क्षणापासून मनापर्यंत

By Admin | Updated: November 4, 2016 04:44 IST2016-11-04T04:44:23+5:302016-11-04T04:44:23+5:30

पुढच्या क्षणी आपण असू की नसू याची खात्री माणसाला देता येत नाही.

From the moment to the heart | क्षणापासून मनापर्यंत

क्षणापासून मनापर्यंत


पुढच्या क्षणी आपण असू की नसू याची खात्री माणसाला देता येत नाही. तरीही तो आपल्या भविष्याविषयी चिंताग्रस्त, आपल्या कर्तृत्वाविषयी तणावग्रस्त आणि आपल्या प्रॉपर्टीविषयी भयग्रस्त स्थितीत का असतो, हे लक्षात येत नाही. या तिन्ही दिशांनी त्याचे लक्ष सतत विचलित केल्याने हाती घेतलेले कोणतेही काम तो नीट पूर्ण करू शकत नाही. त्याने खरी काळजी घेतली पाहिजे ती आजच्या दिवसाची, हातातल्या कामाची, आत्ताच्या क्षणाची. या क्षणी जर तो शरीराने आणि मनाने सक्षम असला तरच जगण्याचा आनंद व्यवस्थित घेऊ शकतो आणि हातातील कामही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो.
एक आजीबाई आयुष्यात प्रथमच पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाल्या. जाण्यापूर्वी आपले सारे दाग-दागिने एकत्र करून त्यांनी ते गाठोडे शेजारणीकडे ठेवले. पण त्या जसजशा पंढरीच्या दिशेने पुढे सरकत होत्या तसतसे त्यांचे मन त्या गाठोड्याच्या दिशेने मागे मागे जात होते. आपले दागिने चोरीला गेले तर आपले पुढे काय होईल या भीतीने त्या इतक्या ग्रस्त होत्या की पांडुरंगाच्या जागी त्याना ते दागिन्यांचे गाठोडेच दिसायला लागले.
असेच एक सद्गृहस्थ आजारी वडिलांना भेटण्यासाठी ट्रेनमध्ये बसून निघाले होते. ते इतके टेन्शनमध्ये होते की बसताना ते आपली बॅग डोक्यावर घेऊन बसले. शेजारी म्हणाला, बॅग वर किंवा पायाखालच्या जागेत ठेऊ शकता. त्यावर ते सद्गृहस्थ काय म्हणतात? माझे तिकीट काढले आहे; बॅगेचे नाही! बॅग डोक्यावर ठेवल्याने त्यांचे टेन्शन कमी कसे होणार होते हे त्या पांडुरंगालाच ठावे.
विचलित न होता हाती घेतलेल्या कामात पूर्णपणे बुडून जाणारा किंवा चालू क्षणांना आनंदाने सामोरे जाणारा माणूस आपोआप यशाच्या मुक्कामी पोहोचतो. विद्यार्थी असो, खेळाडू असो, चित्रकार असो, गायक असो, शिक्षक असो वा आणखी कोणी असो, कामात पूर्ण लक्ष घातले की तो यशस्वी होणार हे नक्की. बर्फ जसा पाण्यात विरघळतो किंवा तेल आणि वात जसे पूर्णपणे एकरूप होऊन प्रकाश देण्याचे काम करतात, तसे माणसाने कामाशी एकरूप झाले पाहिजे.
आजीबाईनी गाठोड्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे किंवा त्या गृहस्थाने डोक्यावरचे ओझे खाली उतरून ठेवणे आवश्यक होते. आजीबार्इंनी विठ्ठलाचे नामस्मरण करत राहणे आणि त्या गृहस्थाने वडिलांना आराम पडावा म्हणून औषधोपचारांचे नियोजन करत, सद्भावनांचे वलय विस्तारत ठेवणे अधिक महत्वाचे होते.
-प्रल्हाद जाधव

Web Title: From the moment to the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.