भाजपाच नव्हे, सर्वच पक्षात मुस्लिमांची उपेक्षा
By Admin | Updated: June 11, 2015 23:28 IST2015-06-11T23:28:48+5:302015-06-11T23:28:48+5:30
मुख्तार अब्बास नक्वी यांच्याही कितीतरी आधी म्हणजे सुमारे दोन दशकांपूर्वी सिकंदर बख्त हा भाजपाचा मुस्लीम चेहरा होता. केवळ हिंदूंचा पक्ष अशी टीका

भाजपाच नव्हे, सर्वच पक्षात मुस्लिमांची उपेक्षा
राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
मुख्तार अब्बास नक्वी यांच्याही कितीतरी आधी म्हणजे सुमारे दोन दशकांपूर्वी सिकंदर बख्त हा भाजपाचा मुस्लीम चेहरा होता. केवळ हिंदूंचा पक्ष अशी टीका कोणाला करता येऊ नये म्हणून बख्त भाजपात असावेत. १९९६ साली जेव्हा सर्वप्रथम अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा बख्त यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आले. तुलनेने कमी महत्त्वाचे खाते मिळाल्यामुळे ते जरासे नाराजही होते. मी जेव्हा त्यांच्या भेटीला गेलो तेव्हा ते आपणहून मला म्हणाले की, ‘पक्षामध्ये मी इतका ज्येष्ठ असतानाही केवळ मुसलमान असल्यामुळेच मला कमी महत्त्वाचे खाते दिले असे बहुतेक तू मला विचारशील’. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात वाजपेयींनी त्यांच्याकडे परराष्ट्र खाते सोपवले, पण वाजपेयीचे ते सरकार केवळ तेरा दिवसच सत्तेत राहिले. पण त्यातून भाजपातील मुस्लिमांच्या अवस्थेविषयीचे सत्य पुरेसे उजेडात आले.
काही आठवड्यांपूर्वी नक्वी यांना एका पत्रकार संमेलनात मी गोमांसबंदीबाबत छेडले आणि देशातील अल्पसंख्य समाजावर त्याचा कसा परिणाम होईल, असे विचारले. त्यावर ते एकदम उसळून येऊन म्हणाले, ‘गोमांस खाल्याशिवाय ज्यांचे भागत नाही त्यांनी सरळ पाकिस्तानात निघून जावे, कारण गाय हा आमच्या दृष्टीने एक अत्यंत पवित्र प्राणी आहे’. त्यावेळी तिथे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसीसुद्धा हजर होते. ते मला म्हणाले, नक्वींना विचारा की, ज्या राज्यात आज भाजपाची सत्ता आहे त्या गोव्यातील ख्रिश्चनांनाही ते पाकिस्तानात जाण्याचाच सल्ला देणार आहेत का? मी नक्वींच्या केवळ इतकेच लक्षात आणून दिले की देशाच्या ईशान्येकडील प्रांतात गोमांस हेच तेथील लोकांचे खाद्य आहे. पण त्यावर ते काही बोलले नाहीत. बख्त यांच्याप्रमाणेच नक्वीदेखील गेली काही वर्ष पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा सिद्ध करून दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या पक्षामध्ये मुसलमान तसा एकाकीच असतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर नक्वी, शहानवाज हुसेन आणि आरीफ बेग असे तिघेच निवडून गेले. नरेंद्र मोदी तेरा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एकाही मुस्लिमाला विधानसभेचे तिकीट दिले नव्हते.
अर्थात हा प्रश्न केवळ भाजपापुरताच नाही. सोळाव्या लोकसभेमध्ये आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजे अवघे २२ मुस्लीम खासदार होते. सर्वांधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशातून एकही मुस्लिम खासदार निवडून गेला नाही तर मुस्लिमांची दाट वस्ती असलेल्या बिहारने केवळ चार मुस्लिमांना लोकसभेत पाठविले. याचा अर्थ मुस्लिमांमधील निवडून येण्याची क्षमता या हिंदी भाषिक प्रांतांमधूनही घसरणीला लागल्याचे आढळून येते.
