पक्षद्रोहाची बहुगुणी परंपरा
By Admin | Updated: October 22, 2016 04:21 IST2016-10-22T04:21:59+5:302016-10-22T04:21:59+5:30
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना काँग्रेस पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचारप्रमुखाचे पद दिले तेव्हाच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रिटा बहुगुणा-जोशी

पक्षद्रोहाची बहुगुणी परंपरा
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना काँग्रेस पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचारप्रमुखाचे पद दिले तेव्हाच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रिटा बहुगुणा-जोशी यांच्या अस्वस्थतेला आरंभ झाला होता. त्यांच्या घराण्यात पक्षद्रोहाची दीर्घ परंपरा असल्यामुळे आज ना उद्या त्याही काँग्रेसचा त्याग करतील असा कयास तेव्हाच अनेकांनी बांधला होता. आता तो खरा ठरला आणि काँग्रेसचे दीर्घकाळ प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या रिटाबाई भाजपामध्ये प्रवेश करत्या झाल्या. रिटाबाईंचे वडील हेमवतीनंदन बहुगुणा हे त्यांच्या काळात काँग्रेस पक्षाचे अतिशय शक्तिशाली नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काही काळ केन्द्रात राज्यमंत्रीही होते. १९७५ च्या आणीबाणीत काँग्रेस पक्षातील ज्या थोड्या लोकांनी देशात धुमाकूळ घातला, त्यात या हेमवतीनंदनांचाही समावेश होता. १९७७ मध्ये त्यांनी बाबू जगजीवनराम यांच्या संगतीने काँग्रेस फॉर डेमोक्रसी नावाचा वेगळा पक्ष काढून जनता पक्षाशी सोयरीक केली. १९७९मध्ये पुन्हा काँग्रेस प्रवेश केला. जनता सरकारचे पतन होऊन इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्या तेव्हा त्यांनी या गृहस्थांना पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद दिले. त्यासाठी त्यांनी पक्षात ‘सेक्रेटरी जनरल’ (महासचिव) हे नवे पदही निर्माण केले. इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्त्येनंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी अलाहाबाद क्षेत्राचे तिकीट त्यांना न देता अमिताभ बच्चन यांना दिले. तेव्हा या उच्चपदविभूषिताने परत काँग्रेसशी द्रोह केला आणि अलाहाबादमधून बच्चन यांच्या विरोधात निवडणूक लढविली. अपेक्षेप्रमाणे ते पराभूत झाले आणि पुढे त्यांचा राजकीय अस्तच झाला. काँग्रेसने दिलेली सत्तापदे दीर्घकाळ भोगून झाल्यानंतर पक्षद्रोह करणाऱ्यांची संख्या त्यांच्या आधीही फार मोठी होती. बहुगुणा यांनी ती आणखी बळकट केली. रिटा बहुगुणा यांचा आताचा भाजपा प्रवेशही याच परंपरेचा नवा अध्याय आहे. मात्र रिटाबाईंच्याही अगोदर त्यांचे बंधू विजय बहुगुणा यांनी आपला नंबर लावला. उत्तराखंड विधानसभेचे सदस्य असताना त्यांनी आपले काही सहकारी स्वत:सोबत घेऊन व साऱ्यांना अंधारात ठेवून भाजपाशी युती केली. परिणामी त्या राज्यातील काँग्रेसचे हरिश रावत सरकार सत्तेवरून पायउतार झाले. या पक्षद्रोहाचे पारितोषिक म्हणून या विजय बहुगुणांना भाजपाने त्या राज्याचे मुख्यमंत्रिपदही देऊ केले. परंतु त्यांच्या नेतृत्वात पक्ष सोडणाऱ्या सगळ््याच विधानसभा सदस्यांचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने अवैध व रद्दबातल ठरविल्याने विजय बहुगुणांचे मुख्यमंत्रिपद गेले व ते पुन्हा हरिश रावत यांच्याकडे आले. विजय बहुगुणा मूलत: नामांकित वकील. आधी अलाहाबाद आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात ते न्यायाधीशही होते. ते पद त्यागून त्यांनी १९९५मध्ये सक्रीय राजकारणात केलेला प्रवेशही वादग्रस्त ठरला होता. वडील आणि भाऊ यांची पक्षद्रोहाची हीच परंपरा आता रिटाबाईंनी पुढे नेली आहे. शिवाय कालपर्यंत ज्यांनी शिव्याशाप दिले त्या सगळ््यांना शुद्ध करून पक्षात घेण्याची परंपरा भाजपानेही आत्मसात केली असल्याने भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी रिटाबाईंचे स्वागत करताना त्यांच्यावर जी स्तुतीसुमने उधळली त्याचाही कोणाला अचंबा वाटू नये. गेली अनेक वर्षे राहुल गांधींसोबत राज्यात काम केल्यानंतर या बाईंना त्यांचे नेतृत्व एकाएकी जाचक का वाटू लागले याचे उत्तर त्यांनी दिले नाही व त्यांना ते मागावेसेही कुणाला वाटले नाही. सत्ता गेली की नवा घरठाव शोधणाऱ्यांची नावे आता देशातील बहुतेक लोकांना सांगता येऊ लागली आहेत. त्यामुळे हेमवतीनंदन-विजय आणि रिटाबाई यांचे पक्षांतर ही पक्षद्रोहाची एक बहुगुणी परंपरा आहे असेच आपणही त्याकडे पाहिले पाहिजे. मुळात उत्तरप्रदेशात काँग्रेस पक्ष अतिशय दुबळा आहे. आताच्या सर्वेक्षणानुसारही काँग्रेस पक्षाला मायावतींचा बहुजन समाज पक्ष, मुलायमसिंहांचा समाजवादी पक्ष आणि भाजपा यांच्या खालोखालच जागा मिळायच्या आहेत. माध्यमांना व राजकारणाच्या जाणकारांना हे वास्तव ठाऊकही आहे. तरीही त्यांच्यातले काही मुखंड रिटाबाईंच्या जाण्याने काँग्रेसला प्रचंड हादरा बसला आहे असे म्हणत असतील तर त्यांच्या अल्पमतीचे आपण केवळ कौतुकच तेवढे करायचे आहे. हादरा आकारमानाने प्रचंड असलेल्या प्रासादाला बसत असतो, चन्द्रमौळी झोपडीला नव्हे! जेथे सत्ता तेथे आपण ही आपल्या राजकीय पुढाऱ्यांची व कार्यकर्त्यांची वृत्ती राष्ट्रीय स्तरावरची आहे. तिचे नमुने आपण पाहतही असतो. त्यामुळे रिटाबाईंच्या जाण्याविषयी एवढे सारे लिहिण्याची खरोखरीच गरज नव्हती. तरीही हे लिहावेसे वाटण्याचे कारण त्यांच्या पक्षद्रोहाला असलेली वडिलोपार्जित परंपरा हे आहे आणि या परंपरेचा इतिहास ५० वर्षांएवढा जुना आहे. अशा ऐतिहासिक गोष्टी कितीही त्रस्त करणाऱ्या असल्या तरी त्यांचे निदान व चिकित्सा करणे आवश्यक आहे.