नक्षल्यांनो आता पुरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:24 IST2017-08-01T23:40:30+5:302017-08-02T00:24:27+5:30
१९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून नक्षल चळवळ उदयास आली तेव्हा या देशातील उपेक्षित, वंचितांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता.

नक्षल्यांनो आता पुरे!
१९६७ साली पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीतून नक्षल चळवळ उदयास आली तेव्हा या देशातील उपेक्षित, वंचितांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. आपल्या हक्कांसाठी लढणारेही कुणी आहे, असे त्यांना वाटले होते. परंतु ही चळवळ केवळ हिंसाचार आणि दहशतवाद माजविण्यापुरतीच मर्यादित राहिली. ज्यांना आपण मित्र समजतो ते नक्षलवादीच आपल्या जीवावर उठतील याचा विचारही त्यांनी त्यावेळी केला नसावा. त्यामुळेच गेली अनेक वर्षे नक्षल्यांचा हिंसाचार ते निमूटपणे सहन करीत राहिले. परंतु एकीकडे स्वत:ला उपेक्षितांचे कैवारी म्हणायचे आणि दुसरीकडे गावातील निष्पाप लोकांच्या कत्तली करायच्या, त्यांच्या मुलामुलींना बंदुकीच्या धाकावर नक्षली चळवळीत सामील करुन घ्यायचे, विरोध करणाºयांना जगणे मुष्किल करायचे, त्यांची घरेदारे, पिके जाळायची हे नक्षल्यांचे दुटप्पी धोरण आता नक्षलग्रस्त भागातील लोकांना चांगल्याने समजले आहे. म्हणूनच या नक्षलवाद्यांविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकले असून देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने लोकभावनांमधील हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. नक्षल्यांकडून पाळल्या जाणाºया शहीद सप्ताहात गडचिरोली जिल्ह्यात या विरोधाचे प्रतिबिंब बघायला मिळाले. प्रथमच या सप्ताहात नक्षल्यांना लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो आहे. जीवाची पर्वा न करता लोक रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांनी नक्षल्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे तर बंद केलेच शिवाय त्यांनी लावलेले बॅनर्सही जाळले. पोलिसांनी नक्षल्यांची दोन स्मारके उद्ध्वस्त केल्यानंतर एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नक्षल स्मारक तोडून नक्षल्यांबद्दलची चीड व्यक्त केली तर भामरागड तालुक्याच्या १३ गावांतील नागरिकांनी त्यांची शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केलीत. या क्रांतिकारक बदलात त्या भागात कार्यरत काही सामाजिक संघटनांचाही मोलाचा वाटा आहे. नक्षलविरोधातील हे क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल. देशातील १० राज्यांमधील १८० जिल्हे नक्षली हिंसाचाराचा सामना करीत आहेत. ही समस्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांशी निगडित असल्याने केवळ बळाचा वापर करुन सुटणारी नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसोबतच दुर्गम आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासही तेवढाच महत्त्त्वाचा आहे. नक्षलवादी संघटना या केवळ समाजाच्या पोषणावरच जिवंत असतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचा हवे. हे पोषण बंद झाले की त्यांचा बीमोड करणेही मग कठीण नाही. तळपत्या लोखंडावर हातोडा मारणे केव्हाही चांगले. लोकजागर आणि जनआंदोलनातून ते शक्य आहे.