मुफ्तींच्या मुसक्या आवळा
By Admin | Updated: March 2, 2015 23:34 IST2015-03-02T23:34:46+5:302015-03-02T23:34:46+5:30
काश्मिरात झालेल्या शांततामय निवडणुकांचे श्रेय त्यांनी पाकिस्तान, हुरियत कॉन्फरन्स आणि काश्मिरातील दहशतवादी संघटनांना दिले आहे.

मुफ्तींच्या मुसक्या आवळा
जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना म्हातारचळ लागला आहे. काश्मिरात झालेल्या शांततामय निवडणुकांचे श्रेय त्यांनी पाकिस्तान, हुरियत कॉन्फरन्स आणि काश्मिरातील दहशतवादी संघटनांना दिले आहे. सीमेपलीकडची व सीमेत राहून दहशती कारवाया करणारी ही माणसे शांत होती म्हणूनच ही निवडणूक नीट पार पडली असे सांगून त्यांनी देशाच्या निवडणूक यंत्रणेसह त्याच्या सेनेचा व जनतेचाही घोर अपमान केला आहे. गेली ६० वर्षे काश्मिरात निवडणुका झाल्या व त्या शांततेतच पार पडल्या. या निवडणुकांच्या यशाचे श्रेय निवडणूक यंत्रणेसह देशाच्या सेनेला, सरकारला व जनतेला जाते. ते श्रेय पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांच्या पदरात घालून मुफ्तींनी काश्मीरचे नेतृत्व करायला लागणारे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही हेच उघड केले आहे. एका ज्येष्ठ पत्रकाराच्या मते आज इंदिरा गांधी असत्या तर असे उद््गार काढल्याबद्दल त्यांनी मुफ्तींना थेट तुरुंगातच पाठविले असते. शेख अब्दुल्ला या काश्मीरच्या लोकप्रिय नेत्याला त्याच्या अशाच उंडारलेपणाखातर पं. नेहरूंनी दीर्घकाळ तुरुंगात डांबले होते ही गोष्ट येथे साऱ्यांना व विशेषत: भाजपाच्या लोकांना आठवावी. मुफ्तींचा पीपल्स डेमॉक्रेटिक पक्ष आणि भाजपा यांची काश्मिरातील सध्याची युती हीच मुळी विळ्या-भोपळ्याची मोट आहे. त्या दोन पक्षात समान म्हणावी अशी एकही बाब नाही. केवळ सत्तेसाठी एकत्र येण्याचे ठरविल्याने त्या दोन्ही पक्षांनी त्यांच्या मूळ व खऱ्या भूमिका बाजूला सारल्या आहेत. भाजपाच्या कर्मठ नेत्यांना ही गोष्ट मनापासून आवडलेली नाही. त्यातून मुफ्तींचा चळ असा की पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना यांना आपण असे श्रेय देणार असल्याची गोष्ट त्यांनी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपल्या शपथविधीच्या सोहळ्यातच सांगून टाकली. ४९ दिवस चर्चेचे गुऱ्हाळ घालून भाजपाने मुफ्तींशी केलेला राजकीय करार पुढे न्यायचा एवढ्याच खातर कदाचित मोदींनीही त्यांच्या या म्हातारचळावर पांघरूण घालण्याचे व गप्प राहण्याचे ठरविले असणार. घटनेतील ३७० व्या कलमाने काश्मीरला विशेष दर्जा दिला आहे. हा दर्जा पूर्वीच्या जनसंघाच्या व आताच्या भाजपाच्या डोळ्यात कायमचा सलत राहिला आहे. संधी मिळताच हे कलम आम्ही रद्द करू ही त्याची जाहीर भूमिका आहे. सत्तेसाठी ही भूमिका गिळण्याची व त्याविषयी गप्प राहण्याची तयारी केलेल्या भाजपाला मुफ्तींच्या या बकव्यानंतरही मूक राहणे भाग पडले असेल तर ते समजण्याजोगेच