढला आहे. या निवडणुकींच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांचे राजकीय वारसदार भाग्य आजमावत आहेत. शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचा पुतण्या रोहित, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या अदिती, मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक, खासदार प्रतापराव जाधव यांचा मुलगा ऋषिकेश, आमदार बाबूराव पाचर्णे यांचा पुत्र राहुल ही मंडळी जिल्हा परिषदांच्या आखाड्यात उतरली आहे.

दुसरीकडे खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील, खासदार अनिल शिरोळे यांचा पुत्र सिद्धार्थ, आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश हे ठळक चेहरे मुंबई, पुणे व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करणार आहेत. प्रस्थापित नेत्यांचे वलय पाठीशी असणे ही त्यांची जमेची बाजू असली, तरी उच्चविद्याविभूषित असलेल्या या नव्या शिलेदारांना ‘घराणेशाही’ या राजकारणातील प्रचलित आरोपाचे धनीही ठरावे लागत आहे. घराणेशाहीचा आरोप सकृतदर्शनी खरा असला, तरी शेवटी ही मंडळी जनता जनार्दनाच्या दरबारात भाग्य आजमावणार आहे. त्यांना आपले प्रतिनिधी करायचे की नाही, हे जनता ठरवेलच; परंतु या चेहऱ्यांवर मारला जाणारा ‘केवळ प्रस्थापितांचे नातेवाईक’ हा शिक्का योग्य वाटत नाही.

ही मंडळी हवे तर विदेशात जाऊन किंवा घराण्याच्या व्यवसायात रमून बक्कळ पैसा कमावू शकते; पण ते सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून राजकारणात उतरत असतील, त्यांच्या ‘व्हिजन’चा जनतेसाठी उपयोग करणार असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवे! दुर्दैवाने राजकारण म्हटले की ‘मनी अ‍ॅण्ड मसल पॉवर’ हेच आज प्रमुख ‘क्वालिफिकेशन’ समजले जाते. त्यामुळेच सर्वसामान्य माणूस राजकारणापासून दूर राहतो. अलीकडे कार्यकर्ताही सतरंज्या उचलण्यापुरता मर्यादित झाला हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून ज्या चेहऱ्यांचा राजकीय पटलावर उदय होऊ बघतोय, त्यांच्यावर सर्वसामान्य माणसाच्या मनात वर्षानुवर्षे घर करून बसलेली राजकीय नेत्यांची ‘ती’ छबी बदलण्याची फार मोठी जबाबदारी निश्चितच राहणार आहे. केवळ राजकीय वारसदार म्हणून नव्हे, तर जनतेला त्यांच्याबद्दल विश्वास वाटावा, या दृष्टिकोनातून त्यांनी या निवडणुकांकडे पाहिले पाहिजे.

Web Title: New Shale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.