अधिक दक्ष म्हणजे?
By Admin | Updated: October 24, 2015 04:37 IST2015-10-24T04:37:12+5:302015-10-24T04:37:12+5:30
कधीकधी शत्रूपेक्षा मित्र आणि अगदी सगेसोयरेदेखील तापदायक ठरु शकतात व यांच्यापेक्षा उघड शत्रू बरे म्हणण्याची जी पाळी लोकांवर येत असते त्या लोकांमध्ये आता

अधिक दक्ष म्हणजे?
कधीकधी शत्रूपेक्षा मित्र आणि अगदी सगेसोयरेदेखील तापदायक ठरु शकतात व यांच्यापेक्षा उघड शत्रू बरे म्हणण्याची जी पाळी लोकांवर येत असते त्या लोकांमध्ये आता पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील राजनाथसिंह यांच्यासारखे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या ज्येष्ठांचाही समावेश होऊ लागल्याचे दिसून येते. स्वपक्षाच्या कोणी तरी काही बोलावे आणि जनतेने पंतप्रधानांकडे जाब मागावा, असे वांरवार होऊ लागले आहे. त्यामुळे अशा बोलभांडांनी बोलण्यापूर्वी अधिक दक्षता घ्यावी असा जाहीर उपदेश केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंंह यांना करणे भाग पडले आहे. या उपदेशाला तात्कालीक कारण घडले आहे ते परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के सिंह आणि केन्द्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजज्जू यांनी केलेली विधाने. फरीदाबाद जिल्ह्याच्या सोनपेढ गावातील एका दलित कुटुंबास जिवंत जाळण्याची जी अमानवी दुर्घटना घडली तिच्याबाबत बोलताना मंत्री आणि गाझियाबादचे खासदार व्ही.के.सिंह म्हणाले, कुणी कुत्र्याला दगड मारला तरी केन्द्र सरकारला जबाबदार धरणार का? एखाद्या अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटनेवर आपण काय प्रतिक्रिया देतो आहोत याचे साधे तारतम्यदेखील या प्रश्नार्थक विधानात दिसून येत नाही. तसाच प्रकार रिजज्जू यांचा. राजधानी दिल्लीतील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना, दिल्लीत उत्तर प्रदेशातील अनेकांनी स्थलांतर केले आहे व त्यांना कायदा व सुव्यवस्था मोडून काढण्यात आनंद मिळतो असे विधान त्यांनी केले होते. टीका झाल्यानंतर दोहोंनीही त्यांचे खुलासे सादर केले असले तरी राजनाथसिंह यांचे या खुलाशांनी समाधान झालेले नाही. मुळात आपण जे बोलतो त्यावर खुलासा करण्याची वेळच येऊ नये व आपल्या विधानांचा विपर्यास केला गेला असे तर अजिबातच म्हणू नये, इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी उभय मंत्र्यांना समज दिली आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन असेही म्हणता येईल की मुळात केन्द्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या मंत्र्यांना जाहीरपणे समज देण्याची वेळ त्यांच्या ज्येष्ठांवर तरी का यावी? समाजकारणात आणि राजकारणात वावरणाऱ्या लोकाना कोणतेही विधान करण्यापूर्वी संबंधित विधानातून कोणता अनर्थकारी अर्थ ध्वनित होणार नाही याची दक्षता घ्यावी लागत असते.