भविष्याविषयी कधीही ठोकताळे बांधू नयेत!
By Admin | Updated: February 6, 2017 23:56 IST2017-02-06T23:56:05+5:302017-02-06T23:56:05+5:30
डोनाल्ड ट्रम्प विलक्षण गुंतागुंतीचे व्यक्तित्व आहे. त्यामुळे त्याचे चित्र रेखाटणे कठीण आहे. पाश्चात्त्य मीडियाने त्यांना ‘अनाकलनीय बदमाश’ म्हटले आहे.

भविष्याविषयी कधीही ठोकताळे बांधू नयेत!
हरिष गुप्ता, (‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
डोनाल्ड ट्रम्प विलक्षण गुंतागुंतीचे व्यक्तित्व आहे. त्यामुळे त्याचे चित्र रेखाटणे कठीण आहे. पाश्चात्त्य मीडियाने त्यांना ‘अनाकलनीय बदमाश’ म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिकेतील रिपब्लिकन हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष ट्रम्प यांचे अनुयायी शलभकुमार यांनी ट्रम्प यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यात तर्कशुद्धता शोधणे कठीण आहे. ते म्हणाले होते, ट्रम्प यांना केवळ विकास, विकास आणि विकास तसेच समृद्धी, समृद्धी आणि समृद्धीचाच ध्यास लागलेला असतो. अमेरिकेची जनता काही वर्षांनंतर किंवा काही महिन्यांनंतर ट्रम्पविषयी काय बोलेल हे आज कुणी सांगू शकणार नाही.
आपण अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचाच विचार करू. ते अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष होते. व्हिएतनामच्या युद्धातील अमेरिकेचा सहभाग निक्सन यांनीच संपुष्टात आणला. अमेरिकेच्या युद्धकैद्यांची सुटका करून त्यांना परत अमेरिकेत आणले आणि लष्करी कारवाई संपविली. त्यानंतर १९७३ साली निक्सन यांनी चीनच्या कारभारात गुप्तपणे हस्तक्षेप करून पूर्वेकडील राज्यातील अमेरिकेच्या गुंतवणुकीबाबत परराष्ट्रमंत्री हेन्री किसींजर यांच्या सहकार्याने पूर्व आशियात एक नवे पर्व सुरू केले. त्यामुळे चीनचा संबंध अमेरिकेच्या तंत्रज्ञानाशी आला, तसेच अमेरिकेने शीतयुद्धाच्या दानपेटीवर पहिला खिळा ठोकून स्वत:चाही भरपूर लाभ करून घेतला. अमेरिकेमुळे रशियाने चीन हा आपला अत्यंत महत्त्वाचा मित्र गमावला. अमेरिका-रशिया शांतता पुढाकारातही निक्सन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. क्षेपणशास्त्रविरोधी पुढाकारातही निक्सन यांचे कार्य महत्त्वाचे होते. सध्या हवामान बदलाच्या पुढाकाराचा आरंभही निक्सन यांच्या काळात पर्यावरण सुरक्षा संस्थेच्या स्थापनेने झाला. अपोलो-११च्या चंद्र मोहिमेचेही ते सूत्रधार होते. त्यानंतर चंद्रावर जाण्याची शर्यत संपुष्टात आली.
वॉशिंग्टन येथून सर्व अधिकार काढून घेऊन ते राज्यांना बहाल करण्याचे अभिवचन रिपब्लिकन पक्षाचे निक्सन यांच्याप्रमाणेच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. १९७३मध्ये निक्सन यांची दुसरी कारकीर्द सुरू झाली. त्यावर्षी सरकारी गुप्तहेरांनी वॉशिंग्टनच्या वॉटरगेट भागात असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रतिक्रिया एवढी मोठी होती की निक्सन यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे इतिहासात निक्सन यांची नोंदही कदाचित एक बदमाश म्हणूनच होईल. पण त्यांच्यावरील आरोप किती खरे आणि किती काल्पनिक होते हे सूक्ष्म अवलोकन केले असताना दिसून येईलच. एकूणच निक्सन हे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व होते.
ट्रम्प कसे असतील हे आताच सांगणे घाईचे होईल. ते संकुचित विचारसरणीचे आहेत की राष्ट्रवादी आहेत की गुंतागुंतीचे आहेत याचे भाकीत आज करता येणार नाही. पण ट्रम्प यांच्या आतापर्यंतच्या हालचालीवरून भारतीय दृष्टिकोनातून त्यांचे आकलन करणे उताविळपणाचे ठरेल. निवडणुकीच्या काळात त्यांनी जी टोकाची भूमिका घेतली होती त्यापासून दूर जाण्याचे ते प्रयत्न करीत असल्याचे दिसते. मेक्सिकन लोकांवर २० टक्के कर लावण्याच्या धोरणापासून त्यांनी माघार घेतली आहे. ट्रम्प यांनी चीनवर दादागिरी गाजवण्याचेही थांबविले आहे. चिनी दूतावासाने केलेल्या चीनच्या नववर्ष दिनाच्या कार्यक्रमात ट्रम्प यांची कन्या इन्हान्का सहभागी झाली हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. इन्हान्कासोबत तिची पाच वर्षाची मुलगी अॅराबेलासुद्वा गेली होती आणि तिने मॅन्डॅरीनवर चिनी गाणेही म्हटले ! अमेरिकेतील भारतीय मात्र ट्रम्प यांचे टीकाकार आहेत.
