पावले चालती राष्ट्रवादीची ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:01 AM2018-05-22T00:01:27+5:302018-05-22T00:01:27+5:30

ट्रम्प तात्यांच्या प्रचारात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे प्रस्थ बारामतीकर काका उतरले अन् ते जिंकले.

Nationalist Congress Party | पावले चालती राष्ट्रवादीची ‘वाट’

पावले चालती राष्ट्रवादीची ‘वाट’

Next

- यदु जोशी

ट्रम्प तात्यांच्या प्रचारात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे प्रस्थ बारामतीकर काका उतरले अन् ते जिंकले. परवा कर्नाटकातील नाट्यात काकांनी म्हणे अशी काही भूमिका वठवली की बहुमत सिद्ध करण्याआधीच येडियुरप्पांनी शस्त्रे खाली टाकत राजीनामा दिला. त्यानंतर काही क्षणातच काका हे कुमारस्वामींशी खलबते करीत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. (तो काही वर्षांपूर्वीचा आणि वेगळ्या प्रसंगातील फोटो होता); पण तोवर काकांची कर‘नाटका’त निर्णायक भूमिका होती इथपर्यंत त्यांच्या भक्तांनी शिक्कामोर्तब करूनही टाकले. ट्रम्प असोत की कुमार सगळी प्यादी आहेत अन् ती सरकवण्यात काकांचाच हात असतो. राष्ट्रवादीचे अदृश्य हात फडणवीसांना खुणावतात. काकांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याचे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. राजकारणातील भल्याभल्यांनी आजवर काकांचा सल्ला घेतलाय, पण हे राज्य एकहाती राष्ट्रवादीच्या अन् माझ्या हातात द्या, हा काकांचा सल्ला महाराष्ट्रातील जनतेनं मात्र आतापर्यंत ऐकलेला नाही. वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी काकांचं ग्लॅमर काही कमी होत नाही. त्यांच्याविषयीचं गूढ वाढतच आहे. अरे! साठीला आलेल्या अजितदादांना काही संधी मिळणार आहे की नाही? काकांच्या प्रभावातून स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड करताना आशेचा एक किरण दिसला तर हे काय तो किरण ज्या भागातून येतोय त्यावरही सुप्रिया नावाचे ढग आलेत. आधीच काकांचा भार त्यात सुप्रियावार. सगळ्या पुतण्यांचे असे का होत जाते नंतर नंतर...काकांसारखे दिसणे, वागणे, बोलणे असतानाही पुतण्याला मातोश्रीवरून जावे लागते आणि नव्या ताज्या दमाचे इंजिन काही वर्षांतच नादुरुस्त होते. बीडचा पुतण्या मात्र भारी ठरतो. काकांच्या अकाली जाण्यानंतर ताईलाच त्रास देतो. अर्थात स्वत:चे कर्तृत्व सिद्धही करतो; पण आताशा राष्ट्रवादीमध्ये तोही दादा लॉबीकडून टार्गेट होतोय म्हणे. बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारानं ऐनवेळी माघार घेतल्याने पुतण्याची जी काही पंचाईत झाली ती ‘दादागिरी’शी पंगा घेतल्याने होती, असं सूत्रांनी सांगितलं. (राजकीय बातमीदारीत ‘सूत्रांनी सांगितलं’ या शब्दांच्या वापरावर बंदी घातली तर अर्ध्या राजकीय बातम्या बाद होतील.) धनुभाऊंचं वाढतं महत्त्व, प्रदेशाध्यक्षपदाची माळ जयंत पाटलांच्या गळ्यात पडण्यानं घड्याळ्याच्या काही काट्यांमध्ये अस्वस्थता आहे, असेही सूत्र सांगतात. दरम्यान, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले हभप बबनबुवा पाचपुते यांनी भाजपाचे मंत्री जनतेत जात नाहीत अन् प्रदेशाध्यक्षांचं पक्षाकडे लक्ष नाही, असं सांगत रडकथा सुरू केलीय.‘पाचपुतेंच्या मंत्री काळात आदिवासी विकास खात्यात घडलेले नाही नाही ते प्रकार अन् सध्याचे मंत्री विष्णू सावरा यांचा कारभार-एक तौलनिक अभ्यास’ या विषयावर मधुकरराव पिचडांनी पीएचडी करायला हरकत नाही. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असताना भाजपानं आपल्या मतदारांना सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करण्याची मुभा देत राष्ट्रवादीचा पर्याय उपलब्ध करून दिला. शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना पालघरमध्ये उमेदवारी दिली त्याची किंमत त्यांना विधान परिषद निवडणुकीत भाजपानं मोजायला लावली. उद्या समजा विधान परिषदेत शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही तर ती सरकारमधून बाहेर पडणार का?...तसे होण्याची शक्यता मात्र कमीच.

Web Title: Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.