गूढ अखेर उलगडले?

By Admin | Updated: September 19, 2015 04:35 IST2015-09-19T04:35:52+5:302015-09-19T04:35:52+5:30

धर्मनिरपेक्ष विवेकवाद्यांचा प्रथमपासूनच जो संशय होता, तो खरा ठरताना दिसतो आहे का? येथे प्रश्नचिन्ह वापरण्याचे एकमात्र कारण म्हणजे पोलीस दल वा विशेष तपासी दल

Mysteries finally unravel? | गूढ अखेर उलगडले?

गूढ अखेर उलगडले?

धर्मनिरपेक्ष विवेकवाद्यांचा प्रथमपासूनच जो संशय होता, तो खरा ठरताना दिसतो आहे का? येथे प्रश्नचिन्ह वापरण्याचे एकमात्र कारण म्हणजे पोलीस दल वा विशेष तपासी दल अजूनही गोविंदराव पानसरे यांच्या निर्घृण हत्त्येमागील गूढ उकलल्याचे स्पष्टपणे सांगायला तयार नाहीत. डॉ.नरेन्द्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे आणि मल्लेशप्पा कलबुर्गी या तिघांच्या हत्त्येमागे कट्टरपंथी हिन्दुत्ववादी संघटनांचा आणि विशेष करुन सनातन संस्थेचा हात असल्याचा घट्ट दावा सातत्याने केला जात होता. या तिघांच्या हत्त्येपूर्वी काही घातपाती कारवायांमागे काही हिन्दुत्ववादी कट्टरपंथी मंडळी असल्याचे उघडकीस आले होते आणि संशयिताना पकडून त्यांच्याविरुद्ध खटलेही दाखल केले गेले. अर्थात कुणी वहीम वा संशय व्यक्त केला म्हणून संबंधितांविरुद्ध तडक कारवाई केली, असे पोलिसांना करता येत नाही. प्रसंगी तसे केले गेले आणि सावध झालेल्या प्रतिपक्षाने पुरावे नष्ट केले तर न्यायालयात पोलिसांचीच नाचक्की होते. परिणामी पानसरे यांच्या हत्त्या प्रकरणी ज्या समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या कार्यकर्त्यास आता अटक केली गेली आहे, त्याच्यावर तब्बल सहा महिने पोलीस पाळत ठेऊन होते. मोबाईलवरील त्याच्या प्रत्येक संभाषणाची छाननी करीत होते आणि सकृतदर्शनी काही ठोस आढळले म्हणूनच त्याला ताब्यात घेतले गेले. तरीही अद्याप त्याची चौकशी पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण होऊन जोवर या अटक केलेल्या तरुणाचा हत्त्येतील सहभाग नि:संदिग्धपणे उघड होत नाही, तोवर पोलीस सावध भूमिकाच घेतील हे उघड आहे. पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे की ज्या तीन पुरोगामी विचारवंतांची हत्त्या केली गेली आहे तिच्यामागे अन्य कोणतेही नाही तर वैचारिक शत्रुत्ल वा वैमनस्य होते किंवा असले पाहिजे. साहजिकच मग समीर गायकवाडपेक्षा ज्या विचाराच्या लोकानी त्याच्या हाती शस्त्र दिले (त्यानेच हत्त्या केली असल्यास) किंवा त्याला या हत्त्या प्रकरणात गोवले, त्यांच्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्वाचे आहे कारण या तिन्ही हत्त्या अन्य हत्त्यांप्रमाणे सामान्य नाहीत. कॉ.पानसरे यांच्या हत्त्येमागील गूढ पूर्णांशाने उलगडले गेले तर कदाचित दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्त्यांमागील गूढदेखील उलगडले जाऊ शकेल, असे मानायला वाव आहे. ज्याअर्थी पोलीस समीरपर्यत जाऊन पोहोचले त्याअर्थी े महाराष्ट्रातील दोन्ही हत्त्यांची प्रकरणे वा त्यांचा तपास गुंडाळला गेला नव्हता, असेही म्हणता येईल. उभय विचारवंतांच्या कुटुंबियांनी आजवर दाखविलेला संयम अनन्यसाधारण असाच आहे, यात शंका नाही. पण तरीही समीरच्या अटकेबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून लगेच त्यांना दूषण बहाल करणे या संयमाला छेद देणारे ठरते.

Web Title: Mysteries finally unravel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.