तेही प्रामुख्याने हिंदू आहेत. ट्रम्प हे मुस्लीम समाजाविषयी चिडखोरपणा व्यक्त करीत असूनही हिंदूंच्या वागणुकीत फरक पडलेला नाही. पण गेल्यावर्षीच्या वसंत ऋतूत त्यांच्यापैकी सात टक्के लोकांनी आपण ट्रम्प यांना मतदान करू, असे सांगितले होते. ज्या मूल्यांसाठी समृद्धांचा वर्ग अमेरिकेकडे आकृष्ट झाला, त्या मूल्यांचा कर्दनकाळ अशी ट्रम्प यांची ओळख असल्यामुळे अमेरिकन भारतीयांना ट्रम्पविषयी तिटकारा वाटत असावा. सर्वांना समान संधी, सांस्कृतिक विविधता आणि उत्तम शैक्षणिक संस्था ही अमेरिकेची बलस्थाने असल्यामुळे ट्रम्प यांनी काही मुस्लीम राष्ट्रातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणे (त्यात आश्चर्यकारकपणे पाकिस्तानला समाविष्ट केलेले नाही.) किंवा देशांतर्गत सुरक्षाविषयक गोष्टींना प्राधान्य देणे यामुळे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सामाजिकदृष्ट्या विभाजन केले जाणार आहे.
ट्रम्प यांच्या या हालचाली प्रस्थापित मानकांपासून तसेच दुसऱ्या महायुद्धानंतरच्या राजकीय स्थितीतून निर्माण झालेल्या मूल्यांपासून निश्चितच दूर नेणाऱ्या आहेत. पण असे असले तरी ट्रम्प हे भारतीय अमेरिकनांना दूर सारण्यास तयार नाहीत. उलट ट्रम्प यांच्या प्रशासनात चार भारतीय अमेरिकनांना महत्त्वाच्या स्थानांवर बसविण्यात आले आहे. फेडरल कम्युनिकेशन्स मिशन्सच्या प्रमुखपदी अजित वरदराज पै यांची वर्णी लागली आहे. संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेचे राजदूत म्हणून निक्की हॅले यांची नेमणूक करण्यात आली आहे. अमेरिकेतील आरोग्य संस्थेची प्रमुख म्हणून सीमा वर्मा यांना स्थान देण्यात आले आहे. न्यू यॉर्कच्या दक्षिण विभागाचे अमेरिकन अॅटर्नी म्हणून प्रीत भरारा यांचेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पण भारतीय अमेरिकनांची उच्च पदांवर नेमणूक करीत असताना अध्यक्ष ट्रम्प यांचे प्रशासन अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांसंबंधीच्या धोरणापासून दूर जाण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे एच-१ बी व्हिसा घेऊन अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांची संख्या प्रभावित होऊ शकते.
एच-१ बी व्हिसा धारण करणाऱ्यांचे किमान वेतन ६०,००० डॉलरवरून १,३०,००० डॉलर करण्यात आले आहे. पण नुकत्याच घेतलेल्या सर्वेक्षणाने असे दिसून आले आहे की, एच-१ बी व्हिसा धारण करणाऱ्यांना ९०,००० डॉलर्स इतके वेतन मिळते. त्यामुळे त्यांना नोकरीत कायम ठेवण्यात त्यांच्या मालकांना कोणतीच अडचण येणार नाही. भारतीय कामगारांऐवजी तेवढ्याच कौशल्याचे अमेरिकन कामगार ठेवणे आर्थिक दृष्टीने कितपण परवडणारे आहे याचा आढावा घेण्यास अमेरिकन व्यावसायिकांना वेळ लागेल. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक कंपन्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवणे टाळावे.
त्याऐवजी त्यांनी भारतातच त्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य वृद्धिंगत करावे. पण हा सल्ला देताना ‘भविष्याविषयी कधीही ठोकताळे बांधू नयेत’ ह्या हॉलीवूडचे बादशहा सॅम्युएल गोल्डविन यांच्या प्रसिद्ध सल्ल्याकडेही दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी बजावले आहे. निक्सन यांची विरुद्ध प्रतिमा म्हणजे ट्रम्प हे तेच दाखवून देत आहेत. त्यामुळे त्यांच्या चुका जरी निक्सन यांच्यासारख्या नसल्या आणि त्यांचे डावपेच जरी निक्सन यांच्याप्रमाणे नसले तरी इतिहासच या टी.व्ही. स्टारपासून अमेरिकेचा अध्यक्ष बनलेल्या व्यक्तीचे वास्तव दाखवून देईल ! रशियाचे अध्यक्ष व्ही. पुतीन यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर करून ते उत्तर कोरिया, पाकिस्तान आणि भारत यांच्यासह सर्वांचे अणुबॉम्ब नष्ट करण्याचा प्रयत्न करतील तर शांततेला जगात अस्तित्व दाखविण्याची संधी मिळू शकेल !