शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अग्रलेख : नड्डांची निवड ही तर मोदींची इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:35 IST

नरेंद्र मोदी-शहा ही जोडी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा कायम ठेवून आहे. परिणामी, पक्षामध्ये त्यांना आव्हान देण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही. ज्यांनी टीकाटिप्पणी केली, त्यांचे महत्त्व कमी करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे अकरावे अध्यक्ष म्हणून हिमाचल प्रदेशातून आलेले जगत प्रकाश नड्डा यांची ‘ही तर श्रींची इच्छा’ याप्रमाणे निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात जे येईल, तेच भाजप या सत्ताधारी पक्षात होईल. नरेंद्र मोदी साडेपाच वर्षांपूर्वी पूर्ण बहुमतासह पंतप्रधान झाले तेव्हाच ही निर्णयक्षमता त्यांच्याकडे आपोआप चालत आली होती. त्यातूनच त्यांनी अमित शहा यांची निवड केली. अमित शहा हे उत्तम प्रशासक आणि संघटनकौशल्य असलेले गृहस्थ आहेत. शिवाय या दोघांमध्ये जी स्पष्टता आहे तेवढी आजवर भारतीय राजकारणात कोणा दोघा नेत्यांमध्ये नव्हती. गेल्या साडेपाच वर्षांत या दोघांमध्ये एकाही मुद्द्यावरून वाद, मतभेद किंवा मतभिन्नता जाणवली नाही.

केंद्रात सत्तेवर आल्यावर एकामागून एक राज्य जिंकत भाजपचा विस्तार अमित शहा यांनी केला आणि या विजयाचे नायक म्हणून नरेंद्र मोदी यांनाच श्रेय देत राहिले. सरकारचा कारभार फारसा प्रभावी नसला तरी मोदी-शहा ही जोडी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा कायम ठेवून आहे. परिणामी, पक्षामध्ये त्यांना आव्हान देण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही. ज्यांनी टीकाटिप्पणी केली, त्यांचे महत्त्व कमी करण्यात आले. जे अस्वस्थ होते ते गप्प राहिले. भाजपची सत्ता साडेपाच वर्षांपासून आहे. राष्ट्रवादाची झालर पांघरून ती वाटचाल करीत आहे. त्या मुद्द्यावर स्वार होऊनच ही राम-लक्ष्मणाची जोडी काम करीत आहे. जनतेच्या थेट प्रश्नांशी भिडणाऱ्या राज्याराज्यांतील सत्ताकेंद्रात मात्र भूकंप होऊ लागले आहेत. पहिल्या पाच वर्षांत अपेक्षांचे ओझे असणारच, हे गृहीत धरण्यात आले होते. इतका मोठा देश, त्याच्या अनेक समस्यांचा डोंगर पाहता, मोदी यांना अजूनही संधी द्यायला हवी, अशी मतदारांची मानसिकता होती. ती हिंदू सहिष्णुतेच्या मूल्यातूनच प्रवास करते, हे त्यांना मान्य होणारे नाही; पण तेच वास्तव आहे.

काँग्रेस असो किंवा भाजप असो, सत्ताधारी नेताच अधिक बलवान मानला जातो. यावर दोन्ही पक्षांतील विचार करण्याची पद्धत सारखीच आहे. याला अपवाद सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचा होता. त्यामुळेच १० वर्षे सलग सत्तेवर राहूनही काँग्रेस पक्षाला आपला असलेला विस्तार मजबूत करता आला नाही. जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्या कालखंडात पक्षाध्यक्ष नामधारीच असत. पंतप्रधानच अधिक लोकप्रिय नेता म्हणून मानाने राहत आणि पक्षाच्या शक्तिस्थळीही असत. भाजपची वाटचाल त्याच दिशेने सुरू झाली आहे. फरक एवढाच आहे की, राष्ट्रव्यापी लोकप्रिय नेत्याबरोबर एक सामर्थ्य उभा करणारा सहकारीही अमित शहा यांच्या रूपाने आहे. जगत प्रकाश नड्डा यांची निवड ही त्याच पातळीवर पाहता येईल. हिमाचल प्रदेशचे मंत्री किंवा केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचे नेतृत्व कधी प्रकाशातही आले नव्हते. अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा आधार घेत पक्षाचा विस्तार केला. त्यासाठी सर्व प्रकारचे बळ वापरले. अनेक तडजोडी करून भाजपचा लाभ कसा होईल, हेदेखील पाहिले. शिवाय दोघांची जोडी घट्ट असल्याने अमित शहा यांचा दरारा वाढतच गेला. जगत प्रकाश नड्डा या तिस-या शक्तीला असे करता येणार नाही.

मोदी-शहा यांच्या मर्जीनुसारच राजकारणाचे डावपेच ठरवावे लागणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांना बराच उशीर आहे. तोवर अनेक राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांनिमित्त राजकारण ढवळून निघणार आहे. त्यात नड्डा हे नामधारी असले तरी नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच अमित शहा यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठविता येतो की नाही, याची चाचपणी होऊन जाईल. श्रींच्या इच्छेनुसार नड्डा यांची कामगिरी होते की नाही, यावर अमित शहा यांचे लक्ष असणार आहे. म्हटले तर भाजपच्या या नेत्यांनी घेतलेले हे नवे वळण आहे. त्यासाठीच नड्डा यांना प्रथम कार्याध्यक्षपद देऊन चाचणी घेण्यात आली आहे. त्यांच्या कोणत्याही निर्णयाला आव्हान देण्यास कोणीही नाही. बिनविरोध निवड ही औपचारिकताच होती. आता श्रींच्या इच्छेप्रमाणे पक्षाचा विस्तार हा एकमेव कार्यक्रम नड्डा यांना राबवावा लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्ष