शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समजून घेणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 02:45 IST

आधुनिक जगात, माहितीचा स्फोट झालेला असताना, तंत्रज्ञानाची अनेकानेक साधने उपलब्ध झालेली असतानादेखील फक्त निरक्षर, ग्रामीण, कष्टकरी जनताच नाही, तर शिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभ्रू माणसेदेखील पितृपक्षाच्या नावाने चालविल्या जाणा-या षड्यंत्राला बळी पडतात याची खंत वाटते.

- अविनाश पाटीलआधुनिक जगात, माहितीचा स्फोट झालेला असताना, तंत्रज्ञानाची अनेकानेक साधने उपलब्ध झालेली असतानादेखील फक्त निरक्षर, ग्रामीण, कष्टकरी जनताच नाही, तर शिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभ्रू माणसेदेखील पितृपक्षाच्या नावाने चालविल्या जाणा-या षड्यंत्राला बळी पडतात याची खंत वाटते. याला गतानुगतिक मानसिकता आणि अंधश्रद्ध संस्कार व रूढी-प्रथा-परंपरांचा पगडा जबाबदार असल्याचे दिसते.भूत, भविष्य, वर्तमानाच्या जीवन काळामध्ये केलेल्या कर्माचा हिशोब मांडून, पाप-पूण्याच्या तराजूत तोलून शेवटी तुमचा स्वर्ग वा नरकाचा प्रवास ठरणार आहे. त्यावरूनच तुम्हाला मुक्ती मिळणार की जन्मोजन्मीच्या फे-यांत फिरत राहावे लागणार हे ठरणार आहे. त्यासाठी पूर्वजन्म, पुनर्जन्म, पाप, पूण्य, स्वर्ग, नरक, आत्मा, मुक्ती अशा विविध कपोलकल्पित संकल्पनांच्या जंजाळात माणसाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली मानव समाजातील काही हितसंबंधी मंडळींनी, समूहांनी अनेक पिढ्यांपासून चालविला आहे. त्यासाठी इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्य प्राण्याला असणारे मृत्यूचे भय, जगण्याच्या किमान गरजांच्या पूर्ततेसाठी करावी लागणारी धडपड व त्यातील अनिश्चितता यांच्या प्रेरणा पूरक ठरलेल्या आहेत. अशा परिस्थितीचा उपयोग करून माणसांच्या अगतिकतेचा, दुबळेपणाचा, अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची लुबाडणूक करण्याचा ‘गोरख धंदा’ समाजातील पुरोहितशाही करीत आली आहे. त्यासाठी आवश्यक हुशारी, चलाखी, धूर्तपणा दाखवून प्रसंगी खोटेनाटे दाखले देऊन लोकांची दिशाभूल व फसवणूक केली जात आहे. ‘पितृपक्ष पंधरवडा’ हादेखील त्यातलाच प्रकार आहे.

