गरज आहे वर्षभर रमजानच्या भावनेची!
By Admin | Updated: July 19, 2015 22:51 IST2015-07-19T22:51:44+5:302015-07-19T22:51:44+5:30
आपण सर्व उत्सवांची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो. दिवाळी असो, ईद असो, होळी असो अथवा नाताळ आपण दैनंदिन जीवनातील ताण-तणाव आणि चिंता विसरून उत्सवी

गरज आहे वर्षभर रमजानच्या भावनेची!
विजय दर्डा (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
आपण सर्व उत्सवांची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो. दिवाळी असो, ईद असो, होळी असो अथवा नाताळ आपण दैनंदिन जीवनातील ताण-तणाव आणि चिंता विसरून उत्सवी वातावरणात रंगून जाऊ इच्छितो. प्रत्येक उत्सवाला एक परंपरा व आख्यायिका असते व इतर काहीही असले तरी आपण त्या क्षणाचा आनंद घेत असतो. अर्थात प्रत्येक सणाशी निगडित अशा काही धार्मिक परंपरा व संकेत असतात व आपणही आपापल्या धार्मिक श्रद्धांचे पालन करतो पण जगभरातील माणसांची हे सण साजरे करण्यातील विचार एकच असतो. धर्मानुसार आराध्य बदलत असेल पण माणूस म्हणून प्रत्येकाची भावना आणि कृती एकच असते -प्रार्थनेची, इबादतची. श्रद्धेचे मस्तक झुकवून कृपाशीर्वाद-साजदा-घेतला जातो.
उत्सवांप्रमाणेच धर्म हाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खरे तर आपण धर्मासाठीच जगतो व प्राण जातानाही धर्माचेच स्मरण करतो. तात्त्विकदृष्ट्या सर्व धर्म आपल्याला एकच शिकवण देतात-सर्व विश्वाचा नियंता असा एकच परमेश्वर आहे व आराधनाचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच असते. परंतु पुस्तकी तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष आचरण यात खूप अंतर असते हेही आपण जाणतो. व्यक्तिगत पातळीवर याचे पालन होत असले तरी समूह किंवा समाज म्हणून माणूस धर्माच्या नावाने भरकटलेला नेहमीच पाहायला मिळतो. धार्मिक भावना चिथावून मानवतेवर आपत्ती ठरेल, अशा अनेक घटना आपल्याला इतिहासात सापडतात. धर्माच्या नावाने एवढा हिंसाचार, अंधाधुंदी व वैर पसरविले जाते की प्रत्येक धर्म इबादतच्या ज्या मूलभूत गोष्टीची शिकवण देतो ती हीच का, असा प्रश्न पडावा. या बाबतीत कोणत्याही एका धर्माकडे बोट दाखविण्याचे किंवा अमुक धर्म दुसऱ्याहून चांगला आहे, असे म्हणण्याचे काही कारण नाही. इस्लामचा रमजान हा महिना केवळ श्रद्धावान पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत श्रद्धेने उपवास ठेवतात म्हणूनच पवित्र नाही. हा महिना संयमी वृत्ती अंगी बाणविण्याचा आहे व याच महिन्याच्या समाप्तीस मानवाने जीवन कसे जगावे याचे दैवी दंडक घालून देणारे कुरआन प्रकट झाले. हे सर्व शेकडो वर्षांपूर्वी घडले असले तरी त्याचे पावित्र्य आजही टिकून आहे. तसे नसते तर विजोड वाटाव्यात अशा दोन घटना या महिन्यात घडल्याच नसत्या. यातील एक घटना म्हणजे इराण व प्रमुख पाश्चात्त्य देशांमध्ये झालेला अण्वस्त्रांविषयीची समझोता. अण्वस्त्र विकासाकडे अग्रेसर राहिल्याने लादलेल्या निर्बंधांमुळे एकाकी पडलेले इराण यामुळे पुन्हा एकदा जगाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकणार आहे. दुसरी घटना आहे रशियात उफा येथे नरेंद्र मोदी व नवाज शरीफ या दोन पंतप्रधानांची झालेली भेट. या भेटीने भारत व पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील अजिबात न बोलाचालीचा १४ महिन्यांचा कालखंड संपला. या दोन्ही घटनांवर संशयाचे ढग आहेत व दोन्ही बाजूंनी बोलणारे टीकाकारही आहेत. ते राहू द्या, पण या दोन्ही घटना शांतता आणि क्षमाशीलतेचा पुरस्कार करणाऱ्या आहेत व पवित्र रमजान महिन्याचे हेच तर सार आहे. हीच भावना मनाचा ठाव घेते आणि प्रश्न पडतो : रमजान वर्षभर का असू नये? केवळ एक महिनाच नव्हे तर संपूर्ण वर्षभर संयमी राहून सर्व दुर्गुणांवर नियंत्रण ठेवता आले तर ते कोणाला नको आहे? तसे नाही झाले तर पर्याय आहे वेदनेचा, मृत्यूचा, विनाशाचा आणि क्लेषाचा.
