आधुनिक भगीरथ !
By Admin | Updated: April 24, 2017 23:23 IST2017-04-24T23:23:40+5:302017-04-24T23:23:40+5:30
काही विशिष्ट गट, समूह, पेशांना विनोद निर्मितीसाठी लक्ष्य करण्याची प्रथा जगभर आहे. काहींना स्वभाव वैशिष्ट्यांसाठी, काहींना वेंधळेपणासाठी

आधुनिक भगीरथ !
काही विशिष्ट गट, समूह, पेशांना विनोद निर्मितीसाठी लक्ष्य करण्याची प्रथा जगभर आहे. काहींना स्वभाव वैशिष्ट्यांसाठी, काहींना वेंधळेपणासाठी, तर काहींना विसरभोळेपणासाठी लक्ष्य करून, त्यांच्यावर विनोद केले जातात. युरोप-अमेरिकेत ब्लॉँड युवती, भारतात संता-बंता ही काल्पनिक पात्रे विनोद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. काही पेशांवर तर जगभर सर्वत्र विनोद निर्मिती होत असते. विनोदी चुटकुल्यांमध्ये दर्शविले जातात तसे प्राध्यापक खरोखरच विसरभोळे असतात का, हा संशोधनाचा विषय आहे; पण भारतात अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या उक्तीतून, कृतीतून, राजकीय नेत्यांना विनोद निर्मितीसाठी उगीच लक्ष्य केले जात नसल्याचे सिद्ध केले आहे. त्या मालिकेत आता तामीळनाडूचे सहकार मंत्री सेल्लूर के. राजू यांचेही नाव जोडले गेले आहे. तामीळनाडू यावर्षी भीषण दुष्काळास तोंड देत आहे. गत १४० वर्षातील हा सर्वात भयंकर दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत आहे. साहजिकच त्या राज्यात पाण्याची बचत करण्यास प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. राजू यांनीही त्यामध्ये आपले योगदान देण्याचे ठरवले. ते पडले राज्याचे मंत्री ! त्यामुळे त्यांचे योगदान सर्वसामान्यांप्रमाणे थातूरमातूर असून कसे चालेल? ते भव्यदिव्यच असायला हवे ! त्यामुळे राजू महाशयांनी मदुराई शहरानजीकच्या वैगेई नामक जलाशयातील पाण्याची बचत करण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यांनी खूपच अनोखा मार्ग अवलंबला. जलाशयातील पाण्यावर थर्मोकोल शीटचे आच्छादन घालून बाष्पीभवनाद्वारे होणारी पाण्याची घट थांबवण्याचा घाट त्यांनी घातला. केवळ विचार करूनच ते थांबले नाहीत, तर शनिवारी त्यांनी स्वहस्ते या अनोख्या प्रयोगाच्या अंमलबजावणीसही प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी तब्बल दहा लाख रुपये खर्च करून थर्मोकोल शीट विकत घेतल्या आणि त्या चिकटपट्टीद्वारे एकमेकांना चिकटवून जलाशयात सोडल्या; पण हाय रे दैवा! नतद्रष्ट हवेला नाही बघवला ना हा आधुनिक भगीरथ प्रयत्न ! तिने थोड्याच वेळात सर्व शीट्स इतस्तत: भिरकावून दिल्या. अर्थात त्यामुळे आधुनिक भगीरथ अजिबात खट्टू झाला नाही. शीट्सची जाडी कमी असल्यामुळे तसे झाल्याचा निष्कर्ष काढून, आता अधिक जाडीच्या वजनदार शीट्स खरेदी करण्याचा आणि बेत तडीस नेण्याचा मनोदय त्यांनी लगोलग बोलून दाखवला. हवेसारखेच नतद्रष्ट असलेले काही पर्यावरणवादी मात्र राजू यांच्या प्रयोगामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याची ओरड करीत आहेत. अर्थात राजू त्यांना दाद देणार नाहीतच! इतिहासात नाव कोरलेल्या सर्वच शास्त्रज्ञांना प्रारंभी हेटाळणीला तोंड द्यावे लागलेच होते. नाही का? मदुराईचे जिल्हाधिकारी के. वीरराघव राव यांची भक्कम साथ लाभली असताना तर राजू यांनी हेटाळणीची पर्वा करण्याचे काही कारणच नाही. राजकीय नेते व जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा
जोड्या देशातील सर्वच जिल्ह्यांना लाभल्या, तर देशाचा कायापालट व्हायला अजिबात वेळ लागायचा नाही!