या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्यासारख्या काहींचा उदय झाल्याचे दिसून येते. ओवेसी यांच्या पक्षाचा जन्म हैदराबाद या मुस्लिम बहुल शहरामध्ये झालेला असला तरी आता त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रापासून, उत्तरप्रदेशापर्यंत आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. मुस्लिमांच्या मनातील भीती आणि भविष्याविषयीची चिंता या जोरावर ओवेसी राजकारण करीत असून बॅरिस्टरची पदवी घेऊन आलेल्या ओवेसींना अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली आहे. पण त्यांच्या राजकारणाचा आधार धार्मिकच आहे.
एमआयएमच्या उदयाला खरे तर देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षच कारणीभूत आहेत. या सर्व पक्षांनी मुस्लीम समुदायाकडे मतपेटी म्हणूनच बघितले, पण त्यांच्या विकासासाठी काहीही केले नाही. हा समाज अन्य समाजाच्या तुलनेत किती उपेक्षीत आणि दुर्लक्षीत राहिला आहे, याचे सत्यदर्शन सच्चर समितीच्या अहवालाने याआधीच घडविले आहे. अलीकडेच अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता, त्या विद्यापीठातील एक विद्यार्थी मला म्हणाला की, मुझफ्फरनगर दंगलीमध्ये ज्या समाजवादी पार्टीने आमच्या समाजाचे रक्षण केले नाही, त्या पार्टीला किंवा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात सत्तेत असताना ज्या कॉँग्रेसने मुस्लीम युवकांवर दहशतवादाचे खोटे आरोप ठेऊन त्यांना डांबून ठेवले, त्या कॉँग्रेसला आम्ही का मते द्यावीत. त्या युवकाचे हे उद्गार चिंता निर्माण करणारे आणि ओवेसीसारख्यांना बळ देणारे आहेत.
अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी तीसेक मुस्लीम धर्मगुरु आणि समाजनेते यांची भेट घेऊन फोटो काढले. एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात कॉम्पुटर घेतलेला मुस्लीम युवक मला पाहायचा आहे, असे उद्गारही त्यांनी त्यावेळी काढले. पण असे उद्गार आणि फोटो सेशन यातून मुस्लीम समाज व अन्य समाज यातील दरी थोडीच भरून निघणार आहे?
२००२ च्या गुजरात दंगलीचे ओरखडे आजही मुस्लीम समाजाच्या मनावर कायम आहेत. या समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी मोदींनी ज्या नेत्यांची निवड केली, ते केवळ सत्तेभोवती गोंडा घोळणारे आहेत. संघ परिवाराकडून अधूनमधून जी वक्तव्ये केली जातात त्यामुळे त्या समाजाच्या मनातील संशयाला बळकटीच मिळते आहे. देशाची राज्यघटना हाच माझा धर्म आहे असे मोदी भले कितीही सांगोत, पण सामाजिक सद्भाव आणि एकोपा यांना सतत छेद देणारी वक्तव्ये करणाऱ्या त्यांच्या पक्षातील आणि संघातील लोकाना ते अद्याप आवर घालू शकलेले नाहीत. गोमांस भक्षण करणाऱ्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देणारे नक्वी लव्ह जिहाद सारख्या प्रकारावर तुटून पडून संबंधिताना भारत सोडून जाण्याचा सल्ला का देत नाहीत?
ताक: भाजपाची सत्ता असलेल्या हरियाणातील वल्लभपूर येथे झालेल्या जातीय दंग्यामुळे अनेक मुस्लिमांना आपले घरदार सोडून निघून जावे लागले. वल्लभपूर राजधानी दिल्लीपासून अवघ्या ४० किलोमीटरवर आहे. मोदी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या लोकांची भेट घेतली असती तर ती कदाचित मुस्लीम धर्मगुरुंसोबतच्या फोटोसेशनपेक्षा अधिक उपयोगी आणि परिणामकारक ठरू शकली असतीे.