दिनकर गांगल
शाळा म्हणजे आनंद, शाळा म्हणजे नवल, शाळा म्हणजे कुतूहल ! हे तत्त्वज्ञान आहे युवराज माने या शिक्षकाचे. ते गेली एकोणीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत - प्रथम गोंदिया जिल्ह्यात आणि आता परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील पारडी या बाराशे लोकवस्तीच्या गावात. गोंदियाच्या शाळेतील प्रसंग आहे. माने यांनी काही कारणाने शाळेत येणे बंद केले, तर गावकऱ्यांनी पाच दिवस शाळेवर बहिष्कार घातला! पारडी येथील केंद्र शाळेत तांड्यावरील एकशे पस्तीस मुले आहेत. माने यांच्याकडे गेली सहा वर्षे दरवर्षी पुढे जाणारा एकच वर्ग दिला आहे. त्यांच्या वर्गात बत्तीस मुले आहेत. माने अभिमानाने सांगतात, की त्या मुलांना आधुनिक शिक्षण संकल्पनेच्या कोणत्याही कसोटीला बसवा, ती उच्च दर्जाने पास होतील. कारण प्रत्येक मूल माझ्या वर्गात आले तेव्हा आनंदाची डहाळी होती; आता ते आनंदाचे झाड होऊन दरवर्षी अधिकाधिक बहरत आहे!
माने यांचा दावा फुकाचा नाही, त्यांनी अवलंबलेल्या उपक्रमांची संख्या चौतीस आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांचे नाते पर्यावरणाशी आहे आणि ती स्वतःचे मनः सामर्थ्य जाणतात. माने यांचे उपक्रम खूप वेगळे नाहीत, मुलांना सभोवतालाशी जोडून घेणे, त्यांच्यातील कुतूहल जागे करणे, वाचणे-लिहिणे-चितारणे-फिरणे असेच ते प्रयोग आहेत, पण त्यातील माने यांची मनःपूर्वकता महत्त्वाची. ते म्हणतात, "मी मला माझ्या बालपणात हवा असलेला गुरुजी स्वतःच होण्याचा प्रयत्न गेली सतरा वर्षे करत आहे. टॉलस्टॉय हा कुतूहल जपणारा गुरुजी म्हणून माझा आदर्श आहे."
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांत खूप उपक्रमशील शिक्षक आहेत, पण युवराज माने यांची प्रयोगशीलता वेगळी जाणवते. तशी त्यांची वचने आहेत. उदाहरणार्थ- "लेकरांच्या प्रभावी व महत्त्वाच्या बदलांचा स्रोत 'शिक्षक' हा असतो." - "मुलांप्रमाणे शाळेने बदलायला हवे." -"काही लेकरे हीच शिक्षकांची गुरू बनतात." - "शिक्षकांना पुन्हा एकदा बालपणात जाण्याची संधी मिळते." युवराज माने स्वतः बहुविध वाचतात आणि मुलांना वाचण्यास प्रवृत्त करतात; माने लिहितात, त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते मुलांना लिहिण्यास लावतात आणि त्यांचे लेखन प्रसिद्ध करतात. माने कल्पक तर आहेतच. एकदा त्यांनी पाहिले की, गुलमोहराची आणि बाहवाची झाडे एकत्र बहरली-फुलली आहेत. तर ते म्हणाले, की हे तर निसर्गाचे हळदीकुंकू झाले ! त्यांचे एक पुस्तक आहे- 'गुरुजी, तू मला आवडला ।' ते वाक्य त्यांच्या विद्यार्थ्यांचे आहे. त्यांच्या त्या पुस्तकाची चित्रसजावट त्यांची पत्नी पूनम आणि मुले- तन्मय व प्रयास यांनी केली आहे. माने स्वतःच्या गुरुजी असण्यात इतके मग्न आहेत, की त्यांना तंत्रज्ञानाने समाजात येणारे मानसिक परिवर्तन बाधक वाटत नाही; उलट, ते मुलांबरोबर त्यातही नवनवीन प्रयोग करतात.