आहे. काँग्रेससह इतर सर्व पक्षांनी आणि भाजपातील काही तुरळक नेत्यांनी मुफ्तींचा यासाठी निषेध केला असला तरी त्यामुळे मुफ्तींचा आगाऊपणा आणि भाजपाचा बोटचेपेपणा लपणारा नाही. मुफ्ती मोहम्मद सईद हे एकेकाळी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारात गृहमंत्र्याच्या पदावर राहिलेले अनुभवी व ज्येष्ठ नेते आहेत. काश्मीरच्या राजकारणातही त्यांची भूमिका मध्यममार्गी व संयत अशीच राहिली आहे. भाजपाची सत्ता नको ही भावना आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या दीर्घकालीन सत्तेचा उबग यामुळे काश्मिरातील जनतेने मुफ्तींच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर मते दिली ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्या विजयाचे श्रेय काश्मीरच्या शांतताप्रिय जनतेला द्यायचे सोडून त्या श्रेयाचा मान त्यांनी काश्मिरात आजवर शांतता नांदू न देणाऱ्या पाकिस्तानला आणि त्या देशाच्या घुसखोर हस्तकांना दिला असेल तर मुफ्तींच्याच राष्ट्रीय निष्ठेविषयी संशय घेण्याचा अधिकार या देशाला प्राप्त होणार आहे. मुफ्तींशी मैत्री करणाऱ्या भाजपाला मात्र यातल्या कशाचेही सोयरसुतक नाही. सत्ता ज्या कोणामुळे मिळेल त्याच्याशी मैत्री करणे हा त्या पक्षाचा इतिहास आहे. इंदिरा गांधी आणि जनरल वैद्य या दोघांची हत्त्या करणाऱ्या गुन्हेगारांना धर्मवीर म्हणून ज्या शिरोमणी अकाली दलाने गौरविले त्या दलासोबत भाजपाने पंजाबात सत्ता धारण केली आहे, ही एकच गोष्ट त्याच्या अशा राजकीय नैतिकतेवर प्रकाश टाकणारी आहे. काश्मिरात भाजपाचे सरकार कोणाच्याही मदतीने का असेना सत्तेवर येणे ही बाब आरंभी अनेकांना स्वागतार्ह वाटली होती. भाजपाचा भगवा रंग काश्मीरच्या आकाशात पाहता येणे अनेकांना देशाच्या एकात्मतेचे निदर्शकही वाटले होते. त्याचमुळे भाजपा व मुफ्ती यांच्यातील वाटाघाटींकडे साऱ्यांनी मोठ्या आशेने पाहिले होते. नरेंद्र मोदींनीही काश्मीरच्या जनतेला विकासाची मोठी आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांचा काश्मिरी लोकांवर काहीएक परिणाम दिसला नाही. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार काश्मीर खोऱ्यातून निवडून आला नाही. त्यांचे सारे आमदार जम्मू क्षेत्रातून तर मुफ्तींचे आमदार काश्मीर खोऱ्यातून निवडून आले. एका अर्थाने जम्मू आणि काश्मीरचे या निवडणुकीने केलेले हे पक्षीय विभाजनही आहे. एवढ्यावरही हे दोन पक्ष एकत्र येऊन त्या प्रदेशाचा विकास करतील आणि त्या राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणून सोडतील अशी आशा अनेकांनी बाळगली होती. मुफ्ती मोहम्मद सईद या नव्या मुख्यमंत्र्याने त्या दोन पक्षाच्या संयुक्त सरकारच्या सत्तेतील पदार्पणालाच आपल्या ‘पाकिस्तानवादी आणि दहशतवादी’ वक्तव्याने अपशकून केला आहे. या प्रकाराचे समर्थन होणे नाही आणि जो ते करण्याचा प्रयत्न करील तो देशभक्तही असणार नाही.