लोकशाहीतील ‘एकाधिकारशहां’साठी...
By Admin | Updated: July 20, 2016 04:38 IST2016-07-20T04:38:52+5:302016-07-20T04:38:52+5:30
तुर्कस्तानात फसलेल्या लष्करी उठावाने पुन्हा एकवार लोकशाही हेच आधुनिक जगाचे सत्तातत्त्व असल्याचे सिद्ध केले

लोकशाहीतील ‘एकाधिकारशहां’साठी...
तुर्कस्तानात फसलेल्या लष्करी उठावाने पुन्हा एकवार लोकशाही हेच आधुनिक जगाचे सत्तातत्त्व असल्याचे सिद्ध केले असेल तर या उठावाने त्या देशातील राज्यकर्त्यांच्या दुबळ््या बाजूही जनतेच्या व जगाच्या लक्षात आणून दिल्या आहेत. तुर्कस्तानात याआधीही असे उठाव झाले आहेत. १९६०, १९७१, १९८० आणि १९९७ या वर्षात झालेले उठाव यशस्वीही झाले होते. (यावेळच्या उठावाच्या अपयशाचे खरे कारण तो करणाऱ्या लष्करी सेनापतींचे अदूरदर्शीपण आणि योजनेतील अपुरेपण हे आहे.) मात्र त्या उठावातून सत्तेवर आलेल्या लष्करशहांनी सत्तेचा वापर अमाप संपत्ती मिळवण्यासाठी व जनतेवर जास्तीचे जुलूम लादण्यासाठी केला. त्या पार्श्वभूमीवर आताचे अध्यक्ष एर्डोगन यांची राजवट लोकांनी बहुमताने सत्तेवर आणली आहे. एर्डोगन हे कवी आहेत आणि त्यांचे कवीत्व लोकांना आवडणारेही आहे. आपल्या सत्तेच्या आरंभकाळात देशातील सर्व धर्मांचे व वंशांचे सारखेपण मान्य करणारे आणि त्या साऱ्यांच्या नागरी अधिकारांच्या रक्षणाची हमी देणारे एर्डोगन पुढल्या काळात मात्र बदललेले दिसले. आपली सत्ता बळकट होताच त्यांनी तुर्कस्तानात बहुमतवादी राज्यसत्ता आणण्याचा उद्योग सुरू केला. त्यासाठी नागरी स्वातंत्र्यांचा संकोच केला आणि माध्यमांची स्वातंत्र्येही गोठविली. ज्या आशेने व लोकशाहीविषयीच्या विश्वासाने जनतेने त्या कवी माणसाच्या हाती सत्ता व आपले भवितव्य सोपविले त्या जनतेचाच एर्डोगनच्या नव्या अवताराने अपेक्षाभंग केला. परिणामी त्यांचे अनुयायी त्याना सोडून गेले, पक्षात फूट पडली आणि जे लष्कर राजवटीशी दीर्घकाळ एकनिष्ठ होते त्यातच असंतोष वाढू लागला. त्या साऱ्याचा परिणाम लष्कराच्या आताच्या अयशस्वी उठावात झाला. हा उठाव होताच एर्डोगन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण लोकांनी ऐकले व ते आपापल्या मोबाईलवरून इतरांनाही ऐकविले. जुन्या लष्करी राजवटींची धास्ती घेतलेले तुर्की लोक मग पुन्हा एकवार एर्डोगन यांच्या अर्धवट का होईना पण लोकशाही राजवटीच्या मागे उभे राहिले. त्यांनी लष्करी पथके अडविली. त्यांचा तोफखाना बंद पाडला आणि त्यातल्या अनेकांना लोकांनी पकडूनही दिले. जगातील लोकशाही देशांनीही एर्डोगन यांना पाठिंबा देत आताच्या लोकशाहीच्या काळात लष्करी हुकूमशाहीला जागा नसल्याचे स्पष्ट केले. जगातले हुकूमशहा हे तसेही कमी होत व संपत आहेत. उरलेले हुकूमशहाही २०२५ पर्यंत जगात असणार नाहीत असे राज्यशास्त्राच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातून तुर्कस्तान हा फार पुरातन आणि इतिहासाने समृद्ध असलेला अनुभवी देश आहे. अनेक चांगल्या आणि अनेक जुलुमी राजवटी त्याने भूतकाळात अनुभवल्या आहेत. हिंसाचार, शस्त्राचार व त्यातही धार्मिक आणि वांशिक अत्याचारांविरुद्ध त्याच्या तरुणांमध्ये संताप आहे. त्यांची मोठाली पथके त्याविरुद्ध लढायला आणि मरायलाही सज्ज आहेत. झालेच तर तुर्कस्तान हा जगाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेला आणि पौर्वात्त्य व पाश्चात्त्य या दोन्ही जगांचे बरेवाईट अनुभव घेतलेला देश आहे. त्यामुळे त्यातली जनता एर्डोगनच्या एकांगी राजवटीवर नाराज झाली असली तरी तिला लष्कराची सर्वंकष हुकूमशाही अमान्य आहे. लोकशाहीचे नाव घेऊन सत्तेवर आल्यानंतर ज्यांच्या डोक्यात हुकूमशाही महत्त्वाकांक्षा उभ्या झाल्या वा होतात त्या जगभरच्या पुढाऱ्यांना व त्यांच्या पक्षांना बरेच शहाणपण शिकवू शकणारी ही स्थिती आहे. एर्डोगनचे डोकेही या नव्या बंडाने काहीसे जमिनीवर व लोकशाहीच्या बाजूने उतरलेले जगाला दिसले आहे. ते तसेच राहावे व त्यांनी देशाला पुन्हा लोकशाही हक्क बहाल करावे ही अपेक्षा आहे. मात्र एर्डोगन अजूनही तसेच राहिले असतील तर त्यांच्या हातून तुर्कस्तानात पुन्हा एक नवे सूडसत्र सुरू होण्याची भीती आहे. आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्यांना देहांत प्रायश्चित्त देणे ही तशीही जगातल्या सगळ््या सत्ताधाऱ्यांची परंपरा आहे. या बंडात ४०० वर माणसे तशीही मृत्यू पावली आहेत. ते फसल्यानंतर एर्डोगनच्या पाठिराख्या सैनिकांनी पकडलेल्या लोकांची संख्या सहा हजार आहे. या माणसांचे पुनर्वसन होईल की त्यांचे बळी घेतले जातील हा जगासमोरचा आताचा प्रश्न आहे. सबब, झालेले बंड शमविणे, त्यात अडकलेल्यांचे पुनर्वसन करणे आणि दहशतवादी टोळ्यांचा बंदोबस्त करून देशात शांतता निर्माण करणे एवढी सगळी आव्हाने एर्डोगन यांच्यापुढे आहेत. त्यांच्याविषयी लोकशाही जगात अजूनही सहानुभूती शिल्लक असली तरी त्यांनी पूर्वीचे जास्तीचे पाठबळ हुकूमशाही पद्धतीमुळे कमी करून घेतले आहे. तुर्कस्तानातील घटनांमधून जगाने शिकावे असे बरेच आहे. एक, जगाची वाटचाल लोकशाहीच्या दिशेने होत आहे. दोन, या लोकशाहीतील नेत्यांनी त्यांच्यातील हुकूमशाही वा एकाधिकारशाही प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. तीन, असा आळा घालू न शकणारी माणसे विरोधी बंडांना निमंत्रण देणारी ठरतात व त्या बंडात त्यांचा घातही होऊ शकतो. एर्डोगन आणि तुर्कस्तान यांच्यापासून जगाने हे शिकणे गरजेचे आहे.