सतर्कता गरजेची!

By Admin | Updated: February 15, 2017 00:26 IST2017-02-15T00:26:24+5:302017-02-15T00:26:24+5:30

देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेला अलीकडे मात्र कुणाची तरी नजर लागली

Need alert! | सतर्कता गरजेची!

सतर्कता गरजेची!

देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेला अलीकडे मात्र कुणाची तरी नजर लागली आणि अपघातांची मालिकाच सुरू झाली. यातील काही अपघात तांत्रिक कारणांमुळे घडले, तर काही अपघातांमागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येते. वर्षभरापूर्वी कानपूर येथे झालेला भीषण रेल्वे अपघात हा घातपाताचा प्रकार होता, यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. या दुर्घटनेतील प्रमुख संशयित समशूल होडा हा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा कथित एजंट आहे. कानपूर रेल्वे अपघातामागे समशूलचा हात असल्याचे एका गुन्हेगाराची चौकशी करताना पुढे आल्यापासून तो तपास यंत्रणेच्या ‘रडार’वर होता. गत सोमवारी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर समशूलच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्या चौकशीतून सत्य काय ते समोर येईलच! गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातही रेल्वगाड्यांना घातपात करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून झाल्याचे समोर आले आहे. दिवा रेल्वे स्थानकानजीक रेल्वेमार्गावर मोठी लोखंडी सळई ठेवल्याचे लक्षात येताच, रेल्वे चालकाने सावधानतेने संभाव्य अपघात टाळला. अकोला जिल्ह्यातही रेल्वे मार्गावर मोठा दगड ठेवून अकोला-वाशिम इंटरसिटी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनांची शाई वाळते न वाळते, तोच शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेरवाडी ते ओढा दरम्यान रेल्वे रुळांवर १५ किलो वजनाचा सीमेंटचा दगड ठेवून हावडा-कुर्ला एक्स्प्र्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने ती घटनाही टळली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दगड ठेवण्यात आला होता, तेथून जवळच वीस फूट उंचीचा पूल होता. काही विपरीत घडले असते तर... या कल्पनेनेच अंगावर शहारे उभे राहतात. मुंबई, ठाणे, अकोला आणि नाशिक येथील या घटनांमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या घटना अत्यंत गंभीर असून, त्यामागील प्रवृत्तींचा शोध घेणे हे तपास यंत्रणांसमोर आव्हानच आहे. या घटनांमागे समाजकंटकांचा हात आहे, की केवळ काहीतरी करायचे म्हणून टवाळखोरांनी केलेली कृत्ये आहेत, हे तपासण्याची जबाबदारी तपास यंत्रणांची आहेच; पण सोबतच रेल्वेमार्गांलगत वास्तव्य असलेल्या नागरिकांनी, रेल्वेमार्गांलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती संशयास्पद स्थितीत रेल्वे मार्गालगत आढळल्यास, पोलिसांशी संपर्क साधून नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडायला हवे, तरच अशा प्रवृत्तींना पायबंद घालणे शक्य होईल.

Web Title: Need alert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.