थरूर यांच्या युक्तिवादाबाबत सजगता हवी

By Admin | Updated: July 28, 2015 04:11 IST2015-07-28T04:11:44+5:302015-07-28T04:11:44+5:30

क्लाइव जर प्लासीची लढाई हरला असता तर इथे फ्रेंच-मुस्लिम राज्यकर्ते असते आणि लाल किल्ल्याच्या तटावरून भाषण देणारे नेहरू किंवा मोदी दिसले नसते. वाद-विवादाची स्पर्धा सगळ्यांंनाच

Need to be aware of Tharoor's argument | थरूर यांच्या युक्तिवादाबाबत सजगता हवी

थरूर यांच्या युक्तिवादाबाबत सजगता हवी

- हरिष गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

क्लाइव जर प्लासीची लढाई हरला असता तर इथे फ्रेंच-मुस्लिम राज्यकर्ते असते आणि लाल किल्ल्याच्या तटावरून भाषण देणारे नेहरू किंवा मोदी दिसले नसते. वाद-विवादाची स्पर्धा सगळ्यांंनाच माहीत आहे; पण ही स्पर्धा विचारांच्या आदान-प्रदानाचे माध्यमसुद्धा होऊ शकते. प्राचीन बौद्ध भिक्खू आणि रोमन लोक याच माध्यमातून विचारमंथन करीत होते. आधीचे वादविवादप्रिय भारतीय अलीकडे अधिकच आक्रमक झाले आहेत, याचाच परिपाक म्हणावा की काय? सध्या संसदेत वाद-विवाद चालू असताना अध्यक्षांच्या समोरच्या हौदात धाऊन जाण्याची संधी शोधली जाते. कॉँग्रेस खासदार शशी थरूर यांचे आॅक्सफर्ड युनियन सोसायटी येथील वाद-विवाद स्पर्धेतील खणखणीत भाषण सध्या यूट्यूबवर अगदी वाऱ्यासारखे पसरले आहे. या वाद-विवाद स्पर्धेत आपली मते अगदी चपखल मांडणे आणि इतरांच्या मुद्द्यांचे खंडन करणे तसे अवघडच काम होते. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी थरूर यांचे कौतुक करताना असे म्हटले आहे की, ‘आॅक्सफर्डची वाद-विवाद स्पर्धा तशी फार महत्त्वाची होती; पण आपले सुदैव असे की तेथे शशीजी होते.’
आॅक्सफर्ड येथील वाद-विवादाचे महत्त्व थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण शशी थरूर यांच्या तिथल्या म्हणण्याप्रमाणे जर इंग्रजांनी भारताचा ताबा घेतला नसता तर भारत आजपेक्षा अधिक चांगला असता हे म्हणणे खरे वाटते का? मला या बाबतीत शंका आहे की भारतातल्या राजकारणी लोकांनी या विषयावर विचार करण्याला किती महत्त्व दिले असेल, निश्चितच त्यांनी इतिहासकारांनी मांडलेली मते आणि जर-तरच्या स्थितीवर विचार करणे म्हणजे वेळ वाया घालवणे अशी पक्की धारणा करून घेतली असेल. थरूर यांनी मांडलेल्या तर्कातला दुर्बलपणा जाणून घेण्यासाठी कुणालाही अगदी दिल्ली विद्यापीठातला इतिहासाचा विद्यार्थी असण्याची गरज नाही, ढोबळ विचार असणाऱ्यालाही ती कळू शकते. थरूर यांचा हजरजबाबीपणा जबरदस्त आहे आणि ते उत्तर देण्याची योग्य वेळसुद्धा निष्णातपणे साधतात. इतिहासात जे काही असते ते सगळे भूतकाळाशी संबंधित असते त्यात काहीच अघटित नसते. जसे की एकदा वाजवलेल्या घंटीचा आवाज तुम्ही रोखू शकत नाही. ज्या गोष्टी आज भयावह वाटत आहेत त्या भूतकाळात आपल्या देशात सामान्य होत्या. उदाहरणच द्यायचे ठरले तर नरबळी आणि सती जाणे. नुकसानभरपाईची मागणी तर नैतिक न्यायाच्या बळावर करण्यात आली आहे. १७५७ सालच्या प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौला मारला गेला नसता आणि क्लाइव जिंकला नसता तर भारत आज इतका राहण्यासाठी उत्तम राहिला असता? दुसरा प्रश्न असासुद्धा उभा राहतो की क्लाइव जिंकला नसता तर भारत नावाचा देश जगात राहिला असता का? हे दोन्ही प्रश्न प्रतीसत्य उभे करतात.
