नाटकांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात पण राज्यातल्या नाट्यगृहांचे गळे कोणी घोटले?

By अतुल कुलकर्णी | Updated: December 5, 2023 05:53 IST2023-12-05T05:52:26+5:302023-12-05T05:53:01+5:30

नाटकवेड्या माणसांची आजही महाराष्ट्रात कमी नाही. नाटकांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात होतात; पण इथल्या नाट्यगृहांची अवस्था आज कशी आहे?

Most experiments of dramas are in Maharashtra but who strangled the theaters in the state? | नाटकांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात पण राज्यातल्या नाट्यगृहांचे गळे कोणी घोटले?

नाटकांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात पण राज्यातल्या नाट्यगृहांचे गळे कोणी घोटले?

२१ नोव्हेंबर २००८ ची गोष्ट. तेव्हाच्या औरंगाबादमध्ये सिडकोने सुसज्ज नाट्यगृह बांधले. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटनाच्या वेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हे नाट्यगृह आता आम्ही महापालिकेला हस्तांतरित करीत आहोत, असे सांगितले. तेव्हा विलासराव देशमुख यांनी या सुंदर नाट्यगृहाची अंतर्गत रचना, बाहेरील इमारत असे वेगवेगळे फोटो आताच काढून ठेवा. एकदा का हे महापालिकेच्या ताब्यात गेले, की हे नाट्यगृह केवळ फोटोतच बघायला शिल्लक राहील, असे विधान केले होते. आज विलासराव देशमुख नाहीत; मात्र त्यांचे विधान छत्रपती संभाजीनगर महापालिकेने १०० टक्के खरे करून दाखविले आहे. गेली अनेक महिने ते नाट्यगृह बंद पडलेले आहे. वित्तमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार लातूरला एका कार्यक्रमासाठी १७ जून २०१८ रोजी आले होते. तिथे त्यांनी सुसज्ज नाट्यगृहाची घोषणा केली. त्यासाठी जुलै २०१८ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूददेखील केली; मात्र साडेपाच वर्षे झाली तरीही लातूरला नाट्यगृह उभे राहिलेले नाही. 

मुंबईतील रवींद्र नाट्यगृह दुरुस्तीसाठी  बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. ते केव्हा सुरू होणार माहीत नाही. दामोदर नाट्यगृह पाडले. तीन वर्षे ते सुरू होण्याची शक्यता नाही. लालबागच्या हनुमान थिएटरचे मंगल कार्यालयात रूपांतर करावे लागले आहे. गोरेगाव येथे नाट्यगृह बांधण्याची घोषणा २००८ साली झाली. प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचे ठरले. दहा वर्षांनी, २०१८ मध्ये भूमिपूजन झाले; पण गोरेगावकरांना नाट्यगृह अद्याप दिसलेच नाही. या पार्श्वभूमीवर  मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक मंत्री या नात्याने महाराष्ट्रात ७५ नाट्यगृहे उभारण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली, त्या घोषणेचेदेखील भविष्यात असे होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार? 

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींची जशी गरज असते, तशीच त्याला साहित्य, कला, संस्कृती यांचीही तेवढीच गरज असते. सांस्कृतिक, साहित्यिक आघाडीवर महाराष्ट्र देशात कायम नंबर एक राहिला. चित्रपटाची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली. विष्णुदास भावे यांनी पहिले नाटक सांगलीच्या नाट्यगृहात केले. कलेचे माहेरघर म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी देशाची सांस्कृतिक पताका कायम उंचावत ठेवली. असे असताना आज महाराष्ट्र या आघाडीवर कुठे आहे? जे कोणते सरकार सत्तेवर असेल त्यांनी राज्यात सांस्कृतिक आणि कलेचे वातावरण जोपासण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेतला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रात असे काहीही होताना दिसत नाही.