मानवी संबंधांच्या सहृदयतेची कुचेष्टा:-पितृपक्ष पंधरवडा म्हणजे आपल्या मृत आई-वडील व वडीलधाºयांच्या स्मृती जागविण्याचा काळ हे समजण्यासारखे आहे. परंतु, त्यासाठी कावळ्याच्या रूपात त्या मृतांचा आत्मा येतो आणित्यांच्या आवडत्या पदार्थांचे ताट वाढलेले असते त्याला स्पर्श करतो, त्याशिवाय आपण कोणीच जीवित लहान-थोरांनी अन्नाचा घास घ्यायचा नसतो, नाही तर तो मृतात्म्यांचा अपमान समजला जातो. अशा प्रकारच्या समजुती बाळगणे कालविसंगत आणि वेडेपणाचे नाही का? हा अंधश्रद्धेतील हितसंबंधांचा बाजार आहे. हे आपण कधी समजून घेणार आहोत?मानवी संबंधांमधील सहजीवन व त्यासाठी आवश्यक प्रेम, बांधिलकी जीवंतपणीच बाळगण्याचे महत्त्व मानले पाहिजे. कारण माणूस मेला आणि त्याची इच्छापूर्ती झालेली नसेल तर त्याचे भूत होते. इथपासून त्याचा आत्मा शरीरापासून वेगळा होतो, त्याच्या अतृप्त कामनांच्या पूर्ततेसाठी तो भटकत राहतो, त्याच्या पूर्वजन्माच्या पाप-पुण्याच्या जमा-खर्चावर त्याला मुक्ती मिळणार की सोळा सहस्र योनीतून प्रवास करावा लागणार हे ठरते. या सर्व कल्पना मानवी इतिहासाच्या वाटचालीत माणसानेच आपले अस्तित्व मृत्यूनंतरही संपत नाही या अपेक्षेतून लढविलेला ‘जंजाळ’ आहे. त्याला कुठल्याही वास्तविकतेचे अधिष्ठान नाही आणि विवेकाच्या कसोटीवर तपासले असता त्याला काहीही कार्यकारणभाव सिद्ध होत नाही.कारण माणूस मरतो, म्हणजे त्याचा मृत्यू होतो त्या वेळेस त्याच्या मेंदूचे कार्य ज्याच्या मार्फतच माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे चलनवलन व नियंत्रण होत असते, ते कार्यच थांबते. मेंदूतल्या पेशींचे विघटन व्हायला सुरुवात होते. माणूस मेल्यावर त्याला बहुश: जाळतात वा पुरतात, त्यानंतर राख होते वा माती होते. त्यामुळे वैज्ञानिकतेच्या कसोटीवर मानवाच्या मृत्यूनंतरचे अस्तित्व सिद्धच होऊ शकलेले नाही. परंतु तरीही त्याचे विविध दावे व त्याबद्दलची मतमतांतरे, तर्कवितर्कप्रचलित आहेत. याच सर्व बाबींचा आधार पितृपक्ष पंधरवड्यासारख्या कालबाह्य संस्कारीत रूढीमधे मानला गेलेला आहे. पितृपक्षात कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात केली जात नाही, कारण हा पंधरवडा अशुभ आहे. परंतु, याच पंधरवड्यात आपल्या पितरांच्या आत्म्यांना कावळ्याच्या रूपात बोलावून नैवेद्य रूपात पंचपक्वान्नाचे ताट ठेवले जाते हेदेखील विसंगत आहे. जो कावळा हा पक्षी कायम घाणीतून अन्न शोधतो व खातो, त्याला मांसाहार आवडतो, अशा पक्षाच्या रूपात आपल्या प्रिय व्यक्तीचा आत्मा येतो हे मानणेदेखील मानवी संबंधाच्या भावभावनांचा अपमान नाही का?हिंदू शास्त्राप्रमाणे जोपर्यंत श्राद्ध, पिंडदान होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ती मिळत नाही वा स्वर्गप्राप्ती होत नाही असा समज आहे. प्रत्यक्षात पितृपक्ष म्हणजे सूर्याचा कन्या राशीत प्रवेश होतो. त्या दिवसापासून ते सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश होतो तोपर्यंतचा कालावधी म्हणजे १५ दिवसांचा काळ असतो. या विश्वातील खगोलीय घडामोडींचा थेट मानवी जीवनावर परिणाम आणि कपोलकल्पित आत्मा, जन्म-पुनर्जन्म, स्वर्ग-नरक आदी भ्रामक कल्पनांशी काहीही संबंध नाही हे अनेकदा संत-समाजसुधारकांसह खगोल अभ्यासक व शास्त्रांनी जाहीरपणे सांगितले आहे. असे असतानाही आजही आधुनिक जगात, माहितीचा स्फोट झालेला असताना, तंत्रज्ञानाची अनेकानेक साधने उपलब्ध झालेली असतानादेखील फक्त निरक्षर, ग्रामीण, कष्टकरी जनताच नाही, तर शिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभ्रू माणसेदेखील पितृपक्षाच्या नावाने चालविल्या जाणाºया षड्यंत्राला बळी पडतात याची खंत वाटते. याला जबाबदार असणारी गतानुगतिक मानसिकता आणि अंधश्रद्ध संस्कार व रूढी-प्रथा-परंपरांचा पगडा आहे. परंतु, त्याला दूर करण्यासाठी आवश्यक असणारी शिक्षणातून वर्तन बदलाची भूमिका कमी पडली आहे. त्यामुळेच स्वतंत्रपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समजून घेणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारणे आवश्यक ठरते. त्यासाठी सुरू असलेल्या विवेकी समाज निर्मितीच्या सुसंघटित अशा कार्यात सहभागी होऊ या! विवेकाचा आवाज बुलंद करू या!

(लेखक हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत)