वंशवादाची नीरगाठ
By Admin | Updated: May 30, 2016 23:43 IST2016-05-30T23:43:23+5:302016-05-30T23:43:23+5:30
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषाच्या विरोधात आवाज उठवला आणि दैवदुर्विलास असा की, आज याच गांधीजींना महात्मा ठरविणाऱ्या भारतात कृष्णवर्णीय आफ्रिकी विद्यार्थी व नागरिकांवर हल्ले होत

वंशवादाची नीरगाठ
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषाच्या विरोधात आवाज उठवला आणि दैवदुर्विलास असा की, आज याच गांधीजींना महात्मा ठरविणाऱ्या भारतात कृष्णवर्णीय आफ्रिकी विद्यार्थी व नागरिकांवर हल्ले होत आहेत. मात्र अशा घटनांबाबत केंद्र सरकारचा जो विस्कळीत प्रतिसाद आहे, तोही या हल्ल्यांएवढाच चिंताजनक आहे. हा नुसता भारतातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर त्यात परराष्ट्र व्यवहाराचाही संबंध येतो. कांगो या आफ्रिकी देशातील एका विद्यार्थ्याचा दिल्लीत खून झाल्यावर भारतातील आफ्रिकी देशांच्या राजदूतांनी संयुक्तरीत्या एक निवेदन परराष्ट्र खात्याला देऊन चिंता व्यक्त केली होती. तेव्हा या खात्याचे राज्यमंत्री व पूर्वीचे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी या राजदूतांशी चर्चा करून अशा समस्या त्वरित हाताळल्या जातील आणि कोणत्यही प्रकारचा वांशिक भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. शिवाय सर्व आफ्रिकी देशांच्या राजदूतांशी नियमितपणे संवाद चालू ठेवण्याची तयारीही जनरल सिंह यांनी दाखवली होती. आता हेच जनरल सिंह म्हणत आहेत की, ‘या घटना म्हणजे मामुली झटापट होती’. त्याचवेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आफ्रिकी विद्यार्थांच्या सुरक्षिततेची जबाबदारी काळजीपूर्वक घेण्याचे आदेश दिल्लीसह देशातील इतर राज्यांतील सरकारांना दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही तेच म्हटले आहे. हे सारे घडत असताना आफ्रिकी देशांतील भारतीयांना लक्ष्य केले जात असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. जेथे या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे, तेथील सरकारांनीही भारतीयांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. मात्र त्याचवेळी या भारतीयांनी कायदे व नियम यांचे पूर्ण पालन करावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. ती करण्याचे मुख्य कारण म्हणजे या देशांतील भारतीयांच्या संघटनांपैकी काहींनी निदर्शने व मोर्चे काढण्याचे आखलेले बेत हे आहे. ‘भारतीय आणि आफ्रिकी नागरिक’ या समस्येभोवती वंशवादाची नीरगाठ बसली आहे आणि ती अधिक घट्ट झाली आहे, गुन्हेगारीकरण व त्याला कायदा व सुव्यवस्थेच्या यंत्रणेकडून मिळणारा प्रतिसाद यामुळे. आफ्रिकी देशांतील अनेक विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी पूर्वापार येत राहिले आहेत. महाराष्ट्रातील पुणे किंवा कर्नाटकातील बंगळुरू, दिल्ली इत्यादी ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने हे विद्यार्थी येऊन राहत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत या विद्यार्थ्यांच्या जोडीला इतर अनेक आफ्रिकी नागरिक-विशेषत: नायजेरिया वगैरे देशांतील-भारतात शिक्षणाच्या मिषाने येऊन अमली पदर्थांच्या व्यापारात सामील होत गेले आहेत. आफ्रिकी नागरिकांपैकी काही जर अमली पदार्थांचा व्यापार किंवा वेश्याव्यवसायात गुंतलेले असतील, तर त्यांना भारतीय कायद्याच्या चौकटीत तपास करून पुन्हा मायदेशी पाठवता येणे सहज शक्य आहे. पण तसे झालेले नाही; कारण भारतीय पोलीस व प्रशासन व्यवस्थाच भ्रष्टाचाराने पोखरली गेली असल्याने अशा व्यवहारात गुंतलेले आफ्रिकी नागरिक पैसे देऊन अभय मिळवत आले आहेत. मात्र स्थानिक नागरिकांना अशा बेकायदेशीर व्यवहाराचा त्रास होत असतो. ते तक्रार करीत राहतात. पण पैसे घेणारे पोलीस व नागरी प्रशासन काणाडोळा करते. मग मध्यंतरी गोव्यात झाला, तसा नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होतो. हाच प्रकार ‘आप’चे सरकार पहिल्यांदा आले, तेव्हा दिल्लीच्या एका भागात घडला होता. असे प्रकार फक्त भारतातच होतात, हेही खरे नव्हे. पाश्चिमात्य विकसित देशांतही हे घडत असते. पण तेथे कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे हाताळली जाते आणि त्यात जर गडबड होत असेल, तर तशी ती करणाऱ्यांना शासनही होते. म्हणून हे प्रकार तेथे आटोक्यात राहतात. भारतात हे घडलेले नाही. परिणामी स्थानिकांचा असंतोष आणि एकूणच सर्वसामान्यांच्या नेणिवेत असलेला वर्णविद्वेष उफाळून येतो व असे हल्ले होतात किंवा गुन्हेगारीकरणातूनही वाद होऊन झालेली ही खूनबाजी असू शकते. म्हणूनच अशा घटनांचा तपास नि:पक्षपातीपणे व झटपट व्हायला हवा. प्रसार माध्यमांची व्याप्ती व प्रभाव आणि एकूणच जगभर वंशवादाच्या विरोधात उभे राहत गेलेले वातावरण बघता अशा घटनांचा मोठा बोलबोला होत असतो आणि या घटना ‘मामुली झटापट’ ठरवून तो टाळता येणेही अशक्य आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी सर्व आफ्रिकी राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद दिल्लीत घेतली होती. आफ्रिकी देशात मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. पण तिचे उत्खनन करून ती वापरात आणण्याएवढे भांडवल व मनुष्यबळ या देशांकडे नाही. हे ओळखून चीनने आफ्रिकी खंडात पैशाच्या थैल्या व मनुष्यबळ घेऊन मुसंडी मारली आहे. त्याला तोंड देण्याचा एक भाग म्हणून मोदी यांनी ही परिषद घेतली होती. मात्र आफ्रिकी नागरिकांवरील हल्ल्यांमुळे अशा प्रयत्नांना खीळ बसण्याचा आणि आफ्रिकी खंडात चीनशी स्पर्धा करण्याच्या आपल्या बेतात अडथळे येण्याचा मोठा धोका आहे. हे टाळण्याकरिता वंंशवादाची डूब असलेल्या अशा घटनांना गुन्हेगारीकरणामुळे जी नीरगाठ बसली आहे, ती अत्यंत कौशल्याने सोडवावी लागणार आहे.