नवीन नाट्यगृह उभारण्यापेक्षा आहे त्या नाट्यगृहांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. बसण्यासाठी चांगल्या खुर्च्या, एसी हॉल, टॉयलेट, बाथरूमच्या सुविधा या मूलभूत गोष्टीही मिळणार नसतील तर त्या ठिकाणी नाटकं होतील कशी..? नाटकांचे सगळ्यांत जास्त प्रयोग महाराष्ट्रात होतात. नाटकवेडा मराठी माणूस आजही महाराष्ट्रात संख्येने प्रचंड आहे. शास्त्रीय संगीत असो किंवा सुगम संगीत. गाण्यांच्या कार्यक्रमाला जाणारा संगीतवेडा मराठी माणूस आजही प्रत्येक शहरात हजारोंच्या संख्येने आहे. आजही महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ‘दिवाळी पहाट’ होते. वर्षानुवर्षे ऐकलेली आणि सहज कुठेही उपलब्ध होणारी गाणी पुन्हा पुन्हा ‘याचि देही, याचि डोळा’ ऐकण्यासाठी मराठी माणूस आजही भल्या पहाटे कार्यक्रमाला तुफान गर्दी करतो. प्रशांत दामलेंसारखा अभिनेता रंगभूमीवर नाटकांचे १३ हजार प्रयोग करतो. लता मंगेशकर, आर.डी.बर्मन, मदन मोहन, मोहम्मद रफी, किशोर कुमार, भीमसेन जोशी यांनी गाऊन ठेवलेल्या गाण्यांना पुन्हा-पुन्हा ऐकायला रसिक नाट्यगृहात जातात. महेश काळे, राहुल देशपांडेंसारखे तरुण पिढीचे गायक शास्त्रीय संगीताची आवड तरुण पिढीच्या मनात निर्माण करतात. त्यासाठी गावोगावी नाट्यगृहांत जाऊन गाण्यांचे प्रयोग करतात. या अशा प्रयोगांमुळेच राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक सलोखा थोडाबहुत टिकून आहे.

मात्र या कलावंतांना सरकार काय देते? चित्रकला, शिल्पकला, नाटक, लावणी, अभंग, तमाशा ही महाराष्ट्राची बलस्थानं आहेत. त्यांच्यासाठी नाट्यगृह अल्पदरात उपलब्ध करून द्यायचे नाहीत तर कोणासाठी द्यायचे? नाट्यगृहांचे भाडे हजारोंच्या घरात आहे. ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या न्यायाने नाटकाची टीम घेऊन वेगवेगळ्या गावांत जाऊन प्रयोग करणे सोपी गोष्ट नाही. उलट सरकारने या कामासाठी नाट्यगृहांचे दर अत्यल्प ठेवले पाहिजेत. तसे न करता नाट्यगृह बांधायचे, पुन्हा त्याची दुरुस्ती काढायची, पुन्हा ते बंद ठेवायचे आणि त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदारांनी रग्गड पैसे कमवायचे. हेच जर महाराष्ट्रात सुरू राहिले तर हळूहळू रंगमंचीय आविष्कार ही संकल्पनाच नष्ट होत जाईल. त्याचे पातक मात्र त्या-त्या काळातल्या सरकारांवर येईल. 

आजही जगाच्या कानाकोपऱ्यात संगीताचे, नाटकांचे एकेक वर्ष आधी बुकिंग होते. प्रत्येक देश आपल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसतो. आपल्याकडे मात्र असे काही करण्याचा विचारही कोणाच्या मनात येत नाही. रंगभूमीवरचे कलाविष्कार बंद झाले तर अख्खी पिढी संवेदनाहीन होईल. त्यांच्यामध्ये कसल्याच भावभावना उरणार नाहीत. चित्रपटाने आपली भाषा कधीच बदलली आहे. अडीच तासांच्या सिनेमात अडीचशे मुडदे पाडण्याचे काम ‘ॲनिमल’सारखा सिनेमा करतो. बॉक्स ऑफिसवर तो कोट्यवधी रुपये कमवतो. दुसरीकडे कौटुंबिक नाती जपत, भावभावनांना खत-पाणी घालणारी, मनाची उत्तम मशागत करणारी रंगभूमी आम्ही दयनीय अवस्थेत ठेवणार असू तर आम्ही कसला समाज घडवीत आहोत, याचा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधीने, सरकारने गंभीरपणे केला पाहिजे.

atul.kulkarni@lokmat.com

Web Title: Most experiments of dramas are in Maharashtra but who strangled the theaters in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.