बंगाल, मद्रास आणि मुंबई इलाख्याची निर्मिती होण्याच्या आधी इथल्या सामान्य जनतेची अवस्था विचारवंत लॉक याच्या म्हणण्याप्रमाणे ओंगळवाणी आणि असंस्कृत होती, जणू काय इथे कुणी राज्यकर्ताच नाही. मुघलांच्या शासन काळात राज्यकर्तेच दरबारी कारस्थानात गुरफटले होते शिवाय पाश्चात्यांकडून आक्रमणे चालूच होती. इंग्रजांच्या येण्याअगोदर इथे अंदाधुंदीच माजलेली होती. दिल्लीच्या गादीवर कोण बसलंय याकडे दुर्लक्ष करत स्थानिक कारभारी जनतेला नागवत होते. उत्तर भारतातला महामार्ग जो शेरशाह सुरीने बनवला होता तो अतिक्र मणामुळे आणि डागडुजीअभावी नष्ट झाला होता. त्या महामार्गावर उरले होते फक्त डाकू, वाटमारे आणि ठग. लोक आपल्या आयुष्यभाराची कमाई दरोडेखोरांच्या भीतीने गुप्त ठिकाणी लपवत होते.
भारतातले हे भयावह चित्र होते इंग्रज येण्याच्या आधीचे आणि थरूर यांच्यासारखे राजकारणी स्वत:च्या देशाच्या इतिहासाची पुरेशी माहिती न घेता त्याविषयी मोठ्या प्रौढीने बोलत असतात. थरूर त्यांच्या चुकलेल्या युक्तिवादात आनंद शोधताय जेव्हा ते असे म्हणतात की, जागतिक व्यापारात भारताचा वाटा २४ टक्के होता जेव्हा इंग्रजांनी त्याचा ताबा घेतला होता, पण जेव्हा इंग्रजांनी भारत सोडला तेव्हा तो होता फक्त ४ टक्के. उपलब्ध असलेली आधुनिक पूर्व आर्थिक माहिती संशयास्पद आहे, पण जागतिक व्यापारातल्या एवढ्या मोठ्या वाट्याची ही खोटी बढाईच वाटते. कारण त्यावेळी फक्त कृषी उत्पादनांचा व्यापार अस्तित्वात होता. हे उत्पादन सुद्धा मानवी श्रमांनी आणि बैलांच्या साहाय्याने निघत होते. यात काहीच तथ्य नाही की, १८ व्या शतकात तुर्कस्थानच्या पूर्वेकडच्या इस्लामी सत्ता अध:पतनाच्या टप्प्यावर होत्या आणि सिराजउद्दौलाचा मृत्यू हा इंग्रजांनी इस्लामी सत्तांना दिलेला शेवटचा धक्का होता. असे जर घडले नसते किंवा टिपू सुलतान १८०१ साली निसटू शकला असता तर फ्रेंच लोकांनी भारतात वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच असता. शिवाय वाटर्लुच्या लढाईत नेपोलियनच्या झालेल्या पराभवाचाही वचपा त्यांनी काढला असता. पण ५० वर्षांचा कालावधी इतिहासात मोठाच असतो. इंग्रज जर १९ व्या शतकात परत आलेच होते तर त्यांनी अखंड भारतावर राज्य करण्याची उठाठेव का केली असती? त्याऐवजी त्यांनी समुद्रतटावर किल्ल्यांची रांग उभी करून लोकांना गुलामासारखे वागवले असते आणि इथली जमीन पेरणीसाठी वापरली असती. असा कुणाचाच युक्तिवाद नाही की इंग्रज येथे कृपाळू हुकुमशहा किंवा प्रबोधन करणारे राज्यकर्ते म्हणून आले होते. शशी थरूर यांचे म्हणणे योग्यच आहे की भारतामुळे इंग्लंडच्या नव्या पिढीला रोजगार मिळाला होता अन्यथा त्यांना कुठेच रोजगार भेटला नसता. त्यावेळी इंग्लंडमधील सगळ्यांना रोजगार देण्याची क्षमता क्षीण झाली होती. पण यातून हा अर्थ निघत नाही की दोनशे वर्षासाठी युरोपियन लोकांना भारताबाहेर ठेवणे चांगली कल्पना होती. या वाद-विवादात थरूर यांचा त्वेषाने मांडला गेलेला युक्तिवाद तर्कसंगत ठरवला गेला असला तरीसुद्धा राजकीय नेत्यांनी कशाला योग्य म्हणावे या बाबतीत सजग असावे, विशेषत: बिगर राजकीय क्षेत्रात ही काळजी घेतली गेली पाहिजे.
मोदींनी शशी थरूर यांची प्रशंसा म्हणजे कदाचित त्यांच्यातल्या मैत्रीला वाव देण्याचा प्रयत्न असावा. मोदींसाठी हा विषय त्यांच्या अस्तित्वाशी संबंधित असावा. प्लासीच्या लढाईत जर क्लाइव हरला असता तर इथे फ्रेंच-मुस्लिम राज्यकर्ते असते, इथे हिंदुत्व नसते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता आणि त्यांना लाल किल्ल्याच्या तटावरून भाषण देण्याची संधीसुद्धा लाभली नसती. त्याचमुळे कदाचित मोदी इंग्रजांचे आभारी असतील, शिवाय एका सहस्त्रकानंतर हिंदू राज्यकर्तेही झाले आहेत.

Web Title: Need to be aware of Tharoor's argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.