मोदींच्या आघाडीतील अस्वस्थता

By Admin | Updated: February 20, 2016 02:33 IST2016-02-20T02:33:25+5:302016-02-20T02:33:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कुरबुरी जुन्याच असल्या तरी त्यांना आता जास्तीचे धारदार व काटेरी स्वरूप आले आहे.

Modi's uneasiness | मोदींच्या आघाडीतील अस्वस्थता

मोदींच्या आघाडीतील अस्वस्थता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कुरबुरी जुन्याच असल्या तरी त्यांना आता जास्तीचे धारदार व काटेरी स्वरूप आले आहे. आपला पक्ष २८२ खासदारांसह स्वबळावर बहुमतात आहे याचा भाजपाच्या काही पुढाऱ्यांना वाटणारा अभिमान उन्मादाच्या पातळीवर उंचावल्यामुळे आजवर दबल्या आवाजात केल्या जाणाऱ्या आघाडीतील तक्रारी आता उघड्यावर आल्या आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील सप्ताहात सुरू व्हायचे आहे. त्या सुमाराला या तक्रारी जाहीर होणे भाजपा व पंतप्रधान या दोघांसाठीही अडचणीचे ठरणार आहे. भाजपाचे अध्यक्ष अमीत शहा यांनी आघाडीतील नाराज पक्षांची एक बैठक नुकतीच घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत चव्हाट्यावर आलेले मामले जुने असले तरी त्यामागचा तक्रारकर्त्यांचा संताप मोठा असल्याचे आढळले आहे. भाजपा व तिचे नेतृत्व हिंदुत्वाचा आग्रह धरत असल्यामुळे देशातील इतर धर्माचे लोक सरकारवर रुष्ट आहेत अशी तक्रार या बैठकीत अकाली दलाच्या नेत्यांनी केले. अकाली दल आणि भाजपा यांची मैत्री, भाजपाच्या जुन्या जनसंघावतारापासून राहिली आहे आणि तिच्यात कधी खंड पडला नाही. मात्र पंजाबातील शीख समाजाच्या पाठिंब्यावर अकाली दलाची सारी भिस्त असल्यामुळे व त्या समाजालाही भाजपाच्या हिंदुत्वाच्या आग्रहाचे चटके बसू लागले असल्यामुळे तेथील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसकट सारा अकाली वर्ग अस्वस्थ झाला आहे. वास्तव हे की या अकाल्यांनी आणि त्यांच्या शिगुप्रसने इंदिरा गांधी व जनरल वैद्य यांचे खून करणाऱ्या गुन्हेगारांना धर्मात्मे म्हणून गौरविले आहे. त्यांना सरोपे देऊन त्यांचे जाहीर सत्कार केले आहे. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने अशा पक्षासोबत असलेले आपले संबंध त्यामुळे कधीच तोडले असते. पण भाजपाच्या धर्मग्रस्त राजकारणाला अकाल्यांची धर्मांधता भावत असल्याने आणि त्या दोहोंचा काँग्रेसविरोध त्यांच्या धर्मांधतेएवढाच जोरकस असल्यामुळे त्यांची युती टिकली आहे. मात्र आताचे पंजाबचे राजकारण बदलले आहे. बादल पिता-पुत्रांचे सरकार त्यांच्या भ्रष्ट राजवटीमुळे जेवढे बदनाम झाले तेवढेच बादल कुटुंबाने गेल्या दहा वर्षात जमविलेल्या अमाप संपत्तीमुळेही लोकांच्या मनातून उतरले आहे. काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना येत्या निवडणुकीत आपला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले असल्याने (या अमरिंदरसिंगांनीच अमृतसरच्या लोकसभा क्षेत्रात अरुण जेटलींचा पराभव केला आहे) अकाल्यांना आपला परंपरागत मतदार टिकवून राहण्याची घाई झाली आहे. त्यातून ‘तुमचे हिंदुत्व जरा आवरा’ असा अहेर त्यांनी भाजपाला केला आहे. शिवसेना हा प्रकृतीनेच नाराज असलेला पक्ष आहे. त्याला केंद्रात एक व महाराष्ट्रात चार बिनकामी मंत्रीपदे भाजपाने दिल्याने त्याच्या नाराजीचा पारा वाढला आहे. तुम्ही आम्हाला योग्य ती वागणूक देत नाही, आमचा सन्मान राखत नाहीत आणि आमच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत अशा बाबी या पक्षाने त्या बैठकीत पुढे आणल्या. त्याची खरी मागणी महत्त्वाच्या मंत्रीपदाची आहे आणि भाजपावाले तिला भीक घालायला जराही राजी नाहीत हे त्याच्या संतापाचे खरे कारण. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हा सदैव अस्वस्थ असलेला आणि मंत्रीपदावाचून तळमळणारा पुढारी आहे. त्याने या बैठकीत आपली खरी व्यथा न सांगता रोहीत वेमुलाच्या आत्महत्त्येने रालोआला आणलेली अवकळा बैठकीत सांगितली. या प्रश्नावर आपल्याला व सरकारला जनतेत बोलायला तोंड राहिले नाही असे त्यांचे म्हणणे पडले. आठवल्यांचे खरे दु:ख ठाऊक असलेली भाजपा त्यांच्याविषयी फारशी गंभीर असणार नाही हे उघड आहे. मात्र अशाच तक्रारी दक्षिणेतील तेलगु देसम व इतर पक्षांनी केल्यामुळे रालोआचे नेते चिंतातूर झाले आहेत. दिल्ली व बिहारमध्ये दारुण पराभव होणे, अर्थव्यवस्थेचे जमीनदोस्त होणे, सत्ताधाऱ्यातील एका गटाचा धर्मांधळेपणा वाढत जाणे आणि येत्या काही काळात केरळ, तामिळनाडू, बंगाल व उत्तरप्रदेश या राज्यात विधानसभांच्या निवडणुका होणार असणे याही गोष्टी भाजपाच्या पुढाऱ्यांएवढ्याच त्यांच्या आघाडीत सामील झालेल्या पक्षांच्याही चिंतेचा विषय बनल्या आहेत. त्यातच आता उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने राम मंदिराचे घोडे पुढे दामटले आहे. त्याचा आपल्याला कोणताही लाभ व्हायचा नाही हे तिच्या मित्रपक्षांना चांगले ठाऊक आहे. जनतेतील भाजपाविषयीचा आरंभीचा उत्साह ओसरला आहे आणि मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हापेक्षाही आताची आर्थिक स्थिती वाईट व डळमळती आहे. या साऱ्याला मोदींचा पक्ष जबाबदार असला तरी रालोआमुळे आपणही त्याच्यासोबत भरडले जावू या भीतीने मित्रपक्षांना ग्रासले आहे. ही स्थिती सावरायला अमित शाह यांची राजनीती कितपत पुरेशी पडेल याविषयी त्या पक्षांएवढेच त्यांचे मतदारही अस्वस्थ आहेत.

Web Title: Modi's uneasiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.