असेच सुरू राहिले तर धर्म आणि या उत्सवांची व्यर्थता जाणवू लागेल आणि आपल्याला असा प्रतिप्रश्न पडेल : यातून शाश्वत शांतता मिळणार नसेल व कोण्या इस्लामिक स्टेटकडून केला जाणारा नरसंहार, त्याला बॉम्बस्फोटांनी दिली जाणारी उत्तरे आणि या सर्वातून सदैव युद्धाला तयार असल्यासारखी स्थिती कायम राहणार असेल तर मुळात धर्म आणि उत्सव हवेत तरी कशाला? महिनाभरासाठी या सर्वाला विराम देऊन पुन्हा निरर्थक रक्तपातच करायचा असेल तर मुळात ठरावीक महिन्याचा आणि उत्सवांचा देखावा करायचा तरी कशाला? पण तसे होणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दाखविलेला आशेचा किरण व्यर्थ जाणार नाही. त्यातून नक्कीच शांततेची पहाट होईल. मोदी-शरीफ भेटीलाही तेच लागू आहे. भारत-पाकिस्तान यांच्या संबंधांतील येरे माझ्या मागल्याचे चित्र फार काळ चालू शकणार नाही. हे सर्व संघर्ष अनादिकाळ सुरु राहू शकणार नाहीत. संधी मिळताच परस्परांचे गळे आवळण्याचे सोडून आपण सामान्य शेजाऱ्यांसारखे कधी नांदू लागणार? हे प्रश्न अगतिकतेतून उपस्थित झालेले नाहीत, तर ही भूतकाळात अवलंबिलेल्या मार्गांची व्यर्थता लक्षात घेऊन वास्तव डोळ्यापुढे ठेवून वागण्यासाठी दिलेली हाक आहे.
व्यक्तिगत आयुष्यातील धार्मिकता आणि श्रद्धा विस्तारित होऊन ती देशांच्या आणि समाजांच्या सामूहिक वर्तनात यावी लागेल. राजकारण आणि भौगोलिक सीमांमध्ये अडकून न पडता केवळ व्यापक मानवी कल्याण डोळ्यापुढे ठेवूनच सामुदायिक इच्छाशक्ती वापरावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अठरापगड भेद असले तरी आपल्याला माणूस म्हणून जगणे व जगू देणे शिकावे लागेल. मतभेद हिंसेने कधीच दूर होऊ शकत नाहीत हे जाणून घेण्याची प्रगल्भता मानवी समाजास दाखवावी लागेल. राजनैतिक मुत्सद्देगिरी म्हणजे हाती शस्त्र न घेता केलेले युद्ध असे म्हटले जाते. देशांतरांतील व्यवहार याच पद्धतीने व्हायला हवेत. बाकी सर्व व्यर्थ आहे. म्हणूनच आणि याच भावनेतून वर्षभर रमजान असावा असे म्हणावेसे वाटते. देशाच्या पातळीवर दिवसभर उपवास ठेवण्याची गरज नाही. त्याऐवजी अधिक कठोर संयम पाळावा लागेल आणि तो म्हणजे हिंसाचाराच्या त्यागाचा व तंटेबखेडे सोडविण्यासाठी शस्त्र न उचलण्याचा. आपल्याला जिहाद नक्कीच छेडावा लागेल, पण तो असेल गरिबीविरुद्ध, उपासमारीविरुद्ध, रोगराईविरुद्ध आणि अत्याचाराविरुद्ध. या युद्धामध्ये जेता आणि पराभूत असा फरक केला जाऊ शकत नाही. अमेरिका व अल-कायदा यांच्यातील युद्धात कोणा एकाची जीत झाली असे म्हणता येईल का? किंवा काश्मीरवरून भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्षात कोणाची सरशी झाली असे म्हणायचे? यात कोणीच जेता नाही. दोन्ही बाजूला पराभूतच आहेत. सर्वात मोठे पराभूत ज्यांच्या नावाने हे संघर्ष होतात ते लोक आहेत.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. लोढा समितीने आयपीएल घोटाळ्यातील दोषींना दंडित केले आहे. पण क्रिकेट नियामक मंडळाच्या धुरिणांच्या वर्तनावरून त्यांना अजूनही सुधारावेसे वाटत नाही, असे दिसते. अजूनही त्यांचा संशयास्पद खेळ सुरू ठेवण्याचाच पवित्रा आहे. या खेळाची निकोपता जपण्याहून त्यांना मंडळास वाचविणे महत्त्वाचे वाटत आहे. पण क्रिकेट हे क्रिकेटसारखे राहिले तरच आपल्याला भवितव्य आहे, हे ते विसरतात. याच्याशी तडजोड केल्याने नुकसान क्रिकेटचेच होणार आहे.